Thursday, June 27, 2019

राग - दरबारी कानड्याची आठवण

राग - दरबारी कानड्याची आठवण
एक प्रसंग --
चित्रपट बघायला, मी जळगांवला, बहुतेक अशोक टॉकीजमध्ये, गेलो होतो. चित्रपट होता 'काजल' ! जुने चित्रपट बघण्याची मला आवडच, आणि त्यातच जर त्यातील गाणी रागदारीवर आधारीत असतील, तर महाविद्यालयीन जीवनांत जायचोच ! सन १९६५ मधील हा चित्रपट, सुरु होतो. --- आणि सुरुवात होते. चित्रपटातील नामावळीकडे आपले लक्ष जात नाही, त्यावेळी, कारण कानावर आवाज येतो तो, कोणत्याही प्रकारच्या गीतात लीलया फिरणारा आवाज - हो, आशाताई भोसले यांचाच ! आपल्या समोर एक राजवाडा येतो आणि पाठोपाठ निसर्गातील पशुपक्षी दिसू लागतात. आपल्या मातेचे दूध पितांना, 'माता दूध सोडत नाही की काय' या शंकेने मातेच्या कासेला ढुशी देत असलेले ते छोटे पाडस ! पडद्यावर सतार घेऊन मीनाकुमारी गात असते 'तोरा मन दर्पण कहलाये' आणि तल्लीन होऊन ऐकत असते दुर्गा खोटे ! पार्श्वभूमीवर दिसत असतात, बाळ श्रीकृष्णाची विविध रूपे, आणि समोर भगवान श्रीकृष्णाचू मुरली वाजवत असलेली मूर्ती ! नितांत सुंदर आणि भक्ती रसातील असलेले हे गीत आपल्या काळजाचा ठाव घेते, कायमचे लक्षांत रहाते. 'साहिर लुधियानवी' यांनी रचलेले हे अप्रतिम गीत स्वरबद्ध केल्याचे अजिबात जाणवत नाही ते याच्या संगीतकार 'रवी' यांच्यामुळे !
दुसरा प्रसंग -
चित्रपट बघायला गेलो होतो, रावेरला 'स्वस्तिक टॉकीजमध्ये' ! चित्रपट होता 'बैजू बावरा' ! काळा-पांढरा असलेला असलेला हा चित्रपट, आधारलेला आहे तो 'बैजू' या पात्रावरच्या 'गौरी'वरच्या प्रेमकहाणीवर ! सम्राट अकबर या राजाच्या काळातील, त्याच्या दरबारी असलेल्या नवरत्नांतील एक म्हणजे - तानसेन ! प्रसिद्ध आणि अद्वितीय गायक, याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच, याच्या सारखा हाच ! --- आणि चित्रपटात प्रवेश होतो तो वेडसर दिसणाऱ्या 'बैजूचा' ! भगवानाला आर्तपणे पुकारत 'ओ दुनिया के रखवाले' म्हणत ! त्याच्याकडे तक्रार करत - 'लूट गयी मेरी प्यार की मंजील, अब तो नीर बहा ले' , परमेश्वर कसला ऐकतो इतक्या लवकर आणि मग शेवटी तो आपल्या या भक्ताला, बैजूला म्हणायला लावतो - 'जीवन अपना वापस ले ले, जीवन देनेवाले' ! आणि या स्वर्गीय आवाजाने, त्याच्या भोवती,गोळा होते, ते सर्व गांव, तानसेनाशिवाय कोणालाही गावात गाण्याची परवानगी नसतांना देखील ! भक्तीरस आणि कारुण्य दाखविणारे हे 'शकील बदायुनी' यांनी रचलेले, आणि 'नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले अप्रतिम गीत ! --- सांगायची गरज नाही हे गायले आहे, परमेश्वरापासून भरदार आवाज घेऊन आलेले 'स्वर्गीय मोहम्मद रफी' यांनी !
तिसरा प्रसंग -
हा चित्रपट बघितलेला नाही, मात्र याचे गीत अनेक वेळा ऐकलेले आहे. फाशीवर जातांना मनात उमटलेले हे गीत 'पं. रामप्रसाद बिस्मिल' याचे मानतात, तर काही 'बिस्मिल अज़ीमाबादी' यांचे मानतात. गीत कोणाचेही असो यातील देशप्रेमाची ओतप्रोत भावना, तिळभरपण कमी होत नाही. 'शहीद' या सन १९६५ या चित्रपटाइल हे गीत गायले आहे - मोहम्मद रफी, मन्ना डे आणि राजेंद्र मेहता यांनी ! संगीतात बांधलेले आहे 'प्रेम धवन' यांनी !
चौथा प्रसंग -
चित्रपट होता 'मेरे हुजूर' ! लागला होता बहुतेक 'राजकमल या चित्रपटगृहांत ! चित्रपटातील नायकाचे नांव, प्रसिद्ध असलेले नांव, म्हणजे 'राजकुमार' ! मद्याने धुंद असलेला हा लडखडत चालत येतो त्या नर्तिकेजवळ, आणि म्हणतो 'झनक झनक तोरे बाजे पायलीया' आणि याच्या या गीताबर हुकूम गात असते राजनर्तिका, राजदरबारांत ! 'शंकर-जयकिशन' या जोडीचे संगीत असलेले हे गीत रचलेले आहे, 'हसरत जयपुरी' यांनी ! -- गीत अर्थातच गायले आहे शास्त्रीय संगीतावर आधारलेले गीत म्हणायचे झाले तर कोणी म्हणायचे, यांवर प्रथम आठवण येते त्या 'मन्ना डे' यांनी ! शृंगारप्रधान असलेले गीत आपण कधीतरी विसरू शकणार ?
पाचवा प्रसंग -
आकाशवाणीवर असंख्य वेळा ऐकलेले 'मृगनयना रसिक मोहिनी' हे डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या कमालीच्या तयार आणि लयीशी खेळखेळता म्हटलेल्या आवाजांत ! कै. गोविंद बल्लाळ देवल यांच्या 'संशयकल्लोळ' या नाटकातील हे गीत !
-------------------------------------------------------------------------------------------
मी पूर्वी अनुभवलेले हे वरचे पाच प्रसंग सांगीतले, यातील साम्य एकच - ते म्हणजे ही सर्व गीते आधारलेली आहेत राग 'दरबारी कानडा' या रागावर !
कर्नाटक कुटुंबातून 'यक्षगान' या सुंदर नावाने ज्ञात असलेला हा राग, आपल्याकडे 'कानडा' घरातला आहे, आता तो आपल्याला परका वाटतच नाही, इतका आपला झालेला आहे. सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाने रचलेला हा राग आहे, असे पण म्हटले जाते. 'आसावरी' थाटातील असलेला हा राग रात्रीच्या दुसऱ्या - तिसऱ्या प्रहरी म्हणतात. गंधार, निषाद आणि धैवत कोमल असलेल्या रागात, बाकी सर स्वर शुद्ध लागतात. याचा वादी 'रिषभ', तर संवादी 'पंचम' ! गमक आणि मींडप्रधान गायला जाणारा हा राग, मंद्र आणि मध्य सप्तकांत गायला जाणारा आहे. आपण जर जास्त वेळा तर सप्तकांत घेऊन जायला लागलो, तर तो राग 'अडाणा' जाणवायला लागेल. वक्र प्रकृतीने आणि पद्धतीने गाव लागणारा, हा संपूर्ण जातीचा राग आहे.
माझी कै.आई गाणे शिकली, ते जळगांवच्या कै. गोविंदराव कुलकर्णी यांच्याकडे, आणि कै. गोविंदराव कुलकर्णी शिकले ते ग्वालियर घराण्याचे प्रसिद्ध गायक कै. कृष्णराव शंकर पंडीत यांच्याकडे, गुरुकुल पद्धतीने, निदान तपभर ! त्याच्या आवाजातील मिळालेला 'दरबारी कानडा' पण सोबत देत आहे.
-----------------------------------------------------------------------
माझी कै.आई आकाशवाणी जळगांव केंद्रावर शास्त्रीय संगीतासाठी आकाशवाणीच्या ऑडीशनला गेली होती. ती प्राथमिक फेरी तिने यशस्वीपणे पार केली. त्यावेळी तिने म्हटला होता हा राग - 'दरबारी कानडा' !
'अरे, मी गायला लागले. नानांनी शिकविलेला 'मुबारक बा' हा ख्याल आणि नंतर 'घर जाने दो छांड मोरे बैय्या' हे म्हटले. डोलायला लागले रे ! बहुतेक होईल मी उत्तीर्ण यांत ! तबल्याच्या साथीला होते - विश्वनाथ मिश्रा ! आणि पेटीवर ------' ती समाधानाने, आनंदाने सांगत होती. नंतर तिला स्त्रियांच्या नेहमींच्याच कारणामुळे रेकॉर्डिंगला जाताच आले नाही, संपला तिचा आकाशवाणीचा प्रवास !
तिच्या ऑडिशनच्या वेळी हार्मोनियमवर कोण होते, हे तिने सांगितले, पण आता मला आठवत नाही. --- आणि आता तर ते, मला कधीच कोणाला विचारता पण येणार नाही. त्यावेळची सर्व मंडळींपैकी आता कोण असणार ? आणि जिच्या, म्हणजे माझ्या आईच्या साथीला जे पेटीवर बसले होते, ते तर आता ती पण मला सांगू शकत नाही, ----- कारण इतक्या दूर ती आता निघून गेली आहे, की मला सांगण्यासाठीसुद्धा परत न येण्यासाठी !

8.6.2019

No comments:

Post a Comment