Thursday, June 27, 2019

राग - भैरव

राग - भैरव
आपल्या बहुसंख्य आठवणींचे बीज हे लहानपणीच्या कुठल्यातरी घटनेमधे दडलेले असते. वटवृक्षासारखे न दिसणारे हे बीज, अशी काही, अलिकडे जरी घटना घडली तरी, आपल्याला थेट बालपणांत घेवून जाते. आपल्या तारूण्याचे भरभक्कम खोड आणि या डौलदार पानसंभाराला, जीवनामृत देण्याचे काम, बालपणी मजबूत झालेली मुळे करीत असतात.
दिवाळीच्या सुटीत आजोळी जळगांवी जायचो, त्यावेळी कार्तिकी एकादशीचा जळगांवचा रथोत्सव असायचा. त्या दरम्यान कार्तिक शुद्ध १४ म्हणजे ‘वैकुंठ चतुर्दशीस’ ‘हरिहर भेट’ असायची. जगाचा पालनकर्ता भगवान विष्णु हा ‘हरि’ आणि संहारकर्ता भगवान शिव हा ‘हर’ यांची भेट होते यादिवशी, ही श्रद्धा ! एरवी विष्णुला तुळस आणि शिवाला बेल वहायची ही पद्धत, ‘हरिहराची भेट’ दिसावी म्हणून बदलवली जायची. त्या दिवशी विष्णुला बेल तर शिवाला तुळस अर्पण केली जायची. यांतून समजायचे की ही ‘हरिहर भेट’ आहे.
त्या दिवशीची अजून विशेष गोष्ट लक्षात आहे म्हणजे, त्यांच्याकडच्या रोजच्या देवपूजेबद्दल ! पायावर पडले तर पायाचे बोट फ्रॅक्चर होवू शकेल, एवढ्या जड असलेल्या तांब्याच्या ताम्हणात सर्व देव पूजेला काढले जायचे, पूजा करून त्याच्या ठिकाणी देवघरांत ठेवले जायचे. अभिषेक करायच्या दिवशी, देव उजळवायच्या दिवशी मग चिंच, शिकेकाई, रांगोळी यांचा वापर करून, ते चकचकीत केले जायचे.
नित्यपूजेत मग अभिषेक सुरू व्हायचा. त्यांची कुलस्वामिनी देवी असल्याने ‘श्रीसूक्त’ म्हणून अभिषेक व्हायचा. विष्णुच्या ‘शाळीग्रामास’ पुरूषसूक्ताने तर महादेवावर ‘रूद्रभिषेक’ व्हायचा. अभिषेक करतांना रूद्राध्यायातील ‘चमक’ ऐकतांना ‘चमे चमे’ ऐकू यायचे आणि ‘नमक’ ऐकतांना ‘नमो नमो’ ऐकू यायचे, खूप छान वाटायचे.
नमकाचा एक नमुना बघायचा तर -
नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो
नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो
नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो
नमो बभ्लुशाय विव्याधिनेऽन्नानां पतये नमो
नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो
नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो
नमो रुद्रायाऽऽतताविने क्षेत्राणां पतये नमो
चमकाचा एक नमुना बघायचा तर -
वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मेऽपानश्च मे व्यानश्च मेऽसुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मेऽस्थानि च मे परूंषि च मे शरीराणि च मे ||
आणि त्यांत येणारा ‘महामृत्युंजय मंत्र’ -
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
या अशा जगत्संहारकर्त्या शिवाचे गण, त्यांचे अक्राळविक्राळ दिसणे, अघोरी साधना, आणि शत्रूचा अक्षरश: विध्वंस करून आपल्या कैलालोकी जाणारे ते स्मशाननिवासी महादेवाचे, शंकराचे सेवक ! सर्वच अनाकलनीय व अद्भूत वाटायचे. ‘चांदोबा’ मासिकात त्यावेळी ‘शिवपुराण’ म्हणून मुलांना समजतील अशा गोष्टी यायच्या. चित्रे पण खूप छान असायची. त्यातून शंकराचे एक नांव - भैरव, हे चांगलेच लक्षात राहिले. भैरव म्हणजे भयानक, भयापासून रक्षण करणारा ! आग ओकणारा त्रिनेत्र, विशाल शरीराचा, काळे वस्त्र परिधान केलेला, रूद्राक्षाच्या माळा घातलेला, हातात लोखंडाचा दंड घेतलेला आणि काळ्या कुत्र्यावर आरूढ झालेला, हा ‘तामसी’ मानला गेलेला देव !
सृष्टीची निर्मिती म्हणजे सृजन हे सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे काम, त्याने निर्मिलेल्या सृष्टीचे पालन हे भगवान विष्णुचे काम, ते आपण महत्वाचे मानतोच ! कदाचित यापेक्षा पण महत्वाचे असे काम म्हणजे, या सृष्टीचा विनाश करणे, संहार करणे, हे सृष्टीचा संहारकर्ता म्हणून भगवान शंकराचे काम ! या सृष्टीला लागलेले दोष, लागलेली कीड, इथं झालेले पापात्मे यांचा संहार जर केला नाही, तर नव्या सृजनशक्तीचा अविष्कार करायला ब्रह्मदेवाला जागा तरी मिळेल का ? पालनपोषण करायचे, तर भगवान विष्णुंनी या पापात्म्यांचे करायचे काय ? नवसृजनासाठी जागा हवीच, म्हणून भगवान शिवाची ही सर्व स्मशाननिवासी मंडळी फार महत्वाची आहे, आपल्या या सृष्टीसाठी !
भैरव म्हणजे शंकराचा अवतार एवढेच माहिती असल्याने, आईने तिच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला येणाऱ्या मुलींना, बहुतेक त्या ‘प्रवेशिका पूर्ण’च्या विद्यार्थी असाव्यात, ‘आज तुम्हाला ‘भैरव’ राग शिकवायचा आहे.’ हे सांगीतले, तेव्हा गंमत वाटली, आश्चर्य वाटले. शंकराच्या नांवाचा राग ! वा छान ! त्यावेळी त्यानुसार आवश्यक माहिती आई मुलींना देत होती. तुम्हा आम्हा सर्वांना ही तांत्रिक माहिती हवी असतेच, कारण आपल्याला राग डोळ्यांसमोर उभा करायला, गळा असेलच, असे नाही. ज्यांना गळा आहे, ते भाग्यवान ! त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त !
हा राग भैरव थाटातून निघतो. हा भैरव थाटाचा आश्रय राग आहे. या रागाची जाती संपूर्ण संपूर्ण आहे, म्हणजे यांत सर्व सात स्वर लागतात. या रागात ‘रिषभ’ आणि ‘धैवत’ कोमल लागतात. या रागाचा मुख्य स्वर म्हणजे ‘वादी’ हा धैवत, त्यानंतरचा मुख्य स्वर ‘संवादी’ हा रिषभ आहे. हा राग उत्तरांगप्रधान आहे. या रागाची गाण्याची वेळ समयचक्रानुसार पहाटे, संधीप्रकाश असतांना - साधारणत: ४ ते ७ अशी मानतात. त्यामुळे सकाळी हा राग खरोखरच ऐकायला छान वाटतो. या रागाची प्रकृती भक्ती आणि गंभीर आहे. परमेश्वराची आपल्यावर कृपा होत नाही, परमेश्वर आपल्यावर दया करत नाही, या भावनेतून भक्तीरसात्मक, गंभीर असलेली प्रार्थना स्वाभाविकच कारूण्याकडे झुकते. अंत:करणातील कारूण्यपूर्ण सादेने, तरी हा भैरव, हा परमेश्वर प्रसन्न होतो का, याची शंका येवू लागते. मग डोकावू लागते, ते किंचीत वैफल्य ! या रागातील वादी धैवत व संवादी रिषभ हे आंदोलीत करून लावले जातात. अवरोहात गंधार आणि निषाद यांचे प्रमाण अल्प असते. आरोहात काही वेळा पंचम न घेता, मध्यमावरून धैवतावर येतात.
या रागाचे आरोह, अवरोह आणि पकड पहा -
आरोह:- सा रे ग म प ध नी सां।
अवरोह:- सां नी ध प म ग रे सा।
पकड़:- ग म ध ध प, ग म रे रे सा।
या रागात पंचमाचा उपयोग जास्त केला, की रामकली या रागाचा भास होतो. मध्यमावर जास्त येऊन थांबले, की जोगिया राग वाटू लागतो. रामकली व जोगिया, हे पण ऐकायला अतीव गोड असलेले राग ! कोमल रिषभ असला की राग कारूण्याकडे झुकतो. भैरव या रागाच्या समप्रकृती असलेले राग म्हणजे, कालिंगडा व रामकली ! करूण रसपूर्णता असलेल्या या रागाची प्रकृती गंभीर आहे. तिन्ही सप्तकात विस्तार करता येणाऱ्या रागात, प्रभात भैरव, अहिर भैरव, शिवमत भैरव हे राग प्रचलित आहेत.
इतकी वर्षे झालीत, पण केवळ कानावर पडत राहिले, आणि स्मरणात राहीलेले हे भैरव रागातील धृपद -
गंगाधर शिवपिनाकि, त्रैलोचन शूलपाणि
नीलकंठ भस्मअंग, पार्वती अर्धअंग ।।धृ।।
करत्रिशूल डमरू बाजे, गले नाग मुंडमाल
कटीवसन व्याघ्रासन, वास करत भूतसंग ।।
परवा रविवार असल्याने नेहमीप्रमाणे सकाळी जळगांवी निघालो होतो. महिनाभर सुटी असल्याने मे महिन्यांत जाणार नव्हतो. त्यामुळे जरा लवकर निघायला लागणार होते, यावेळी महामंडळाच्या बसने जायचे होते. सकाळी रेडिओ लावला. उस्ताद बिसमिल्लाखाॅंसाहेबांचा अहिर भैरव सनईवर सुरू झाला. भगवान शंकराच्या नांवाचा हा राग, मनांत आपोआप हात जोडले गेले.
शास्तीय संगीतातील कलाकारांची गाणी आठवू लागली, त्यांचे वादन आठवू लागले. पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, उ. बिसमिल्लाखाॅं, उ. सइफुद्दीन डागर ! आणि आपल्या सर्वांना परिचित नसलेला हा राग, पण चित्रपटाच्या गीताने आपोआपच परिचित असलेल्या, ‘भैरव’ रागातील एकेक गाणे मला आठवू लागले.
राज कपूरचा सदाबहार चित्रपट - जागते रहे मधील - जागो मोहन प्यारे प्यारे, एक दुजे के लिये या चित्रपटातील - सोला बरस की बारी उमर को सलाम, उलझन या चित्रपटातील - अपनी जीवन की उलझन को कैसे मैं समझाऊ, दो आँखे बारह हात या चित्रपटातील - ए मालिक तेरे बंदे हम ! काय आणि किती ? आता हा भगवान शंकरांचे नांव घेऊन आलेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील राग दिवसभर डोक्यात रहाणार होता, प्रवासभर आपल्याला साथ देत !
काही कलाकारांनी भैरव आणि त्याच्या प्रकारातील सादरीकरण -
१. भैरव - गायन - पंडीत जसराज - मेहेरबान
२. भैरव - गायन आणि बांसरी - जुगलबंदी - पंडीत जसराज आणि पंडीत हरिप्रसाद चौरसिया - आयो तो आनंद आनंद
३. अहीर भैरव (हिंदुस्थानी) व चक्रवाकम (कर्नाटकी) - गायन - जुगलबंदी -
४. भैरव - गायन - जुगलबंदी - पंडीत भीमसेन जोशी आणि डॉ. बालमुरली कृष्णन - हमसे करत तुम
५. भैरव - गायन - उस्ताद सईदुद्दीन डागर - आदी मध आणि अंत शिव https://www.youtube.com/watch?v=Yy9aJkZ2sRQ
६. भैरव - गायन - रशीद खान - पावन जब -
७. मंगल भैरव - गायन - विदुषी अश्विनी भिडे देशपांडे - जागो रे जागो भाई परभात
८. भैरव - सारंगी वादन - उस्ताद साबीर खान
९. भैरव - सनई वादन - उस्ताद बिस्मिल्ला खान - https://www.youtube.com/watch?v=uqNV2eo1OII
भैरव आणि त्याच्या प्रकारातील रागावर आधारलेली चित्रपट गीते -
१. भैरव - जागते रहो - जागो मोहन प्यारे - गायिका - लता मंगेशकर, गीत - शैलेंद्र आणि संगीतकार - सलील चौधरी - https://www.youtube.com/watch?v=_X0e5AS7EPw
२. अहीर भैरव - उलझन - अपनी जीवन की उलझन को - गायक - किशोरकुमार आणि लता मंगेशकर, गीत - एम जी हसमत आणि संगीत - कल्याणजी आनंदजी - https://www.youtube.com/watch?v=LHgsS2YmKeU
३. अहीर भैरव - एक दुजे के लिये - सोला बरस की बारी उमर को सलाम - गायक - लता मंगेशकर आणि अनुप जलोटा, गीत - आनंद बक्षी आणि संगीत - लक्ष्मीकांत प्यारेलाल - https://www.youtube.com/watch?v=z_eAMHB4W9M
४. भैरव - दो आँखे बारा हात - ए मलिक तेरे बंदे हम - गायिका - लता मंगेशकर, गीत - पं. भरत व्यास आणि संगीतकार - वसंत देसाई - https://www.youtube.com/watch?v=YmYFRNXrPdk
- माधव भोकरीकर
(लेख आवडला तर अवश्य 'शेअर' करा)

1.5.2019

No comments:

Post a Comment