Thursday, June 27, 2019

गौरीची - माहेरवासिणीची अक्षय्य तृतिया !

गौरीची - माहेरवासिणीची अक्षय्य तृतिया !
चैत्र शुद्ध प्रतिपदा, आपला वर्षारंभ होतो. पोटातलं श्रीखंड जिरते किंवा अजून डोळ्यावरच असतं, तर वेध लागतात, ते चैत्र गौरीचे ! चैत्र शुद्ध तृतियेला, हिची स्थापना करतात. चांगलं गरम पाण्याने, हळदीने न्हाऊ-माखू घालून, नविन खण वगैरे वाहून, ओटी वगैरे भरून या माहेरवासिणीचे स्वागत करतात ! रांगोळी घालून, तिच्या अंगावर अलंकार वगैरे घालून ! हार-फुले वाहून ! धूप-दीप ओवाळून ! नैवेद्य दाखवून !
वर्षातून एकदा येणाऱ्या, या माहेरवासिणीचे स्वागत कोण करणार ? तिची जन्मदात्रीच ! आपली लेक कशी आहे ? सुखात आहे ना ? तिचे काय सुखदु:ख ? काय अडीअडचणी ? तिच्या मुलाबाळांत, लेकीसुनांत रमली ना ? का मनीचा काही सल सांगायचा राहून गेला आहे ? एका घरातून दुसरे घर सजवायला गेलेली लेक, लग्नानंतर क्षणात माहेरवासिण होते, या घरची पाहुणी होते. आता तिचे घर म्हणजे तिचे सासर ! समाजाचे नियम किती कटू आहेत, कठोर आहेत, चिवट आहेत आणि रेशमासारखे मुलायम पण आहेत. नात्यांचे हे रेशीमबंध आणि गाठी सुटत नाही, उलगडत नाही. काळजी फक्त घ्यायची असते, ती गुंता होऊ नये याचीच ! हे तिच्या आईशिवाय कोण पहाणार ? लेकीला हवं नको, ते कोण देणार ? आपलं जन्मस्थान, जन्मदात्री सोडून येण्याचे दु:ख खरोखर कोण जाणणार ? त्यातली व्यथा व कायम रहाणार असणारा दुरावा, कोणाला समजणार ?
ज्या मातेला पोटी मुलगी आहे, ती तर आवर्जून गौर बसवते ! तिला बसवायला सांगतात, ती बसवत नसेल तर ! मग हे तिला तिच्या आईने सांगीतलेलं असो वा सासूने सांगीतलेलं असो ! पिढ्यानपिढ्या हा निरोप, सासवा आपल्या सूनांना देत आहे, तर माता आपल्या मुलींना देत आहेत. सोबत पिढ्यानपिढ्यांची ही ‘चैत्रगौर’ ओटीत घालून, ‘तिला नीट सांभाळ, तिची आबाळ होऊ देऊ नको’ म्हणून सांगत ! पिढ्यपिढ्यांचा हा चैत्रगौरीचा वसा, आमच्या या सासुरवाशीणी, या सासरच्या माहेरवासिणीसाठी सांभाळत आल्या आहेत. ही त्यांच्या माहेरवासिण म्हणून असलेल्या हक्काची ज्योत, अखंड तेवत ठेवत आल्या आहेत.
मनातील असंख्य भावभावना मनांत ठेवत, गतकाळातील सुखदु:ख डोळ्याच्या बाहेर येणार नाही, याची काळजी घेत ! सांगण्यासारखी सुखं तर सर्वांनाच दिसतात, त्याचा गाजावाजा आपोआपच होत असतो. काळजी घ्यावयाची असते, ती दु:खांनी डोळ्यांबाहेर येवू नये यांची ! ती घेत असतात, ते पिढ्यानपिढ्या आणि तयार करत असतात, समाजकर्तव्य म्हणून पुढची पिढी !
चैत्र शुद्ध तृतिया ते वैशाख शुद्ध तृतिया, म्हणजे ‘अक्षय्य तृतिया’ या दरम्यान ही चैत्रगौर घरी बसलेली असते, ती माहेरवासीण म्हणून ! मग जिथं गौर बसवलेली असेल, तिथं या माहेरवासिणीसाठी सर्व सुवासिनींचे अक्षय्यतृतियेपर्यंत हळदीकुंकू !
हे हळदीकुंकू म्हणजे आम्हा मुलांची पण पर्वणी असायची. कैरीच्या सोबत हरबऱ्याची वाटलेली ओली डाळ, कैरीचे पन्हं, टरबूज, खरबूज, आंबे हे तर खायला असायचेच ! ओल्या हरबऱ्याने, मुरमुऱ्याने ओट्या भरल्या जायच्या, हळदीकुंकवाला आलेल्या सवाष्णींच्या ! प्रसाद हा खिरापतीचा असतोच. सोबत आलेल्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांना, जिवतीच्या या लेकरांना पण हा खाऊ मिळायचा. गौरीसमोर केलेली आरास, त्यात असलेले विविध फराळाचे पदार्थ ! अक्षय्यतृतियेनिमीत्त सांजोऱ्या तर अवश्य केल्या जायच्या, क्वचित खवाच्या सांजोऱ्या ! या सर्वांमुळे हा सण फक्त त्या माहेरवासिणीचा रहायचा नाही, तर संपूर्ण घराचा व्हायचा. ती माहेरवासिण पण काय, पूर्वी याच घराचा तर भाग होती. केवळ समाजरीत, जनरितीनुसार लग्न झाले, म्हणून वेगळी झालेली.
बघताबघता महिना संपतो. चैत्राच्या तृतियेला आलेली ही माहेरवासिण, वैशाखाच्या तृतियेला तिच्या घरी जायला सज्ज होते. तिला खीर-कान्होल्याचा नैवेद्य दाखवला जातो. बुधवार असेल, तर बुधवारचा गुरूवार होत नाही, तर आदल्या दिवशी मंगळवारीच तिच्यावर अक्षत टाकली जाते, तिच्या रवानगीची ! बुधवारी सासरी पाठवत नाही ना, म्हणून ! यासाठी हिला एक दिवस कमी रहावे लागते, पण जास्त दिवस रहाता येत नाही. ही माहेरवासीण पण किती दिवस येणार, तिच्या पोटची पुढे तिच्या घरी माहेरवासिण म्हणून येईपर्यत ! तिच्या पोटची माहेरवासीण म्हणून येण्याजोगी झाली, की हिचे माहेसवासाचे सुख संपते; मग तिला माहेरवासाचे सुख द्यायचे असते, ते तिच्या लेकीला ! हे जगाचे रहाटगाडगे चालावे म्हणून !
आमच्या बहिणाबाई चौधरी तर प्रत्यक्ष योग्याला सुनावतात, आई सासरी का नांदते, यांवर !
गाते माहेराचं गानं, लेक येईल रे पोटी
देरे देरे योग्या ध्यान, एक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते
देव कुठे देव कुठे, भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या, माहेरात सामावला

9.5.2019

No photo description available.

No comments:

Post a Comment