Thursday, June 27, 2019

वर्षभराचे उडदाचे पापड !

वर्षभराचे उडदाचे पापड !
गेले काही वर्ष, होळीपर्यंत कशीबशी टिकून असलेली थंडी, एकदा का ती जळाली, की धूम पळायची ! ‘होळी जळाली, अन् थंडी पळाली’ हे तर मी लहानपणापासून ऐकत आलोय. आता थंडी, दूर पळण्याइतपत मुक्कामच करत नाही, किंवा तिला पळवायला होळीचा मोठा जाळ पण करावा लागत नाही. आता थंडी अधूनमधून डोकावते, उगीच जरा आठवडा-पंधरवाडा टेकल्यासारखी करते आणि गुपचूप निघून जाते. हिवाळा आणि पावसाळा हे कॅलेंडरच्या महिन्यांवरून सांगावे लागतात, येणाऱ्या अनुभवावरून नाही, इतपत प्रगती झाली आहे आपली ! मात्र सध्या होळी जरी थंडी पळवण्यासाठी राहिलेली नसली, तरी होळी म्हटलं की जशी ‘पुरणपोळी’ आठवते, तसंच वर्षभराची बेगमी म्हणून घरांत केले जात असलेले, ‘पापड, कुर्डया, शेवया, लोणची वगैरे’ पदार्थ आठवतात. आपल्याकडे कोणतेही पदार्थ करायचे तर कौशल्य, शक्ती व सुगरणपणा लागतोच ! आळशीपणा, निष्काळजीपणाने कोणतीही गृहिणी सुगरण म्हणून वाखाणली जात नाही.
होळीनंतर बहुतेक वार्षिक परिक्षांचे वेध विद्यार्थ्यांनाच काय, पण सर्वांनाच लागलेले असतात, आणि त्याच काळात बहुतेक पहिला दणका पडतो, तो म्हणजे घरचे ‘उडीदाचे पापड’ ! हे पापड करायचे, आणि विशेष म्हणजे घरी करायचे, हे म्हणजे नुसते खायचे काम नाही. उडीदाची डाळ भिजवून तिची साले काढावी लागतात. ती स्वच्छ पुसून घ्यावी लागते. मग ती चांगली पांढरीस्वच्छ दिसायला लागते, मग ती चांगली खणखणीत वाळवली, की किंचीत पिंगट झाक असलेली दिसते. पुढचा कार्यक्रम म्हणजे ती चक्कीतून दळून आणणे. अलिकडे या छोट्या चक्क्या निघाल्या आहेत. पूर्वी नेहेमीच्या मोठ्या चक्कीतूनच उडीदाची डाळ दळून आणावी लागे. उडीदाचे पीठ हाताला फार गुळगुळीत लागते, अगदी सिंतरासची पावडर ! पीठ आले की मग त्याचा मसाला आणण्याचे काम ! पापडखार, मीरे, हिंग, मीठ हे मुख्यत: लागते. दुकानातून मसाला आणायला आम्ही दुकानात गेलो, की हमखास एखादी वस्तू विसरायचे किंवा वेगळेच नांव आठवायचे. हा गोंधळ पाहून सुरेशशेट आम्हाला विचारायचे -
‘घरी काय करताय ? उडदाचे पापड का ?’ त्यांचा प्रश्न.
‘हो.’ आम्ही नकळत होकार द्यायचो. त्या होकारात आपल्या घरची बातमी यांना कशी समजली याचं पण आश्चर्य असायचं.
‘पापडखार, हिंग, मीरे आणि ते दळलेले मीठ आण.’ हे सांगणे दुकानातील माणसाला असायचे. तो ते आणून ठेवायचा. ते पाहून,
‘अरे, बोलण्याकडे लक्ष असावे. पापड करायचे, तर भारी पापडखार हवा. हिंगाची डबी नको, ‘हिरा हिंग’ हवा आणि मीरे पाणीदार हवे. मग पापड चांगले होतात.’ सुरेशशेटला असंख्य गृहिणींनी आजवर दिलेले ज्ञान, आमच्या विसरभोळेपणाच्या वेळी कामास यायचे. तो सर्व मसाला घरी घेवून आले, की आई म्हणायची -
‘काय आणलंय पाहू ? भलतंच तर नाही ना. तुला ‘हिरा हिंग’ सांगायचे राहून गेले.’ असे बोलतबोलत ती पुड्या उघडायची, त्या अगोदरच हिंगाचा वास आलेला असायचा. पुडी उघडल्यावर, ‘हो, हाच हिंग’ ! म्हणत समाधान व्यक्त करायची.
त्यावेळी पदोपदी निरोप देण्यासाठी, प्रत्येकाजवळ भ्रमणध्वनी नसायचे. बऱ्याच वेळा, तर आणलेला सामान परत पण करावा लागायचा आणि ‘एकदा दिलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही’ अशा मजकूराच्या दुकानातील पाटीच्या साक्षीने, तो माल परत घेवून, दुसरी वस्तू दिली जायची. त्यावेळी इतके तंतोतंत व काटेकोरपणे नियम पाळण्याचा कोणाचा आग्रह नसल्याने, व हक्कांबाबत कमालीची जागरूकता नसून देखील, कर्तव्ये बऱ्यापैकी आठवत असल्याने, तारतम्य ठेवत व्यवहार चालायचे. त्यामुळे एकंदरीत समाजात तशी बऱ्यापैकी शांतता असायची.
सर्व गृहिणींचा विशेष भर असायचा, तो म्हणजे ‘पापड भाजल्यावर तो लाल व्हायला नको’ ! लाल झाला की काहीतरी भट्टी बिघडली ! तो कशामुळे लाल होतो, याबद्दल प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते, नव्हे असायचे आणि ते सोदाहरण आठवून सांगीतले जायचे. हे आणलेले सर्व मसाल्याचे पदार्थ छोट्या खलात कुटले जायचे. वस्त्रगाळ केले जायचे. ते पाण्यात टाकून, ते पाणी मसाल्याचे केले जायचे. मीरे, हिंग पोळपाटावर लाटून पुन्हा बारीक करून भिजवून ठेवला जायचा. जर पुन्हा लावायची वेळ आली तर, हे पाणी लावले जायचे. चक्कीतून आणलेले उडदाचे पीठ, अगदी थोडेथोडे मसाल्याचे व साधे पाणी टाकत, घट्ट भिजवले जायचे. मीरे जाडसर रहायला नको, लाटतांना पापड फुटतो.
सर्व पीठ भिजवून, त्याचा जरा ओलसर गोळा झाला की त्याचे छोटे गोळे व्हायचे. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या दगडी पाट्यावर, गोड्या तेलाचा घळघळीत हात पसरला जाई. पाटा अगदी काळ्याभोर कातळासारखा चमकायला लागे. ही पाट्याची पूर्व तयारी झाली, की ते उडीदाचे छोटे गोळे, एक एक करून, मग पाट्यावर ठेवून उलट्या लोखंडी बत्तीने चांगले ठोकून मळले जात. यासाठी बत्ती चांगली वजनदार असावी लागे, तेव्हा पीठ लवकर तयार होत असे.
यावेळी तेलाची काटकसर करायची नसते, हे घरातील बाईला माहित असले, तरी ती तेल कमी लावून मदतीला आलेल्या इतर बायांचा पिट्टा पाडेल या धास्तीपायी, मुळातच हुशार व धोरणी असलेल्या बायका, या आवर्जून गोळा कुटायचे काम अगोदरच ठरवलेल्या बाईला देत असत. एकंदरीत चांगला सढळ हात असलेली बाई गोळा कुटत असे. पाट्यावर लावायला, गोळा कुटायच्या बत्तीला किंवा गोळ्याला तेल कमी पडले, की गोळा, लोखंडी बत्ती आणि पाटा, यांची इतकी काही ‘युती’ होई की, काही केल्या ती तुटत नसे. सगळा गोळा पाट्याला चिकटून बसे. उडदाचे पीठ एरवीच चिकट असते, त्यामुळे तेल सढळपणे वापरावे लागे. गोळा चांगला कुटून, नरम झाला की तो पण चमकू लागे. मग त्याच्या छोट्याछोट्या बोराएवढ्या, सुपारीएवढ्या आकाराच्या लाट्या केल्या जात. पुढचा प्रश्न येई की चव कशी झाली आहे, याचा ! मग जवळच असलेल्या छोट्या वाटीत असलेल्या तेलात, ती छोटी लाटी बुडवली जाई आणि मग ‘चव कशी झाली’ हे बघायला आम्ही तयारच असत. तेलात बुडवलेली लाटी तोंडात टाकत आणि थोडा जोर लावून दांत वर उचलत, आम्ही सांगत -
‘तिखट वाटतंय !’ मग बाजूला साधे पीठ एकत्र करून पुन्हा कुटले जाई. त्यापूर्वी त्या सर्व जणी पण चव घेत. सर्वमताने जसे ठरेल तसे होई. फिके असेल, तर मीरे हिंगाचे पाणी लावून गोळा पुन्हा कुटला जाई.
या लाट्यांचे पापड करून, ते वाळवून, मग वर्षभर साठवणूक करत, सणावाराला किंवा विशेष प्रसंगी, गरमागरम खिचडीच्या वेळी काढायचे आणि तोपर्यंत वाट बघायची, हा आम्हाला त्यावेळी खूप अन्याय वाटे. जास्तीत जास्त लाट्या खावून आपण जर, गोळा संपवला, तर पापड लाटायचे त्या सर्वांचेच श्रम कमी होतील, हा आमचा सूज्ञ विचार कोणालाच पटत नसे. मग त्याचा वचपा आम्ही, ज्यांचे दांत पडले आहेत किंवा हलत आहेत किंवा तोंडाचे पूर्ण बोळके झाले आहे, अशांना लाटी खायला देवून काढत असू. झाकून आणलेल्या वाटीतील लाटी बघीतली, आणि ती खावू नये असे वाटले, तरी तिचा येणारा घमघमाट त्यांना ती खायला भाग पाडे, मग पट्कन लाटी तोंडात जावून बसे. नंतर येणारी मजा, बघायला आणि संकटातून सुटका झाल्यावर ऐकायला, अनुभवायला आवडायची.
दांत हलत असले व लाटी खाल्ली, तर ती लाटी नीट खाल्ल्याने पोटांत जाण्याऐवजी, नेमकी हलणाऱ्या दाताला चिकटायची ! ते मोकळे करायला जावे, तर लाटीसोबत दांत बाहेर येण्याची भिती ! जिभेने लाटी बाजूस सारण्यासाठी जोर दिला, तरी बत्तीचे घाव सोसून मजबूत बनलेली लाटी, या मऊसूत जिभेला काय दाद देणार ? जीभ दुखायला लागायची, पण लाटी तिथेच ! नंतर शंका यायची की ‘दांत’ तर निघाला नाही ? मग बोटाने चाचपून खात्री केली, तर अजून गोंधळ ! आरशात बघीतले, तर सर्व जबडा दिसायचा पण लाटी नाही. मग पाणी पिवून गुळण्या केल्या जायच्या ! पाणी पिवून पोट टम्म व्हायचे. गुळण्या करूनही तोंड दुखायला लागायचे, आणि दांत तर पडला नसेल ? या शंकेने गुळण्या थांबायच्या ! चांगली चव असलेली लाटी, तोंडाची चव घालवून टाकायची.
‘सूनबाई, किती चिकट केलेय पीठ ? तेल तरी लावून द्यायची लाटी !’ सासूबाईचा अधिकार असलेली, तेथील सूनांना म्हणायची !
‘तुम्हाला कोणी आणून दिली ? सांगीतले असते, तर तेल लावून नरम दिली असती !’ त्यांच्यातील कोणीतरी विचारायची, पण त्याला काही अर्थ नसायचा.
‘चव चांगली आहे.’ म्हणत बिचारी तेथून निघून जायची.
ज्यांच्या तोंडात अजिबात दांत नाही, त्यांची चावण्याची शक्ती जवळपास संपुष्टात आलेली असते, पण जिव्हालौल्य काही कमी झालेले नसते. उलट पदार्थाचा आस्वाद दातांमुळे नीट घेता येत नसल्याने, ‘हे खावे, का ते ?’ अशी अवस्था त्यांची झाली असते. अशा स्थितीत जर, ही लाटी तोंडात गेली, तर दोन्ही जबड्यांच्या हिरड्या, जीभ आणि लाटी यांचा असा काही ‘फेव्हिकाॅल जोड’ होतो, की त्यांना तोंडच उघडतां येईनासे होते.
‘उॅं, उॅं’ करत जेव्हा ते माजघरात येतात, तेव्हा मग खाणाखुणा सुरू होतात. कोणाला समजेनासे झाले की -
‘आजोबा, तोंडात लाटी चिकटली आहे का ? खावू नका, म्हणून मी म्हणालो होतो. पण, तुम्ही म्हणे चवीपुरता दे ! मग काय करू ?’ एक आगावू कारटा !
तेवढ्यात इतक्या प्रयत्नाने तोंड उघडल्याने, एखादा कल्हईवाला तापलेल्या भांड्यातून कथिलावर कल्हई चांगली बसावी, म्हणून ज्या चपळाईने आणि घाईघाईने कापसाचा बोळा जसा, फिरवतो आणि भांडे मोकळे व चकचकीत करतो, त्याप्रमाणे त्यांनी तोंडात आपले बोट फिरवून आणि तोंड मोकळे करून, खळखळून गुळण्या केल्या जायच्या.
‘हुश्श ! यंदा लाट्या फारच चिकट केल्या आहेत. भट्टी जमली नाही का नीट ?’ अवघडलेल्याने दुखत असलेल्या गालाचा अनुभव घेत व झालेल्या फजितीचा वचपा आजोबा काढतात !
‘काका, तोंडात अजिबात दांत नाही का ?’ एक नवोढा !
‘तुम्ही पोरी, वर्षभराचे करता, आणि अनुभव पण वर्षभर लक्षात राहील असा देतात !’ म्हणत आजोबा बैठकीत निघून जातात.
या गंमतीतून एकमेकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी ऐकत, बोलत माजघरांत रेघांच्या लाटण्याने हे पापड लाटले जायचे. एकमेकांना चिकटू नयेत, म्हणून सारखे हलवत ते वाळवले जायचे. दुपारी उन्हाच्या वेळी सुरू झालेला, चौथ्याचा तो गोळा यांच्या गप्पांत संध्याकाळ व्हायच्या आंत संपवला जायचा. मध्यंतरी त्यातीलच जरा वयाने लहान असलेलीला कोणी, चहापाण्याचे सांगायचे. मग ती चहा-सरबत काहीतरी करायची. सर्वांचे आटोपल्यावर, न सांगता ती भांडी घासून विसळून पण ठेवायची. संध्याकाळी दिवे लागणीची वेळ समोर दिसू लागायची. मग काही वेळा जाडसर का होईना, पण लाटत ते सर्व पापड संपवले जायचे. दिवे लागणीला या सर्वांच्या लक्ष्म्या त्यांच्या त्यांच्या घरात हव्या असायच्या. काम आटोपून या लक्ष्म्या आपापल्या घरी रवाना व्हायच्या. आठवडा-पंधरवाडा आळीपाळीने गल्लीतील सर्व घरांत हा कार्यक्रम सुरू असायचा !
—- आता पापड हवे असले, की कोणाला होळीपर्यंत वाट बघावी लागत नाही. किराणा दुकानांत गेले, पैसे दिले आणि पापड मागीतले की प्लॅस्टीकच्या पिशवीतील पापड हातात येतात. पापड मिळतात, पण त्या मागच्या या सर्व कुरकुरीत गोष्टी त्या पापडासोबत येत नाही.

29.3.2019

No comments:

Post a Comment