Thursday, June 27, 2019

काल मराठीतील प्रसिद्ध गीतकार, कै. जगदीश खेबुडकर आपल्यातून कायमचे जायला आठ वर्षे झालीत ! दिनांक १० मे, १९३२ या दिवशी या जगात प्रवेश केलेल्या, या सव्यसाची प्रतिभा असलेल्या कवीचा, शारदपुत्राचा, या जगातील प्रवास, दिनांक ३ मे, २०११ रोजी संपला आणि नंतर सुरु झाला, तो त्याचा अनंताचा प्रवास ! आपल्या शिक्षकाच्या आयुष्यात असंख्य अडीअडचणींना तोंड देत, समाजाच्या वागणुकीचे चटके खाल्लेला हा शिक्षक ! आपल्याला त्या दुःखद आठवणी विसरून, जीवनाचे तत्वज्ञान आपल्या काव्यातून देतो. काय असेल ते असो,पण समाजाने केलेल्या अन्यायाचे, चटके भोगलेल्या माणसाबद्दल मला नेहमीच अतीव करुणा वाटते. संत ज्ञानेश्वर म्हणा, संत तुकाराम म्हणा का हे अलीकडचे 'जगदीश खेबुडकर' म्हणा !
'कै. व्ही. शांताराम' या दिग्गज चित्रपट दिग्दर्शकाने, कै. शंकर पाटील यांच्या कथेवर, काढलेल्या 'पिंजरा' या चित्रपटातील गीते ! नेहमीच आपल्या काळ्या मातीचा सुगंध देत, हृदयाला हात घालत, सर्वच गीतकारांच्या गीतांना कर्णमधूर आणि योग्य त्या रागावर आधारीत संगीत देणारे, आमचे लाडके संगीतकार, कै. राम कदम' ! हे गीत त्यांनी बांधले आहे - 'पिलू' रागात ! 'काफी' थाटातील हा राग, भगवान श्रीकृष्णाच्या लीलांची वर्णने आणि प्रार्थना गायल्या जातात या रागात ! गायले आहे, लता मंगेशकर यांनी !
आणि अजून सांगायचे तर ---- एका तमासगीर बाईच्या तोंडून आदर्श शिक्षकाला 'अध्यात्माची कहाणी' सांगणारे हे गीत, हे या हाडाच्या शिक्षकाने लिहीले आहे.
अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी
ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी
नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन् लुगडी
बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी?
ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी?
तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी!
हात जोडिता बंधन तुटले
अता जीवाला मीपण कुठले?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी!

4.5.2019

No comments:

Post a Comment