Thursday, June 27, 2019

आता उरल्या फक्त आठवणी ! — आणि फक्त आठवणी !!

आता उरल्या फक्त आठवणी ! — आणि फक्त आठवणी !!
‘निर्मलाकाकूंची तब्येत बिघडली आहे.’ हा निरोप रावेरहून दि. २१ मे रोजी संध्याकाळी आला आणि आम्ही पुण्याहून इकडे यायला निघालो. बस स्टॅंडवर आलो, औरंगाबाद गाडी मिळाली, रस्त्याला लागलो. रस्त्यातच मधेच निरोप आला, की जळगांवला तिला उपचारासाठी हलवले. औरंगाबादहून जळगांवी निघालो आणि रस्त्यातच असतांना भावाचा निरोप आला - आई गेली ! डोळ्यापुढे काही दिसेना. गेल्या निदान पन्नास वर्षांच्या भल्याबुऱ्या आठवणी वेड्यावाकड्या येत डोळ्यांसमोर दिसू लागल्या. माझ्या डोळ्यांतले येणारे पाणी, समोरची माणसे दाखवत नव्हती, पण ह्रदयातून तिच्याबद्दलच्या आठवणींनी उघडलेले डोळे, पन्नास वर्षांचा काळ, मला विस्कळीतपणे पण लख्ख दाखवत होते. काही आठवत होते, तर काही नाही ! गाडी व गाडीतील बसलेले आम्ही, आता निर्जीव मनाने विचार करत रावेरकडे निघाले होतो. वास्तविक तीन दिवसांपूर्वीच तिची घरी रावेरला भेट घेऊन, मी पुण्याला परतलो होतो, ‘तुझ्या नातवाची परिक्षा झाली, आता रेल्वेने औरंगाबादला तुला घेऊन जाईन’ हे सांगून !
——- ——— ———- ———- ——— ——
माझ्या शैक्षणिक आयुष्याच्या, उगीच काही दोन-तीन वर्षांचे अपवाद वगळता, माझी जवळपास आयुष्यभर असलेली सकाळची शाळा आणि महाविद्यालय !
‘उठ रे, सकाळ केव्हाच झालीय. शाळेची वेळ झाली ! शाळेत वेळेवर जायचे असते, उशीर करायचा नसतो.’ आईची हाक ऐकू यायची. माझी शाळा सकाळची म्हणजे, सकाळी ६.४५ ते १२ या वेळेत, असतांना, ही माझ्या अगोदर सकाळी उठून, मला उठवायच्या आंत, का कामाला लागते, हे मला समजायचेच नाही. बऱ्याच वेळा तर, ती एकटीच बैठक घालून, पं. कृष्णराव पंडीतांची परात्पर शिष्या आणि संगीतगुरू गोविंदराव कुलकर्णींची ही शिष्या, शांतपणे गाणं म्हणत असायची ! हे मला ऐकायला तर खूप छान वाटायचे. समजायचे नाही. अजून पण कुठं समजतंय ?
‘हो. थोडा वेळ ! उठतोच मी !’ तिच्या ‘उठ रे’ याला माझे अर्धवट झोपेत उत्तर.
‘वेळ घालवू नको. उठ. सूर्य वर आलाय. आत्ता रशाळा भरेल. प्रार्थना सापडली पाहिजे.’ तिच्या कामांसोबत तिचे मला झोपेतून उठून बोलणे सुरूच असायचे.
‘हो, हो, उठतो.’ माझा बोलण्यात दम नसलेला आवाज !
‘लवकर उठून शाळेत गेला नाही, तर आयुष्यभर मग झोपूनच रहावे लागेल, भिकाऱ्यासारखे !’ ती. हे आणि असे शब्द सुरू झाले की मात्र तातडीने उठावे लागे.
ती जन्माने खान्देशी असली, तरी तिला ‘किमान शब्दात, कमाल अपमान व शब्दप्रहार करणे’ सहज जमत असे ! आणि एकदा का तिचे सलग बोलणे सुरू झाले, की मग ती थांबत नसे. वेगवेगळे शब्द, वाक्प्रचार यांचे मर्मभेदक उभेआडवे पट्टे सुरू होत. समोरचा पहाता-पहाता घायाळ ! शास्त्रीस संगीतातील तानांच्या तिच्या प्रचंड तयारीचा पण हा परिणाम असावा. माझ्या शाळेच्या तयारीला तसा फारसा वेळ लागत नसे. मी (लहानपणी) वर्णाने लख्ख गोरा असलो तरी, ‘कावळ्याची आंघोळ’ या एका शब्दात, ती माझ्या आंघोळीचं वर्णन करायची ! थंडीच्या दिवसांत, उगीच छोट्या पातेल्यात, तापवलेले गरम पाणी घंघाळात ओतून, बऱ्यापैकी थंड पाणी टाकून आंघोळ करावी लागे. एरवी थंडी नसेल तर, आडाचे कोमट असलेले बादलीभर, पाणी तिने घंघाळात ओतून ठेवलेले असे. मी थोडा मोठा झाल्यावर, म्हणजे आमच्या घरातील आडाचे पाणी ओढण्यासारखा झाल्यावर मात्र, ते मलाच आडातून ओढावे लागे. या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून, प्रार्थना बहुतेक सापडायचीच ! तशी मराठी शाळा तर घराच्या मागेच होती, तिथं लगेच पोहोचतां यायचे.
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून चौथी पास होऊन, पाचवीला सरदार जी. जी. हायस्कूलला मला टाकल्यावर, सकाळी उठण्याचा त्रास अजून वाढला. शाळा घरापासून जवळपास दीड किलोमीटर दूर होती. शाळेत रोज जरी जायचे असले, तरी मुलांनी निदान सहावी-सातवीपर्यंत बिना चपलेने शाळेत जायचे असते, हा बहुसंख्यांचा प्रघात असल्याचा तो काळ ! शाळेत जाण्यासाठी मुलाला सायकल घेवून देणे, पालकांनी किंवा रिक्षेवाल्यांनी मुलांना रोज शाळेत पोहोचवून देणे वगैरे सारख्या, अविश्वसनीय कल्पनांचा जन्म पण त्यावेळी झाला नव्हता.
मी हायस्कूलला गेल्यापासून, शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी दीड किलोमीटर चालून हजर रहायचे असल्याने, सूर्योदयापूर्वी उठावे लागे. ब्राह्ममुहूर्तावर का कोणत्या मुहूर्तावर आम्ही उठलेलो असायचो. मला आयुष्यभराची सवय लावली आहे, ती पहाटे उठायची ! शाळेत असतांना सूर्य नेहमी आमच्यानंतर उगवायचा ! त्या सूर्याची आई तरी बरी, ती त्याला आमच्यापेक्षा जास्त वेळ, अंथरुणात लोळू द्यायची, पण माझ्या आईला हे लाड अजिबात पसंत व मान्य नव्हते. ती याला ‘भिकारलाड आणि चिंध्या फाड’ म्हणायची. लवकर उठण्याच्या बाबतीत, सूर्याने आमचा हेवा करावा, किंवा आम्ही सूर्याची असूया करावी, अशी परिस्थिती होती. एक मात्र नक्की, सकाळच्या वेळी जे काही आई बसल्या बैठकीवरूनच, आम्हाला उठवता-उठवता गांत असे, ते खूप ऐकावेसे वाटे. नंतरनंतर कधीतरी थोडेफार समजायला लागले, ते पण तिच्याकडूनच !
‘अरे, हा देशकार होता, हा बघ रामकली होता, आज भैरव होता, हा ललत होता. आजचा तोडी होता. आज तर भूप होता !’ हे आणि अशी कितीतरी नांवे मला तिच्याकडून समजली. हे तर आता आयुष्यभर पुरणारे आहे. परमेश्वराने माणसाला जन्मताच निरागस करण्याऐवजी, शहाणे केले असते तर ?
शाळा सुटल्यावर साधारणत: साडेबाराच्या सुमारास आम्ही घरी यायचो. त्यावेळी आईचे आडावरचे धुणे बहुतेक आटोपलेले असायचे. वडिलांना अकरा वाजताच, बॅंकेत कामाला जायचे असल्याने, स्वयंपाक काही वेळा अर्धवट असा तयार झाला असायचा. मी आल्यावर हातपाय धुवून यायचो. आई मग काही तयार करायचे असेल, तर चुलीत लाकडे, तुरखाट्या, पळखाट्या जे काय असेल ते सारायची व चुलींत फुंकणीने फुंकर मारून पुढील स्वयंपाकासाठी जाळ करायची. ‘शेतात पिकेल ते शिजवायचे आणि पानात पडेल ते खायचे, अन्नाला नांवे ठेवायचे नाही.’ हा आमच्या घरचा पूर्वीपासूनचा अलिखीत नियम ! तेव्हा कोणतीही तक्रार म्हणून करायची माझी हिंमत नसायची, आज पण नाही. मुळ्याच्या, मेथीच्या पातळ भाजीला, भाजीने मेळ खावा म्हणून बेसन लावले, का ज्वारीचे पीठ लावले, याच्या फंद्यात पडायचे, आम्हाला अजिबात कारण नसायचे. जेवतांना कालवण नेहमी पुरवून खावे, कारण ते सर्वांना राहिले पाहिजे; हा लहानपणी कटाक्षाने गिरवलेला धडा, तर माझ्या आयुष्यभरासाठी अंगवळणी पडलेला आहे. आता ‘कालवण भरपूर आहे, लावूनलावून खाऊ नका. ते संपवायचेय !’ असे मी जेवतांना सौ. ने कितीही दरडावून सांगीतले, तरी मेंदूत लहानपणीच, मला आईने माझ्या आयुष्यभरासाठीच्या दिलेल्या आज्ञा, माझा मेंदू विसरत नाही. थोडक्या कालवणांत जेवण होवून, अशावेळी बाकीचे तिला व मुलांनाच संपवावे लागते. आमच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीचे किंवा ‘सुबत्तेचे’, वर्णन करायचे तर, कुळकायद्यांत बरीच जमीन गेलेल्या, त्याच्याबद्दल खूप कोर्टकचेऱ्या मागे लागलेल्या, तसेच एकत्र कुटुंबातील एकच व्यक्ती, ही छोट्या गांवाने काढलेल्या सहकारी बॅंकेत काम केल्यावर, तिला जितके उत्पन्न मिळवेल तितके ‘श्रीमंत’ व संपन्न आम्ही होतो. ‘फक्त गंगाफळ खाऊन यांनी दिवस काढले’ हे सांगणारी बहुतेक माणसे आता जग कायमची सोडून गेली, उगाच दोन-चार शिल्लक आहेत नांवाला !
जेवण होवून जरा काही गल्लीत थोडे उंडारत नाही, तर पहातापहाता दोन-अडीच वाजायचे ! यावेळी मग आई ओट्यावर येऊन हाका मारणार हे ठरलेले.
‘पुस्तक घे आणि आशाकाकूकडे अभ्यासाला जा.’ आईचे सांगणे. पहिल्या हाकेत अभ्यासासाठी घरात आलेला आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी अजून मला भेटायची आहे. मी पण जगावेगळा नव्हतो. मग मला बोलावण्याचा सपाटा सुरू होई. मी घराच्या ओट्यापर्यंत आलो, की ‘अभ्यास नाही केला, तर रेल्वेस्टेशनवर हमाली करावी लागेल. कोणी कुत्रे विचारणार नाही. उपाशी रहावं लागेल.’ असे काहीसे बोलणं सुरू होई. त्यांत मला बोलवल्यावर पण यायला जास्त त्रास झाला की, ‘उपाशी रहावं लागेल’ या ऐवजी ‘उपाशी मरावे लागेल’ असा बदल असू शकायचा. ‘रेल्वेस्टेशनांवर हमाली करावी लागेल’, या ऐवजी ‘एस्. टी. स्टॅंडवर हमाली करावी लागेल’ एवढांच काय तो हमालीच्या ठिकाणांत बदल ! बाकी ‘हमाली करावी लागेल’ हे नक्की असायचे ! मग माझ्या डोळ्यांसमोर डोक्यावर असलेले मोठमोठे डाग, पाठीवर धान्यांचे पोते वाहणाऱ्यांचे चित्र यायचे. तसे काही करण्यासारखी, ीमाझी तब्येत नाही, म्हणून हमाली करण्याचे काम आपल्याला जमण्यासारखे नाही, त्यापेक्षा ‘आशाकाकूंकडे तास-दोन तास अभ्यास केलेला बरा’ हा माझा सोपा हिशोब असायचा. मी आमच्या घरासारखेच असलेले केऱ्हाळकर यांच्याकडे अभ्यासाला जायचो. त्यांची स्प्रिंगची असलेली आरामखुर्ची मला फार आवडायची. अभ्यास पण आरामात व छान व्हायचा ! एक मात्र खरे संध्याकाळी मी त्यावेळी गांवाबाहेर असलेल्या ‘राजे रघुनाथराव देशमुख’ वाचनालयांत जवळपास ते बंद होईपर्यंत वाचत बसायचो, याबद्दल ती ‘पुस्तकी किडा’ या शब्दाशिवाय कधी काही बोलली नाही. मी भरपूर वाचन करावे, हीच तिची इच्छा असायची. तिच्या या कठोर वाक्ताडनामुळे केलेल्या परिश्रमाचा व अभ्यासाचा परिणाम म्हणा का परमेश्वराने मला तिच्याकडून जन्मजात दिलेल्या बुद्धीचा परिणाम म्हणा, मी दहावीला रावेर केंद्रात पहिले येण्यात झाला. आजोबांकडून, जळगांवहून घरी रावेरला आल्यावर तिने मला जवळ घेतले.
‘फार बोलते का रे, मी तुला ? तुला राग नाही येत माझा ?’ मी तिच्याकडे बघीतलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. आईच्या डोळ्यांत पाणी बघीतल्यावर, मी यांवर काय बोलणार ?
‘बाईचा जन्म वाईट ! तिची सर्व बुद्धी, तिला लग्नानंतर सासरच्या चुलीत, तिथल्याच मिळेल त्या सरपणाने जाळून टाकावी लागते. मग राग कोणावर काढणार ? तू काहीतरी मार्क्स मिळवतो, नांव काढतो, ऐकायला चारचौघात बरं वाटतं रे, आईबापाला ! तुझ्या भाऊंचे पगाराचे पैसे पण त्यांच्या मालकीचे नसतात, तर माझ्या मालकीचे कसले असणार ? मी आपली कधीच्याच बारा-पंधरा वर्षे गाण्याच्या शिकवण्या करतेय, आणि मिळवतेय संसारासाठी, आधाराला असे तुटकेफुटके दोन-चार पैसे ! ते पण द्यावे लागतात, तुझ्या भाऊंना मागीतल्यावर ! नाही म्हणणार का आपण त्यांना ? तुझा बाप आहे, तर माझा नवरा आहे. ऐकावं लागतं, ते तुमच्यासाठी ! माहेरी काय आहे ? अरे, काय सांगू, दोन वेळा आकाशवाणी दिल्लीला माझ्या गाण्याचे फायनल रेकाॅर्डिंग पाठवायचे होते, पण रेकार्डिंगला जळगांवी पण जाऊ दिले नाही. सकाळी जाते, अन् संध्याकाळी येते, म्हणाले ! पण नाही. ‘तो काय म्हणेल ?’ बसले घरी मुकाट ! तुझ्या आजीने तुझं नांव ठेवलंय मुद्दाम, तुझ्या कर्तबगार आजोबांचे ! आठवत असतील काही तिला, काही जुन्या चांगल्या आठवणी !’ आई भरभरून बोलत होती माझ्याशी ! आकाशवाणीच्या रेकार्डिंगला जाता आले नाही, हा कायमचा सल तिच्या मनांत होता. अकरावीला मी सायन्सला प्रवेश घ्यावा, आणि डाॅक्टर, इंजिनिअर बनावे, या तिच्या दुबळ्या सुराला व इच्छेला नेहमीप्रमाणेच घरातील कोणीही दाद दिली नाही. — पण एक झालं, त्यानंतर मात्र ती शेवटपर्यंत अभ्यासासाठी मला कधी बोलली नाही.
बारावीला जळगांवला मी व माझा चुलतभाऊ शिकायला ठेवायचे ठरले, त्यावेळी - ‘तुझे भाऊ बॅंकेचे काम मान मोडेपर्यंत तुमच्यासाठी दिवसरात्र करत आहेत, हे लक्षात ठेव !’ मला शासनाची शिष्यवृती व बोर्डाचे मिळालेल्या, बक्षीसाची आठवण करून देत म्हणाली, ‘तुझ्या भाऊंना दोन पैसे कमी खर्च येईल, तर इकडची अडचण कमी होईल, हे पण लक्षात ठेव ! माझे आयुष्य आता तुम्हा पोरांवरच !’ तिच्याने जास्त बोलवेना. कधीतरी क्वचित जळगांवी यायची ती, आम्हाला बघायला ! सारखं यायचं म्हटलं तर भाडे पण लागते, ना यायला ! जळगांवचे शिक्षण तर पूर्ण झाले. अधूनमधून काही अवांतर स्पर्धेत, आकाशवाणीच्या कार्यक्रमांत भाग घेऊन माझे नांव ऐकू आले, की बरे वाटत असावे तिला !
आपल्याऐवजी आपल्या मुलाच्या किर्तीचे नांव सांगण्यात पण अतीव आनंद मानणारी, आणि त्याच्या दु:खाने आपण काहीही केलेले नसतांना, खाली मान घालणारी, ही आई नांवाची व्यक्ती काय पण परमेश्वराने निर्माण केली आहे. परमेश्वराची ही एकमेव कृती त्याला पण पुन्हा जमली नसावी, किंवा हिलाच ‘एकमेवाद्वितीय’ राहू द्यावे, म्हणून पण केली नसावी.
मी वकील झाल्यावर काही काळ मुंबईला होतो, मग रावेरला येऊन वकिली सुरू केली, ते गेल्या चौदा वर्षांपूर्वी औरंगाबादला वकीली करण्यासाठी जाईपावेतो ! मधल्या काळांत तिला थोडेच समाधानाचे आणि असंख्य वेदनेचे प्रसंग सोसावे लागले. जीवनांत आलेल्या समाधानाच्या सावलीपेक्षा, कठोर व वेदनादायक जीवघेणे असे परिस्थतीचे फटके तिला बऱ्याच वेळा विनाकारण खावे लागले. त्याला पुरून ती उरली ! पण यांत थकली.
‘पेरले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते’ या संतवचनाला अपवाद तरी कोण असणार ? म्हातारपणी तिचे शरीर थकले, तरी बुद्धी केवळ शाबूतच नव्हती, तर पूर्वीप्रमाणेच बरीच तल्लख होती.
‘मी वेडी असेल, घाबरून आणि मागचे सर्व विसरून जात, सहन करून कर्तव्य म्हणून करणारी; तुमची आई प्रचंड हुशार ! त्यांच्या सर्व लक्षात रहाते. चांगल्या घरातली होते, म्हणून टिकले !’ माझी सौभाग्यवतीचा कायम असलेला मला टोमणा ! मागचे एकेक अनुभव व प्रसंग आठवले, तर सत्याच्या विरोधात शहाण्याने जाऊ नये, याची मला जाणीव होती.
वडील होते, तो पावेतो ती इथं रावेरलाच जास्त असायची ! रावेरला आलो, तर थोडावेळ तिला भेटायचो.
‘तुझे भाऊ मला तर नेहमी म्हणतात, जा तुझ्या मुलाकडे औरंगाबादला ! तिथं आरामात रहा. मी पोहोचवून देवू, का त्याला निरोप देऊ ? मी माझे पाहून घेईन. अरे, पन्नास वर्षे सोबत काढली, अन् आता या वयांत यांना सोडून काय येऊ तुझ्याकडे एकटी तिकडे ?’ हे तिचे शब्द !
मात्र साडेतीन वर्षांपूर्वी वडील गेले, अन् अलिकडे तिचे माझेकडे औरंगाबादला येणे वाढले. तिला पतीसोबत कायम बांधून ठेवणारा तिच्या आयुष्याचा एक धागा, परमेश्वर कायमचा घेऊन गेला, तिला एकटीला ठेवत ! हा प्रसंग प्रत्येक दांपत्याच्या आयुष्यात येतोच, आणि कोणीतरी मागे रहाते, कोणाला तरी सोडून !
माझ्या तरी कमी, पण तिच्या नातवाच्या व सूनेच्या भरपूर गप्पा व्हायच्या ! तिचा नातू, तिला कसल्याकसल्या गायकांच्या दुर्मिळ असलेल्या मैफिली ऐकवायच्या ! तिच्या डोळ्यांत जुनी चमक पुन्हा दिसायची, जुने दिवस आठवायचे ! ती मनाने केव्हाच जुन्या काळांत गेली असायची.
‘नाना, मला ही तान अशी शिकवायचे. स्वरविस्तार असा पण करता आला असता. अरे, ही तर माझीच चीज म्हणतोय ! ख्याल पण माझाच आहे. यांत तराना मला हा शिकवला होता.’ तिचे बोलणे सुरू असायचे. तिच्या गळ्यातले सूर त्यावेळचे आपल्याला ऐकू यायचे नाही, पण तिला ते सूर डोळ्यांना स्वच्छ दिसत असावे. थोड्या वेळाने, तीच म्हणायची -‘काही आवाज लागत नाही रे आता !’ मला हसू यायचे.
सकाळी रोज मी साधारणत: चार-साडेचारला उठून काॅम्प्यटरवर कामाला बसलो, किंवा पुस्तक वाचत बसलो, की तिची बाहेर बैठक असलेल्या आॅफिसात, एक चक्कर मारून डोकावून पहाणे, हमखास असे; आणि आंत जाताजाता ‘अभ्यास करतोय, करू दे.’ किंवा ‘काम सुरू आहे’ हे बोलणे असे. काम जरा होत आले, की मागच्या खोलीत जाऊन ‘तू कशाला इतक्या लवकर उठते ? काय काम असते तुला आता ?’ या माझ्या बोलण्यावर ‘काम काही नाही रे, पण सवयच लागलीय पहिलेपासून ! आता तर झोप पण येत नाही. बसून रहाते. काय करू ? तुझी बायको, अर्चना मला पहिल्यापासूनच काही काम करू देत नाही.’
‘हे तू कधी तिला सांगीतले नाही.’ मी.
‘हे पहा, कोणाचेही कौतुक त्याच्या तोंडावर करायचे नाही, नंतर ती काम तर करत नाही.’ तिचे उत्तर ! अर्थात हे तिचे नेहमीचे धोरण ! त्याचा त्रास पण होतो काही वेळा, पण स्वभावावर काय औषध ?
‘तुझी मला नाही काळजी वाटत, आता तू कुठे पण टिकशील ! त्या धाकट्याची काळजी वाटते. काही वेळा कीव येते, काही वेळा राग येतो. अरे माझ्याच पोटचा गोळा आहे तो. जरा लक्ष दे त्याच्याकडे !’ तिची रावेरच्या घरासाठी तंद्री लागलेली असायची.
‘रावेरचा विषय इथं काढायचा नाही. त्याचा काहीही कोणावरही उपयोग नाही. कोणीही ऐकायला तयार नाही, सर्व जण हुशार आहेत, ज्ञानी आहेत. ते जाऊ दे, तुला इथं काही कमी आहे का ?’ मी बोलायचो.
‘नाही रे. कधी नाही, ते तुम्हा सर्वांबरोबर विमानात बसून फिरून आले. देवदर्शन झाले दूरदूरचे ! आता काय राहीलंय माझ्या आयुष्यात ? तुझी बहीण नोकरीला आहे. माझं गाणं पण ठेवलंय तिने ! तू तर तुझ्या बापजाद्यांची वकीलीची लाईन घेतली आहे. रेडिओवर केव्हातरी गाणं ऐकतो, ते पहाते मी.
एकदा तर मी इंदोरला गेले होते, १९७२ च्या दरम्यान, तुझ्या शरदमामाला सोबत घेऊन. गांधर्व महाविद्यालयाचे संगीत संमेलन होते. काही ऐकायला मिळावं म्हणून, बस ! त्यानंतर काही नाही. सभा नाही आणि संमेलन नाही. बसलीय इथं ! अरे, शेकडो विद्यार्थ्यांना गेली पन्नास तरी वर्षे शिकवतेय, पण एका संगीतसभेला बाहेर काही नंतर जाता आले नाही. हां, गांवात काही झाले गाण्याची एखादी बैठक, तर बोलवायचे मला आठवणीने ! गेल्या कित्येक वर्षांत तर काही कुठं गाणं नाही आणि काही नाही, ऐकायला मिळाले. घरात बसावं, ओट्यावर बसावं. रेडिओ लागला तर ऐकावं काही, नाहीतर गप्प बसावं ! जास्त वेळ बसवले पण जात नाही एका ठिकाणी, आणि काय कुठं जाता येणार ? देवाने उचलावे मला !’ आई बोलत होती.
‘असं का वाटते तुला ? तुला काहीही ऐकायला जाता येणार नाही ! पुण्याला चलते का यंदा ‘सवाई गंधर्वला’, पुष्पामावशीची पण भेट होईल.
‘काही कुठं जावंस वाटत नाही.’ तिचा नकार.
‘तू असा विचार करू नको. तुला बसल्याबसल्या ऐकायला मिळावे म्हणून, तुझ्यासाठी संगीताचा कार्यक्रम करेल मी, फक्त तुझ्यासाठी !’ मला जास्त बोलता येईना. तो विषय मात्र पक्का डोक्यात होता. माझी पुष्पामावशी गेली.
‘माझ्यापेक्षा धाकटे जाताय, अन् देव मला उचलत नाही.’ तिचा त्रागा व दु:ख ! मुलांनी व सौ. ने सांगीतले, ‘आताच करा, आणि रावेरलाच करा कार्यक्रम ! त्यांचे सर्व आयुष्य तिथं गेलेय’ !
मग श्री. मंगेश वाघमारे यांनी सुचविलेले, श्री. धनंजय जोशींच्या शास्त्रीय संगीताच्या गाण्याच्या बैठकीने दि. ११ एप्रिल, २०१९ रोजी आणि तिच्या सत्काराने ती माझी इच्छा पूर्ण झाली. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी दिसणारे अतीव समाधान, तिची पण आंतरिक इच्छा पूर्ण झाली, त्याची साक्ष होते. कित्येक विद्यार्थी, त्यांचे पालक, रावेरवासियांनी केलेला, तिच्या रावेर गांवासाठी संगीतातील योगदानाबद्दल केलेला सत्कार !
——- ———- ——- ——- ——- ————-
जेमतेम सव्वा महिना झाला असेल या सर्वांस, आणि आज असा हा निरोप ! आम्ही तळपत्या उन्हात दुपारी रावेरला पोहोचलो. घरी आलो. आयुष्यभर परिस्थितीच्या असंख्य चटक्यांना सहजासहजी दाद न देणारी, संकटांपुढे न डगमगणारी, उलट संकटाविरूद्ध लढायचे असते व त्याला हरवायचे असते, हे शिकवणारी, संसारासाठी आपल्या संगीतकलेस जवळपास तिलांजली दिलेली, माझी गोरीपान आई जमीनीवर सतरंजीवर होती. माझ्या अनुभवांत नवीन आठवणींची भर पाडायला आता ती रहाणार नव्हती ! तिच्या आता जुन्या झाल्या आहे, त्याच भल्याबुऱ्या आठवणी व तिची आपण घेतलेली शिकवण आठवणे, एवढेच हातात रहाणार होते.
—- मी एकदा तिच्या सतरंजीवर निजवलेल्या देहाकडे बघीतले. आता परिस्थितीच्याच काय, पण जळत्या चितेचे चटके पण तिचे काही बिघडवू शकणार नव्हते.

31.5.2019

Image may contain: 1 person, eyeglasses

No comments:

Post a Comment