Thursday, June 27, 2019

आज फाल्गुन वद्य षष्ठी, म्हणजे नाथ षष्ठी !

आज फाल्गुन वद्य षष्ठी, म्हणजे नाथ षष्ठी ! संतांची भूमी मानल्या गेलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी, वसलेले पैठण म्हणजे नाथ भूमी, संत एकनाथ महाराजांची भूमी ! फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ रोजी त्यांनी आपला देह ठेवला.
भागवत धर्माचा पाया घातला, तो ज्ञानेश्वर माऊलीने आणि संत तुकाराम महाराजांनी, त्यांवर कळस चढवला. संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे,
संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।।
तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।
भागवत महापुराणावरील एकादश स्कंदावरील त्यांची टिका, विवरण हे भक्ती तत्वज्ञानाचा आदर्श ग्रंथ म्हणजे ‘एकनाथी भागवत’ या नांवाने प्रसिद्ध आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रावरील लिहीलेले, भावार्थ रामायण हे नित्य वाचनीय आहे.
संत एकनाथ महाराजांचे अभंग, गवळणी, भारूडे या रचना प्रसिद्ध आहेत. मला व सर्वांनाच आवडत असलेल्या रचना, म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत, त्यांच्या साठी आणि त्यांना समजेल अशा उदाहरणांनी, दृष्टांतांनी जे सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगीतले, त्याला खरोखरच तोड नाही. आपण नेहमी ऐकत असलेले ‘विंचवाचे भारूड’ किती सोपे व सुंदर दृष्टांत देते !
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला। तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥
दुसरे अजून एक भारूड आठवले, ‘भूताचे भारूड’ ! परमेश्वर याच भूताने आपल्याला झपाटले पाहिजे, हे यांत सांगीतले आहे. हे भूत सर्वांना लागो, ही प्रार्थना पण शेवटी केली आहे.
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
भूत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥
बहिरा, मुका कोणाला म्हणता येईल, हे संत एकनाथ महाराजांनी आपल्या भक्तीभाव ह्रदयी ठेवून कळवळून सांगीतले आहे, या अभंगांत !
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥
‘गवळण’ म्हटले की डोळ्यांसमोर उभे रहाते ते भगवान श्रीकृष्णाचे गोकुळ आणि कृष्णावर लुब्ध झालेली गोपिका, त्या गोकुळातील गवळणी ! गवळणींच्या ठायी असलेली कृष्णभक्ती भक्ती आणि त्या भक्तीने कृष्णमय झालेल्या त्या गोपी, गवळणी ! यांचा भाव अतिशय समर्थपणे व हळुवारपणे चित्तारलेला आहे, तो संत एकनाथ महाराज यांनी ! ही एक गवळण पहा -
तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं |
विव्हळ झालें अंत:करणी | मी घरधंदा विसरलें ||१||
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ||धृ||
मुरली नोहे केवळ बाण | तिनें हरिला माझा प्राण |
संसार केला दाणादीन | येऊनि हृदयी संचरीली ||३||
तुझ्या मुरलीचा सूरतान | मी विसरलें देहभान |
घर सोडोनी धरिलें रान | मी वृंदावना गेलें ||४||
एका जनार्दनीं गोविंदा | पतितपावन परमानंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा | वृत्ति तंव पदीं निवर्तली ||५||
आपण नेहमी ऐकत आलेली सुमधूर अशी, आर एन पराडकर यांनी गायलेली, भैरवीतील ही गवळण !
नको वाजवू श्री हरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||
घरी करीत होते मी कामधंदा
तेथे मी गडबडली रे || १ ||
घागर घेवूनी पानियाशी जाता
दोही वर घागर पाजरली || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण घाबरली || ३ ||

26.3.2019

No comments:

Post a Comment