Thursday, June 27, 2019

एका अशाच कार्यक्रमाच्या मागील कथा !

एका अशाच कार्यक्रमाच्या मागील कथा !
आपण एखादा कार्यक्रम करायचं ठरवलं की तो होतो, मग तो यशस्वी होतो, किंवा अयशस्वी होतो. त्यामागे मग कितीतरी गमतीजमती, कित्येकांची ओढाताण, ऐनवेळेस येणाऱ्या अडचणी, आपण ठरवलेले काही असते आणि होते, किंवा करावं लागते वेगळेच ! अर्थात ही मागील कथा, आपणांस खूप वेळा समजत नाही. त्याची बहुतेकांना आवश्यकता पण वाटत नाही. मात्र काही वेळा, अशी उत्सुकता काहींना असते, पुढच्यास ठेच मागचा शहाणा ! अशाच एका कार्यक्रमाच्या मागील कथा ! ज्यांना उत्सुकता असेल, त्यांनी जरूर वाचावी !
‘अरे, आता, काही होत नाही बघ माझ्याकडून या शिकवण्या ! तशी मुलं येतात गाणं शिकायला, पहिल्या इतके येत नाही, पण येतात. गाण्याच्या परिक्षेचे केंद्र बंद केल्यापासून, तशी आता माझ्यावर काही जबाबदारी पण राहिली नाही. मात्र एकेक मागचं आठवलं, की मन पण लागत नाही आता पहा !’ असाच एकदा सहा-सात वर्षांपूर्वी रावेरला थोड्या वेळासाठी गेलो होतो, त्यावेळी आई मला सांगत होती.
‘तुला कोणी जबरदस्ती केली आहे का शिकवण्या करण्याची ? वाटलं तर शिकव कोणाला, नाही तर शिकवू नको.’ मी.
‘वेळ पण जात नाही रे ! टक्क बसावं नुसतं, समोर पहात ! नाही करमलं, तर मग काही तरी ऐकावं रेडिओवर ! तिथं पण शास्त्रीय गाणं कमी लागतं आता. लागतात ते सर्व धांगडधिंगा ! तुझे भाऊ तर दिवसभर बातम्या ऐकतात आणि काॅलनीभर विनाकारण फिरून येतात. प्रत्येक वेळी तीच बातमी असते, पंधरा मिनीटांत काय आणि तासा-दोन तासांनी काय, काय बदल होणार आहे त्या बातम्यांमधे ? पण ऐकतात, हिंदी, मराठी, इंग्रजी ! पुन्हापुन्हा त्याच ऐकतात. मला कुठं काय ऐकायला मिळतेय ? मी आपली कुठं घर सोडून जात नाही. जाणार तरी कुठं ?’ आई मला सांगत होती. वडिलांना मी भाऊ म्हणायचो.
‘तुला वेगळा रेडिओ आणून देवू का ? त्यांना त्यांच्या बातम्या ऐकू दे, तू तुझं गाणं ऐकत जा !’ मी.
‘दोन दोन रेडिओ काय करायचे आहे विनाकारण ?’ आई !
‘जाऊ दे. आता असंच चालायचे. पहिले हिंमत होती, ताकद होती पण पैसे नव्हते. तसे पैसे आपल्यासाठी कधीच नव्हते. मात्र त्यावेळी बिनापैशाने असलं, की इकडेतिकडे जाता यायचं, दोन घटका कुठं बसतां यायचं ! आता कुठं काही जाता येत नाही, काही ऐकता येत नाही, म्हणता पण येत नाही.’ आईची व्यथा !
कित्येकवेळा आपल्याला प्रत्यक्ष सांगीतल्यापेक्षा, बोलल्यापेक्षा पण, न सांगता, न बोलता खूप काही सांगीतलं जातं. महत्वाचे सांगीतलं जातं. आपल्याला मात्र ते उमजायला हवं, समजायला हवं ! लहानपणी घटना आपल्यासमोर घडत असतात, आपल्याला त्याचा अर्थ काही समजत नाही. त्यावेळी, ना आपल्याला तेवढी बुद्धी असते, ना वयोपरत्वे आलेला अनुभव आणि त्यातून आलेली समज ! त्या घटनांचे अर्थ समजायला लागले, की आपल्या मनांत व्यर्थ कालवाकालव सुरू होते. काही झाले तरी, आपण घडून गेलेल्या घटना आणि त्याचे झालेले भलेबुरे परिणाम उलटे फिरवू शकत नाही. काहीवेळा त्या घटनांना आणि त्याच्या परिणामांना अप्रत्यक्षपणे आपण देखील जबाबदार असतो.
एकत्र कुटुंबातील ‘कर्ता’ म्हणून गरिबीतून प्रामाणिकपणे निभावत असलेले ‘कर्तेपण’ इतरांना दुरून कितीही चांगलं दिसत असलं, तरी ते त्या कर्त्याचा जीवनरस अमानुषपणे शोषत असतं. कधीतरी आपण त्या ‘कर्ता’ म्हणून भूमिकेत गेलो, की हा अर्थ समजायला लागतो. हा अर्थ थोडा तरी समजायला, आपल्याला आपल्या आयुष्याची निदान चार तपे घालवावी लागतात ! ‘दुरून डोंगर साजरे, म्हणी विनाकारण नाही तयार झाल्या !
इतरांना झगमगीत दिसत असलेल्या, आपल्या आयुष्याचा इमारतीचा पाया, हा कित्येक वेळा नव्हे, तर बहुतेक वेळा आपल्या आईवडिलांच्या किंवा आपले पालक झालेल्यांच्या इच्छाआकांक्षांच्या उडालेल्या तुकड्यांवर आधारलेला असतो. त्यांच्या आकांक्षांचे हे तुकडे खडी, दगडासारखे या आपल्या आयुष्याच्या इमारतीच्या पायात वापरले जातात. त्यांच्याजवळचे पैसे हे सिमेंटचे काम करतात, तर हे त्यांच्या इच्छाआकांक्षांचे तुकडे उडतांना येणारे आणि इतर कोणालाही न दिसणारे, मात्र फक्त त्यांनाच दिसणारे अश्रू, हे त्यासाठी पाण्याचे काम करतात. पाण्याने बांधकाम पक्के होते, जितके पाणी माराल तितके, ते काॅंक्रीट घट्ट रहाते. तडे जात नाही त्याला ! या अशा बनलेल्या काॅंक्रिटने आपला पाया बनतो, दिसत नाही तो कोणाला ! पण आपल्याला कळायला हवं की आपला पाया कसा बनला आहे, कशाचा बनला आहे.
बघा, हा विषय तसाच राहून गेला. आपल्या ताकदीच्या बाहेर काही कामं आपण करू शकत नाही. पण मग मी मनाशी ठरवलं की एखादा गाण्याचा कार्यक्रम फक्त हिच्यासाठी करायचा ! आयुष्यभर घरी बसल्याबसल्या, भलेबुरे ऐकत संगीताची केलेली तिने सेवा ! हो सेवाच, गांवच्या मानाने आणि शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीच्या मानाने, तिला त्यातून समाधाना व्यतिरिक्त फार काही आर्थिक मिळालं नसावे ! गांवात कोणी शास्त्रीय संगीताची जाणकार व्यक्ती आली, की आवर्जून निमंत्रण यायचं आईला, हाच तो काय मान ! घरातील कर्त्याला आयुष्यभराची साथ देतांना, आकाशवाणीची कलाकार होण्याची संधी पण तिला, वेडावून दाखवत, तिच्यासमोरून निघून गेली ! ‘आपल्या भाग्यात नाही’ म्हणत, संगीताच्या वाटेवर चालणं काही तिनं थांबवले नाही. ‘गाणं गायलं की संसाराचं गाणं होते, हे पण ऐकवलं गेलं !
अलिकडे आईवडिलांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर, माझ्या पत्नीने मुद्दाम तिच्यासाठी आणलेली पैठणी घेवून आम्ही रावेरला गेलो, तेव्हा त्यांना वाटलेले समाधान आईवडिलांच्या डोळ्यांत दिसत होते, शब्दातून व्यक्त झाले नसेल भलेही ! तीन वर्षांपूर्वी वडील गेले. इतक्या वर्षांचा सोबतीचा आधार गेला. तिला अजून विषण्णता आली. हे मनांतल्या मनातील आक्रंदन फार वाईट ! आयुष्यभर काट्याकुट्याच्या रस्त्यावर चालावं लागणारा, तसा योग घेवून येणारी ही मंडळी, जगांत कुठं गुळगुळीत व सुखद रस्ते पण असतात आणि त्यांवर पण काही जण चालत असतात, हेच विसरून जातात !
मला कामानिमीत्ताने इथं उच्च न्यायालयांत वकिली करण्यासाठी आल्यावर, असंख्य वेळा विमानाने प्रवास करण्याचा योग आला. याचा पाया कोणी घातला, हे मनांत आलं आणि मग तिचा, तिच्या नातीसोबत विमानप्रवास मुद्दाम ठरवला व झाला.
‘तुझे भाऊ असते, तर विमानातून फिरून आलो, हे सर्व गांवभर आठ दिवस सांगीतलं असतं.’ तिची प्रतिक्रिया !
नंतर गेल्या महिन्यात मावशी, तिची धाकटी बहीण, गेली. ही गाण्याच्या कार्यक्रमाची माझी इच्छा पुन्हा वर आली. मुलांनी आणि पत्नीने ‘आता तुमची इच्छा आहे ना ? करून टाका. कार्यक्रम रावेरलाच ठेवा. जळगांव किंवा औरंगाबादला नको. त्यांचे सगळं आयुष्य रावेरमधे गेलं आहे. आपल्याला त्रास झाला तरी चालेल !’ म्हणून आग्रह धरला. कार्यक्रम करायचा, तर परिचित कलाकार मंडळी देशाबाहेर ! शेवटी भेटायचे ठरवले, ते फेसबुकमुळे मित्र झालेले, श्री. मंगेश वाघमारे यांना ! आकाशवाणीत निवेदक म्हणून असलेले आणि संगीतातील दर्दीच नाही, तर शास्त्रशुद्ध संगीत शिकलेले ! आकाशवाणी निमित्ताने बऱ्याच संगीत क्षेत्राशी संबंधीत असलेल्यांचा नियमीत संपर्क तेथील मंडळींशी येत असतो, याची कल्पना होतीच. मग यांना आकाशवाणीतच भेटलो. आपला सूर कोणाशी जुळू शकतो, हे लक्षात आले की काहीही मनमोकळेपणाने बोलायला अडचण नसते.
‘तुमच्या डोळ्यांसमोर कोण आहेत?’ हे त्यांनी विचारल्यावर माझ्या मनांतील नांवे सांगीतली आणि त्याचा उपयोग नाही, हे पण सांगीतले. त्यांच्याकडची काही नांवे विचारली. आकाशवाणी मार्फत कार्यक्रम व्हायचे, तसा रावेरला ठेवता येईल का ? हे पण विचारले.
‘माझी इच्छा खूप आहे, पण तेवढी ताकद नाही. ही मंडळी माझी आहेत, माझ्यासाठी येतील. तिथं पैशाचा प्रश्न नाही, पण ती उपलब्ध नाही. आईसाठी कार्यक्रम करायचा आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ती सेवा करतेय ! वाटलं तिच्यासाठी कार्यक्रम करावा. सध्या या वकिली व्यवसायाने, माझा या संगीत क्षेत्राशी जवळपास संपर्क तुटलेला आहे.’ मी ! माझी अडचण त्यांच्या लक्षात आली.
‘धनंजय जोशी, म्हणून आहे. नांदेडचे !’ श्री. मंगेश वाघमारे ! मी नांव ऐकलेले नव्हते.
‘आईच्या जुन्या पिढीच्या दृष्टीने सांगा.’ मी !
‘काही काळजी करू नका. चांगलं गाणारा आहे. श्रोत्यांची नाडी ओळखणारा आहे. याची मैफिल रंगते.’ श्री. मंगेशजी ! माझ्या चेहऱ्याकडे पहात ‘त्याची काही काळजी करू नका !’
‘काही हरकत नाही. मग लावा फोन !’ मी.
त्यांना फोन लावला आणि बोलणे झाले. १० / ११ एप्रिल रोजी ठेवता येईल, हे ठरलं. नक्की तारीख सांगतो म्हणून सांगीतले. दिनांक ११ एप्रिल कार्यक्रमाची ठरली.
नंतरचा मोठा प्रश्न, म्हणजे कार्यक्रमाची व्यवस्था आणि जबाबदारी ! कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून झटणारी मंडळी जशी असतात, तसाच कार्यक्रमाचा बोऱ्या कसा वाजेल, त्यांत विधोळ कसा होईल, हे पण कटाक्षाने पहाणारी व तसा आवर्जून प्रयत्न करणारी पण मंडळी असतात. काळजी वाटते, ती त्यामुळेच ! मग आठवण आली, ती अजूनही तीन पिढ्यांचे संबंध टिकवून ठेवणारे आठवले कुटुंबियांची ! डाॅ. राजेंद्र आठवले, हा माझा बालमित्र ! त्याला फोन लावला !
‘तुझ्याजवळ पैसे जास्त झालेत, म्हणून तू कार्यक्रम करत नाही, तर आईबद्दलच्या भावना आहेत म्हणून करतोय. कित्येक वर्षे ‘सांस्कृतिक कलामंच, रावेर’ कार्यक्रम करतेय. निर्मलाकाकूंचा सत्कार ठेवू आणि या निमित्ताने गाणे ! हे ठरवण्यासाठी इथं येण्याजाण्यात वेळ आणि पैसे घालवू नको. मी पहातो व्यवस्था कार्यक्रमाची ! काही अडचण असेल तर, आपल्याला फोनवर बोलता येते.’ त्याचा तीन पिढ्यांच्या नात्याला जागत मला दिलेला धीर व सल्ला ! त्याच्या या आश्वासनावर, मी निश्चिंत झालो. आणि मग सर्व जवळच्या नातेवाईकांना आणि जुन्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायला लागलो. मला जे निरोप देण्यासाठी जे फोन नंबर हवे होते, ते विनातक्रार, मी वेळीअवेळी मागीतले तरी, श्री. जयंत कुलकर्णी देत होते.
गाण्यासाठी लागणाऱ्या साथीदारांची आठवण झाल्यावर, पहिले नांव आठवले, ते मला पूर्वी तबला शिकवणारे कै. बबनराव भावसार यांचा नातू श्री. पंकज भावसार याचे ! पण तो पुण्यात स्थायिक झालेला असल्याचे समजले. मग दुसरे मित्र श्री. विभाकर कुरंभट्टी यांच्याकडून श्री. संजय पत्की, जळगांव यांचे नांव समजले. यांच्याशी संपर्क साधल्यावर ‘श्री. धनंजय जोशी हा माझा मित्र आहे. माझे साथीदार घेवून जा. जमलं तर मी पण कार्यक्रमाला येईल.’ म्हणत मनमोकळेपणाने परवानगी दिली. तो ताण कमी झाला. ‘कोणी मिळाले नाही, तर मला सांग !’ हे माझे वर्गमित्र श्री. विजय सपकाळे, जळगांव आकाशवाणी निर्देशक यांचे आश्वासन होतेच. ‘कलाकारांच्या रहाण्याची व्यवस्था माझ्याकडे’ इति श्री. प्रमोद निंबाळकर, माझा वर्गबंधू !
दि. ११ एप्रिल रोजी पहाटे मी, हा कार्यक्रम मूर्त स्वरूपात आणणारे, श्री. मंगेश वाघमारे आणि गायक कलाकार श्री. धनंजय जोशी असे सोबत औरंगाबादहून निघणार होतो. आदल्या दिवशी श्री. मंगेशजींनी पहिली अडचण पुढे आणली. कार्यक्रमाला त्यांचे येणे जमणार नव्हते. आदल्या रात्री जळगांवहून साथीदारांना घेवून जाणाऱ्या टॅक्सीवाल्याने जमत नाही, म्हणून दुसरी अडचण पुढे ! म्हटलं इजा, बिजा आणि तिजा होतो की काय ? पण तसे झालं नाही, शेवटी ११ एप्रिलला सकाळी मी व श्री. धनंजय जोशी औरंगाबादहून जळगांवमार्गे रावेरला निघालो. मधे थांबत जळगांवहून हार्मोनिअमवर साथ करणारे श्री. अक्षय गजभिये आणि भुसावळहून तबलावादक श्री. तेजस मराठे यांना घेतले आणि रावेरला पोहोचलो.
‘तुझे भाऊ असते, तर आठ दिवस गांवात निमंत्रण देत फिरले असते.’ मी घरी पोहोचल्यावर आईचे सांगणे ! प्रत्येकाचा झालेला आनंद व्यक्त करण्याची पद्धत असते. या अशा वेळी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ आयुष्यात सोबत करणाऱ्याची आठवण येणं, हे अत्यंत स्वाभाविक होते. आईच्या डोळ्यातलं पाणी सांगत होतं. सर्व लेकीसुनांचे निरोप येत होते, काही आल्या होत्या. तिचा आनंद व समाधान डोळ्यातून वहात होतं.
श्री. धनंजय जोशींनी घरी आल्यावर आईला नमस्कार केला. त्यांचे बोलणे सुरू झाले. आई तिच्या जुन्या आयुष्यात पं. कृष्णराव पंडीत, पं. सी. आर. व्यास, तिचे गुरू कै. गोविंदराव कुलकर्णी, ग्वाल्हेर गायकी वगैरेत रमली. नंतर जेवणं झाली. संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी आई पैठणी नेसून आली होती. तिच्या सुनेने, माझ्या पत्नीने आईवडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस केला, त्यावेळी दिलेली ! कित्येक वेळा एखाद्याचे तासभर बोलणं सांगणार नाही, तेवढी एक छोटी कृती सांगून जाते.
कार्यक्रम सुरू झाला. तिचा संस्थेमार्फत, तिच्या विद्यार्थ्यांकडून, गावकऱ्यांकडून सत्कार वगैरे आटोपला. श्री. धनंजय जोशी यांचा त्यांच्या संगीतातील कार्याचा परिचय करून देतांना, ‘हे नांदेडला इंजिनिअरिंग काॅलेजला भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहे’ म्हटल्यावर कडाडून टाळी ! मी म्हणालो पण त्यांना, ‘तुमच्या भौतिकशास्त्राला टाळी पडली बुवा !’ त्यांना पण मनापासून हसू आलं. —- आणि कार्यक्रम सुरू झाला. रंगायला लागला. श्रोत्यांना उठू नये असं वाटत होते, कार्यक्रम संपू नये असं वाटत होते, पण निवडणूक आचारसंहितेमुळे तो नाईलाजाने सव्वा दहापर्यंत आटोपावा लागला.
श्री. धनंजय जोशींना दुसऱ्या दिवशी सकाळी सचखंड एक्स्प्रेसने जायचे होते. पहाटे उठून रावेरहून भुसावळला गाडी पकडायची होती. सकाळी आम्ही उठलो. त्यांना पण ही माणसं बरी आहेत, असे वाटले असावं. सौ. चहा करत होती.
‘चेक दिला तर चालेल का ?’ मी विचारले.
‘चालेल !’ त्यांचे उत्तर !
चेक लिहीला आणि दिला. त्यांनी न पहाता सरळ खिशात टाकला. चहा आटोपला आणि भोकरीकर गल्लीतच टॅक्सी होती. त्यांत बसलो. टॅक्सी भुसावळला निघाली. रस्त्यात आणि रेल्वे उशीरा येणार असल्याने, प्लॅटफॉर्मवर भरपूर, अगदी घरगुती पण गप्पा झाल्या. गाडी आल्यावर ते बसले. मी परत रावेरला निघालो.
परत येतांना एकेक लक्षात आले. परमेश्वराने या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कोणाकोणाला पाठवले होते नाही ? अजून एक लक्षात आले, की आपल्याला श्री. मंगेश वाघमारे यांनी, या निमित्ताने फक्त चांगला कलाकारच नाही दिला, तर एक चांगला माणूस दिला आहे. आपल्याला माणसं खूप भेटतात, त्या यादीसाठी मोठे रजिस्टर लागते. मात्र चांगल्या माणसांसाठी यादी करायची, तर छोटी डायरी पुरते, कधीतरी एखादं नांव त्यांत लिहीलं जातं. माझ्या या छोट्या डायरीत जुन्या नावांसोबत, पूर्वी श्री. मंगेशजींचे होते. आता परवा अजून एक नांव वाढलंय - श्री. धनंजय जोशी, नांदेड !
(पोस्ट आवडली असेल, तर आनंदाने शेअर करा)

14.4.2019

Image may contain: 3 people, text

No comments:

Post a Comment