Thursday, June 27, 2019

वकिली व्यवसाय सुरू करून कदाचित तीन-चार वर्षे झाली असतील. मी रावेरला होतो. नाल्यावर माझे आॅफिस होते. मी आॅफिसमधे बसलो होतो. समोर एक सोहळ्यावजा कार्यक्रम सुरू होता. नवीन कंपनीचे आॅफिस सुरू होणार होते. त्या कार्यक्रमाचे चहापाणी सुरू होते. येणाऱ्या जाणाऱ्याला कोणालाही मोफत चहापाणी मिळत असल्याने, त्याला कंपनी कशाची आहे, याची काळजी नव्हती आणि ते विचारण्याची पण आवश्यकता वाटत नव्हती. तो चहापाणी घ्यायचा आणि समाधानाने निघून जायचा. कंपनी खरंच चांगली दिसतेय, ही मनाशी खूणगाठ मांडूनच ! माझ्या आॅफिसमधे पक्षकार मंडळी बसलेली असली, की काही वेळा मी चहा बोलवायचो. समोरच महाजनचा चहाचा स्टाॅल होता. बऱ्याच वेळा, मी ओट्यावर आलो, आणि महाजनच्या दृष्टीस पडलो, तरी महाजन चहा पाठवून द्यायचा. त्या दिवशी तसेच झाले. काय चालू आहे, हे पहायला मी बाहेर आलो, महाजनने मला पाहीले आणि चहा पाठवून दिला.
‘कारे, काय चालले आहे ? कसली कंपनी आहे ?’ मी विचारले.
‘मस्त कंपनी आहे. तीनेकशे चहा लागतील, म्हणून सांगीतले मला !’ महाजन.
पण, नेमके काय, कशाची आहे ?’ मी.
‘आज तुम्ही वस्तूच्या किमतीच्या तीस टक्के पैसे भरायचे, बरोब्बर साठाव्या दिवशी तुम्ही बुक केलेली वस्तू किंवा रक्कम घेवून जायची. पुन्हा पैसे द्यायची आवश्यकता नाही.’ शेवटचे वाक्य महाजन ठासून बोलला.
हे ऐकल्यावर माझ्या आॅफीसमधल्या पक्षकारांच्या भुवया आकाशात !
‘आॅं ! अरे काय बी सांगतोय ?’ पक्षकार एका सुरात ? मला हसू आले.
‘काय हसतांय वकील साहेब !’ एक जण.
‘हसू नको, तर काय करू ? हे शक्य आहे का ?’ मी.
‘तुम्ही भलतेच सौंशयी !’ एक जण.
‘वकील लोकांना जिकडं तिकडं फसवाफसवीच सुरू हाय असं दिसतं’ एक त्यातला वयस्कर पक्षकार.
‘काहीतरी बुक करावं म्हंतोय ‘ तिसरा उतावीळ !
‘आजच्या कोर्टाच्या तारखेचे पहा, रिकाम्या गोष्टींपेक्षा ! बुकींग करायचे, ते चार-सहा महिन्यांनी करा ! जर ही कंपनी इथं राहिली तर !’ मी.
‘भयंकर सौंशयी सोभाव साहेबांचा !’ तोच पक्षकार.
‘तुमच्या केसमधे असे होईल, हा माझाच ‘सौंशय’ खरा ठरला ना ? तुम्ही तर म्हणत होते, ‘त्यानं जबान दिलीय. काही झालं तरी असं होनार नाही.’ मी. त्याला त्याच्या केसची आठवण करून दिली.
‘ते हाय म्हना !’ आता त्याच्या आवाजात दम नव्हता.
‘आणि महाजन, तू फक्त रोखीने चहा द्यायचं काम कर. त्या बुकींगच्या भानगडीत पडू नको.’ मी.
‘नाही साहेब, तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच नाही.’ महाजन किटली व ग्लास घेवून जाता म्हणाला.
साधारण साडेतीन-चार महिने झाले असतील. सकाळी आॅफिसमधे आलो, तर समोर पुन्हा गर्दी ! तिथं असंच कोणाला विचारलं, ‘दोन दिवस झाले, आॅफिस उघडले नाही कोणी.’ हे उत्तर मिळालं. आॅफिसमधे बसलेल्या पक्षकारांना विचारले.
‘तुमच्यापैकी कोणी बुकींग केले होते का ?’ मी.
‘नाय बुवा !’ सर्वांनी एकासुरात सांगीतले. मला हसू आलं.
‘तुमचं हसणं कोड्यात टाकतं पहा, साहेब !’ पक्षकारांपैकी एक !
‘साधी गोष्ट आहे. तीस टक्के किंमतीत त्याला वस्तू द्यायला परवडेल का ? तीन महिने पैसे गोळा करायचे, जमलेल्या पैशातून एखादा आठवडा, सर्वांना वस्तू द्यायच्या. मग मोठ्या व जास्त रकमेच्या वस्तूंचे बुकींग होते. जास्त रक्कम गोळा करायची, आणि एका दिवशी सर्व गाशा गुंडाळून पसार व्हायचं. मग हाच उद्योग दुसरीकडे सुरू करायचा. आपल्याकडे लोभी, आळशी आणि मूर्ख लोकांचा तुटवडा नाही. वेगवेगळ्या भागातल्या लोकांना फसवत, गल्ला जमवत रहायचा, हा असा फसवणुकीचा यांचा मुख्य व्यवसाय ! तुम्ही पोटाला चिमटी देवून पैसे कमवतात आणि जास्त लोभापायी यांना देवून टाकतात ! त्याचवेळी हे शक्य आहे का, हे विसरून जातात. याच तुमच्या स्वभावाचा ही मंडळी लाभ उठवतात.’ मी.
‘ते खरं हाय म्हना !’ त्यांच्याच पैकी एक जण !
‘पण फसल्याशिवाय अक्कल येत नाही ना !’ दुसरा.
‘माझा विचार झाला होता बुकींगचा, पण तुम्ही सांगीतल्याने गप्प बसलो. थोडक्यात वाचलो.’ तिसरा.
ही घटना तशी जुनी, पण बरीच शिकवणारी आणि आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी ! सध्या वातावरण असेच आहे. जे शक्य नाही, ती आश्वासने सध्या दिली जात आहे. सर्वांनाच ते समजेल असे नाही. आपल्याला पण वाटते, ‘अजून मागा. अजून मागा. ते का त्यांच्या पदरहून देताय ? मागा, मागा, मागा !’ काय शक्य आहे आपण विसरून जातो. आपली शक्ती कार्य करण्याऐवजी मागण्यात खर्च होते. देशाच्या तिजोरीवर डल्ला मारून थोडेफार मिळेल पण ! पण यासाठी आपण त्या लुटीत सहभागी व्हायचे ?

21.4.2019

No comments:

Post a Comment