Thursday, December 20, 2018

तळे राखील तो पाणी चाखील

कोणतेही भ्रष्टाचाराच्या संबंधी आपल्याकडे प्रकरण असले की आपल्या एकेक गोष्टी लक्षात येतात, ठेवावयास लागतात.
१. तळे राखील तो पाणी चाखील, या म्हणीप्रमाणे सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांशी सलोख्याने असणारी मंडळीच बहुतांशपणे भ्रष्टाचारात होकारार्थी विचाराने सामील असले.
२. ज्यांचे काम व्हावयाचे असते, त्यांचा भ्रष्टाचाराच्या कामी एकतर इलाज नसतो किंवा ते मुद्दाम त्यांचे हितासाठी प्रलोभन दाखवतात. त्याला कमकुवत मनाची किंवा तसं करायचं आहे, असं अगोदरच ठरलेली मंडळी सामील होतात.
३. यांच्यावर कारवाई करायची, तर ती सत्ताधारी पक्षालाच त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत करावी लागते. यांचे संबंध एकमेकांत गुंतलेले असतात.यांत आवश्यक ती दिरंगाई केली जाते.
४. सत्ताधारी पक्षाने आपल्याच माणसांवर कारवाई करणे हे सत्ताधारी पक्षास, त्याच्या पुढील काळातील संभाव्य सत्ता मिळवण्यात अडसर ठरू शकते, त्यामुळे याबद्दलच्या अशा प्रामाणिक व कठोर कारवाईत सत्ताधाऱ्यांना फारसा उत्साह नसतो.
५. सत्ताधारी, चौकशी करणारे अधिकारी, भ्रष्टाचाराच्या संबंधी जिवंत वा कागदोपत्री पुरावे हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. त्यांची सांगड घालून ते योग्य पद्धतीने, कायद्याच्या चौकटीत न्यायालयात ठेवणे इतके सोपे नाही. यांत बराच काळ जातो आणि दुवे कमकुवत होतात किंवा मुद्दाम केले जातात.
६. इतकं सगळं झाल्यावर त्यात न्यायालयास काय दिसेल किंवा दिसणार नाही, हा भाग वेगळाच !
७. जनतेतील या विषयाची ऐकीव किंवा बातम्यांमुळे झालेली भावना, याबद्दल संबंधीत विषयाची सक्षम अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी व न्यायालयांत सादर केलेला पुरावा, त्या प्रकरणांत सरकार म्हणजे सत्ताधाऱ्यांचे असलेले सहाय्य किंवा त्याची भूमिका, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी अंमलात असलेल्या कायद्याच्या आधाराने त्या प्रकरणाचा लावलेला अर्थ आणि याचा साकल्याने विचार केल्यावर न्यायालयाचे त्याबद्दल बनलेले किंवा बनणार असणारे मत यांत खूप अंतर असते.
—— गेल्या निदान पन्नास-साठ वर्षातील अशा स्वरूपातले न्यायालयांनी दिलेले निर्णय, जनतेचे मत आणि तत्कालीन बातम्या वाचल्यावर बनलेलेले मत !

१४. १२. २०१८

No comments:

Post a Comment