Thursday, December 20, 2018

माझे तमाम, असलेले किंवा नसलेले, फेसबुक मित्र आणि मैत्रिणींसाठी जाहीर निवेदन -
सध्या फेसबुकवर ‘आपल्या पोस्टांना’ येथे भरपूर ‘लाईक, कॉमेंन्टस् मिळावेत किंवा त्या शेअर’ व्हाव्यात, यासाठी एकमेकांच्या पोस्ट चोऱ्यांचे प्रमाण, फार वाढल्याचे कानी येत आहे. यामुळे अन्यायग्रस्तांचे मनांत जबरदस्त असंतोष खदखदत असल्याची पण तक्रार आहे.
काहींच्या तक्रारी या वारंवार येत असून त्यांत समाजात विनाकारण असंतोष पसरवावा, अशी पण भावना असल्याची आम्हास जबरदस्त शंका आहे. अर्थात यामुळे काहींना आनंदाच्याउकळ्या फुटत असल्याचे देखील ऐकीवात आहे. पण ही समाजविघातक बाब, आपल्या नेहमीच्या पहाण्यातील व पारंपरिक असल्याने, तसेच त्यामुळे दुर्लक्षित करण्यायोग्य असल्याने येथे विचारार्ह नाही.
सबब एकंदरीत साकल्याने विचार करता, या परिस्थितीत एकमेकांच्या होत असणाऱ्या पोस्ट चोऱ्या हुडकून काढणे आणि त्या चोऱ्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी योग्य, सक्षम व्यक्तींकडून योग्य त्या अटींवर निविदा मागविण्यात येत आहेत.
अटी -
१. संबंधीताचा किंवा संबंधितेचा फेसबुकवर बऱ्यापैकी मुक्काम हवा. हा मुक्काम त्याच्या, तिच्या कामाचा भाग समजण्यात येईल. स्वत: पोस्ट टाकण्यास लागणारा वेळ यांतून वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
२. त्याने किंवा तिने फक्त स्वत:च्याच पोस्टकडे लक्ष न देता इतरांच्या पण पोस्टकडे लक्ष द्यावयास हवे, किंबहुना सार्वजनिक जबाबदारी आणि बांधीलकी याची जाणीव ठेवून आपल्या पोस्टकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण इतरांच्या पोस्ट काळजीपूर्वक बघावयास हव्यात.
३. या कामी अगोदरच सेलिब्रिटी मानल्या गेलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल, कारण त्यांची चौफेर नजर असते हा समज असतो. वस्तुत: त्यांच्यावर पण चौफेर नजर असते, याचा उपयोग त्यांच्या चौर्यकर्मास आपोआप प्रतिबंध बसतो.
४. संबंधिताने हा आपला किंवा तो परका, असा आपपर भाव न ठेवता चोऱ्या रोखण्यासाठी लक्ष ठेवावयास हवे. एकवेळ आपल्या गटाकडे कमी लक्ष ठेवले तरी चालेल, पण विरोधी गटाकडे कटाक्षाने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावयास हवे.
५. यापासून कोणालाही कसलाही आर्थिक लाभ घेता येणार नाही, कारण हे ‘स्वेच्छा चौकीदाराचे’ काम आहे. यामुळे यांस ‘संरक्षक’ असे संबोधण्यात येईल. त्याने / तिने हे काम थांबविल्यावर पण ‘संरक्षक’ हे आपल्या नांवापूर्वी, त्याच्या या सेवेची मान्यता म्हणून वापरतां येईल.
विशेष - ‘विचारांची चोरी’ ही संकल्पना ‘चोरी’ या संज्ञेत येत नाही, याची नोंद घ्यावी. शब्दश: साम्य असेल तर विचार करण्यात येईल.
निविदा अर्ज मोफत उपलब्ध आहेत. सविस्तर अटींसाठी मूळ अर्जच आणि त्यातील अटी ग्राह्य मानले जातील.
निविदा सुरू होत आहेत - आषाढ शुद्ध ११, आषाढी एकादशी या शुभ दिवशी
निविदा बंद होतील - आषाढ शुद्ध १५, आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरू पौर्णिमा या दिवशी
निविदा उघडण्याची दिनांक मागाहून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
त्वरा करा ! सुरक्षित व्हा आणि एकमेकांना सुरक्षित करा !!

२. ७. २०१८

No comments:

Post a Comment