Thursday, June 27, 2019

राग - काफी

राग - काफी
काल फाल्गुन पौर्णिमा’ म्हणजे ‘हुताशिनी पौर्णिमा’ म्हणजे ‘होळी’ झाली आणि आज ‘धुलिवंदन’ ! पंचमीला ‘रंगपंचमी’ ! हे सगळे रंगात बुडवणारे सण ! जीवनांत रंग भरणारे सण, जीवनांत रंग भरा, रंग उडू देवू नका, हे सांगणारे हे सण ! हे सण आपल्या समाजाने जगवले आणि जपले ! वर्षातल्या या शेवटच्या महिन्यात रंगोत्सव करून सरत्या वर्षाला निरोप देत, चैत्रपालवीने नववर्षाचे स्वागत करायला सज्ज अाहोत.
‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ आमच्या संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे, ते काही उगाच नाही. लहानपणी आपल्याला ज्या आपल्या निरागसतेत, अज्ञानात, कल्पनेत आनंद असतो, तो मोठेपणी जरा समजायला लागले, जगाचा भलाबुरा अनुभव यायला लागला, की नाहीसा होतो, कमी व्हायला लागतो.
लहानपणापासून शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे रागांची नांवे आणि त्यांचे स्वर माझ्या कानावर पडत आले आहेत. घरात विद्यार्थ्यांना आई गाणं शिकवायची. ते शिकवले जातांना, माझा त्या रागाच्या नांवावरून, त्या रागाबद्दल काही विशिष्ट समज विनाकारणच व्हायचा. त्या रागाचे चित्र मनांत तयार व्हायचे.
एखादा स्वर कोमल असतो म्हणजे काय ? सर्व स्वरांत कोमल, अतिकोमल स्वर असतांना, फक्त मध्यमच फक्त तीव्र का ? बाकी कोणीच नाही, तीव्र नाही ? आद्य स्वर म्हणजे षड्ज आणि या स्वरांच्या सप्तकांतील पंचम हे फक्त एकच का ? यांत का बरे, कोमल आणि तीव्र नसावे ? जरा विचार करता यायला लागले की विचार थांबवता येत नाही. हे सात स्वरांचे कुटुंब आहे. बाकी सर्व स्वर म्हणजे ही पोरंबाळं ! काही वेळा सरळ वागतात, तर काहीवेळ हळवी होतात. बस, हळवी झाली की त्यांना कोमल म्हणायचं आणि अगदी रडवी झाली, की त्यांना अति कोमल म्हणायचं ! मात्र संतापात असेल तर तीव्र म्हणायचे ! त्यामुळे रिषभ, गंधार, धैवत व निषाद ही पोरं कोमल अतिकोमल होत असतील ! मात्र षड्ज आणि पंचम हे त्यांचे आईवडिल ! आईवडील एकच असतात, त्यांना बिचाऱ्यांना कोणताही मुलगा असो वा मुलगी असो, त्यांची जन्मदात्याची भूमिका बदलतां येत नाही. आईशिवाय कोणत्याही कुटुंबाची कल्पनांच तुम्ही करू शकत नाही. मुलांना जन्म देणारी ही माता, आदीशक्ती ! हो, अगदी भविष्यांत कोणताही मुलगा, बाप जरी होणार असला, तरी त्याची जन्मदाती आई असणारच ! मग ही आईची भूमिका आहे, ती षड्ज याची ! कोणताही राग घ्या, त्यात षड्ज असतोच ! मग पित्याची भूमिका आपोआपच येते ती पंचमाकडे ! कारण एखादे वेळेस शक्य आहे, कुटुंबात दुर्दैवाने पिता नसेल ! मात्र मग ते कुटुंब कसे केविलवाणे, पोरके वाटायला लागते. कुटुंबाला भरभक्कम असा, पित्याचा आधार हवाच ! मात्र काही वेळा दैवगतीपुढे इलाज नसतो, पित्याचे नांव पण सांगता येत नाही, अशी अवस्था असते. हे पुढे न्यायशास्त्राचा अभ्यास करतांना, स्पष्ट झाले. माता ही सर्वांना डोळ्याने दिसते. तिला ती माता आहे, हे सिध्द करावे लागत नाही. पित्याचे अस्तित्व हे गृहीत धरावे लागते. Maternity is fact when paternity is presumption ! पित्याचे छत्र जरी नसले, तरी मग या खंबीर मातेला दोघांची कर्तव्ये पार पाडावी लागतात. मातेचे कर्तव्य तर निसर्गाने जन्मजात दिलेले असतेच, मात्र पित्याच्या अनुपस्थितीत पित्याचे पण काम करावे लागते. मला मनांत काहीही यायचे, एकदा विचारांचा ओघ डोक्यांत सुरू झाला की तो आपल्याला कुठल्या कुठे घेवून जातो नाही !
राग भूपाली किंवा भूप म्हटले, की डोळ्यांसमोर शांत पवित्र वातावरण येते. अगदी सकाळच्या वेळी, सर्वांच्या अगोदर उठून, सुस्नात होवून घरातील सासुरवाशीण मर्यादेने वागत, अंगणात सडा-संमार्जन करते आहे. त्यानंतर छान रांगोळी काढते आहे. नंतर तुळशीला पाणी घालून, नमस्कार करत प्रदक्षिणा करते आहे. त्या घराला पावित्र्य देत आहे. भूप ऐकावा तर विदुषी किशोरी आमोणकर आणि पं. कुमार गंधर्व यांचा !
राग दुर्गा म्हटले की, नवरात्रातील रात्री नऊ दिवस जे आरतीच्या वेळी वातावरण असते, ते डोळ्यांसमोरच येत नाही, तर मनांत दिसू लागते. वातावरणांत वेगवेगळ्या सुवासांबरोबर, पावित्र्याबरोबरच, त्या मातेचे सामर्थ्य आपल्याला दैवी आधार देत असते. आपले हात न कळत आपोआप जोडले जातात. हा अनुभव विदुषी गंगूबाई हंगल यांचा दुर्गा ऐकतांना घेतला होता.
राग हिंडोल म्हटले, की मनांतल्या मनांत हिंदोळ्यावर बसून झोके घेत, एकदा या बाजूला आणि एकदा त्या बाजूला जात आहोत, असे वाटते. पं. भीमसेन जोशींचा ‘हिंडोल’ ऐकून असाच हिंदोळ्यावर झुललो होतो.
राग बागेश्री म्हटले की निसर्गाने आपल्या समृद्धीची उधळण केलेली आहे, पण माणसाने त्याला शिस्त लावत त्याचे उपवन, उद्यान, बाग केली आहे. आपण त्या बागेतून फिरतांना जे वाटेल, तसं वाटतं बागेश्री ऐकतांना ! ग्वाल्हेर घराण्याच्या गायक मंडळींचा हा आवडता राग असावा.
काफी म्हटलं की आपोआपच ‘काॅफीपान, चहापान’ आठवते. असे खोडकर वाटावे, हे नांव या रागाचे का असावे बरं ? हा मला नेहमी प्रश्न पडायचा. हा अर्थ मी मराठी असल्याने ! मात्र हिंदीत याचा अर्थ हा ‘खूप जास्त’ होतो. खरंच या रागांत गीतांचे जे विविध प्रकार गायले जातात तेवढे मला वाटत नाही, कुठं गायले जात असतील ! ग्वाल्हेर घराण्यांत जास्त प्रसिद्ध असलेला ‘टप्पा’ हा गानप्रकार ! आपल्याला आपोआप ताल धरायला लावणारा ‘दादरा’, आयुष्यातल्या आठवणी रंगीत व समृद्ध करणारी ‘होरी’ आणि ‘चैती’ ! आपल्याला भक्तीभावांत न्हावू घालणारी ‘भजने’ !
या सोबत तशी अजून आठवायची ती कृष्ण लीला ! ‘होरी’ म्हटलं की भगवान होण्यापूर्वीचा बाळकृष्ण वा खोडकर कुमार कृष्ण आठवतो, तर ‘चैती’ म्हटलं की चैत्र आठवतो, प्रभू रामचंद्र आणि त्यांचा ‘चैत्र’ महिना आठवतो ! वर्षप्रतिपदा आठवते, रामनवमी आठवते ! भगवान राम आणि कृष्ण यांनी आमचे साहित्यच समृद्ध केले नाही, तर हे दोन परमेश्वराचे अवतार आमचे अवघे जीवन व्यापून राहीले आहे. त्याचे प्रतिबिंब आमच्या नित्य आचरणांत, दिनचर्येत दिसले त्यांत नवल ते काय ?
आमच्या स्नेह्यांकडे गोकुळातील कृष्ण व गोपींची होळी चितारलेले ‘राजा रविवर्मा’ यांचे चित्र होते. आई नेहमी शिकवत असलेली, ‘काफी’ या रागातील ‘आज खेलो शाम संग होली, पिचकारी रंगभरी केसरकी’ ही चीज आठवते.
‘काफी’ हा थाट पण आहे आणि राग पण आहे. या थाटातील काफी या रागाशिवाय, धनश्री, धानी, बहार, भीमपलासी, पिलू, मेघ मल्हार, बागेश्री वगैरे पण राग आहेत. काफी रागात गायनाचे ‘उपशास्त्रीय’ मानले जाणारे प्रकार जास्त म्हटले जातात. संपूर्ण जाती असलेला हा राग, यांत सर्व स्वर उपयोगात आणले जातात. गंधार आणि निषाद यांत कोमल तर बाकी सर्व स्वर शुद्ध असतात.
सा रे ग म प ध नि सा - हा आरोह
सा नि ध प म ग रे सा - हा अवरोह
यांत वादी पंचम आणि संवादी षड्ज आहे. वादी म्हणजे रागातील मुख्य स्वर आणि संवादी म्हणजे त्या खालोखाल मुख्य स्वर !
सासा रेरे गग मम प - ही पकड म्हणून पहा, राग काफी डोळ्यांसमोर उभा रहातो. राग गाण्याची याची वेळ संगीत समयचक्राप्रमाणे रात्रीचा दुसरा प्रहर ते मध्यरात्रीची दिली आहे.
या रागाचा शृंगार रस आहे. शृंगारीक वर्णन करतांना कोणते शब्द वापरायचे, हे तर गायकाच्या हातात नसते, मात्र यामुळे त्याची फार काही अडचण होत नाही. दोघांमधील विरह, त्यामुळे येणारी व्याकुळता, भेटीची आस, भेट झाल्यावर होणारे समाधान, येणारी तृप्ती, तिचे माधुर्य ! या विरह-समर्पणातील सर्व भावना, हा राग समर्थपणे दाखवतो. त्यामुळे ठुमरी, होरी, दादरा यांत गायली जातात. रात्रीचा भैरवी म्हणून पण याला मानले जाते. जरी गंधार आणि निषाद हे कोमल स्वर यांत असले, तरी क्वचितच शुद्ध स्वर एखादवेळेस घेतले जातात. कोणत्याही काळांत हा राग गातां येतो. चित्रपट संगीत, भजने-किर्तन यांत देखील याचा मुक्तपणे उपयोग केला गेला आहे.
राग काफीवर आधारलेली आणि त्यातील गीते आपल्याला ऐकता यावी म्हणून देत आहे.
1. ‘पिया तो मानत नाही’ - ही पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली ठुमरी
2. बे परजात - हा पं. राजन मिश्रा आणि पं. साजन मिश्रा यांनी गायलेला ‘टप्पा’
3. पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी गायलेला टप्पा
4. विदुषी शोभा गुर्टू यांनी गायलेली ‘होरी’
5. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकांतील एका प्रसंगात दाखवलेले आणि पु. ल. देशपांडे पेटीवाादक असून ‘उगीच का कांता’ हे मूळ संगीत मूकनायक या नाटकातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे पद
6. ‘विदुषी गिरजा देवी आणि पं. बिरजू महाराज यांचा अविष्कार - तबल्यावर अनुराधा पाल
7. ‘कैसी ये धूम मचायी’ ही गाजलेली ‘होरी’ गायली आहे विदुषी बेगम अख्तर आणि निवेदन साक्षात पं. जसराज
8. पं. छन्नूलाल मिश्रा यांनी गायलेली ‘चैती’
9. होली खेलत नंदलाल - महंमद रफी यांनी गायलेले व अंजान यांचे हे गीत, गोदान या १९६३ सालातील चित्रपटातील आहे. संगीत - पं. रविशंकर
10. ‘अब के सजन सावन मे’ हे ‘चुपके चुपके’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गीत - संगीत - सचीन देव बर्मन
11. ‘काली घोडी द्वार खडी’ हे ‘चष्मेबद्दूर’ या चित्रपटातील येसुदास आणि हेमंती शुक्ला यांनी गायले आहे. संगीत - राजकमल
(आपल्याला वाटले तर अवश्य ‘शेअर’ करा)

21.3.2019













No comments:

Post a Comment