Thursday, December 20, 2018

कै. डॉ. गुणवंतराव सरोदे !

कै. डॉ. गुणवंतराव सरोदे !
सव्वा महिनाच झाला असेल मला, सावद्याला गेलो होतो. कै. शामलाताई सरोदे यांना देवाज्ञा झाल्याने, डॉ. गुणवंतराव सरोदे आणि त्यांच्या घरातील मंडळींच्या भेटीला ! तसं बघीतलं तर, डॉक्टरसाहेब माझ्यापेक्षा जवळपास एक पिढी वयाने मोठे ! पण सार्वजनिक जीवनांत वावरतांना, कोणाला अशी काही संबोधने चिकटली, की मग ती व्यक्ती डोळ्यांसमोर उभी करायची, तर तेच संबोधन वापरावे लागते. आमच्या भागांत राजकीय जाण असलेली मंडळी असली आणि तुम्ही ‘शामलाताई’ किंवा ‘सरोदे डॉक्टर’ हे शब्द उच्चारले की याच व्यक्ती डोळ्यांसमोर येणार, दुसऱ्या नाही !
डॉक्टरसाहेबांचा व माझा परिचय हा सन १९८५ च्या दरम्यानचा ! त्या अगोदर मी विद्यार्थीदशेत, आणि ते वयाने आणि कार्याने जेष्ठच ! दिल्लीला कामानिमीत्त मला बऱ्याच वेळा जावे लागायचे. तेव्हा सुरूवातीला बऱ्याच वेळा थांबायचो, ते खासदार असल्याने त्यांना मिळालेल्या क्वार्टरमधे ! यापूर्वी आमदार होते, त्यावेळी मुंबईला जाणे व्हायचं, पण माझे थांबणे कमी असायचे.
अडीअडचण असलेल्यांना मदत करणे, हे त्यांच्यासाठी नवीन नव्हते. तिथं असाच मुक्कामी असतांना एकाची भेट झाली. तिथं एकजण ‘आय् ए एस्’ करत होता, काही क्लास लावले होते. त्याचा अभ्यास कसून सुरू होता. बहुतेक खरगौनचा होता. बऱ्याच गप्पा व्हायच्या आमच्या ! नंतर त्याने पूर्ण केले, असे पण समजले. आता तो सध्या कुठे आहे, माहीती नाही. दुसरा अजून एक जण होता, बहुतेक विदर्भातील ! घरची अत्यंत गरिबी ! परमेश्वराने त्याला पैशाची श्रीमंती दिली नाही, त्याची कसर त्याने, त्याला बुद्धीने श्रीमंत करून भरून काढली. कोण कुठला, विदर्भातला विद्यार्थी ! पण हिंमत दांडगी त्याची, संस्कृमधे ‘पीएच् डी’ करत होता दिल्लीला ! तिथं असतांना आम्ही सोबतच जेवायला जायचो.
तिथं अजून एक जण असायचा, पण त्याचे जास्त बोलणे व्हायचे नाही. एकदा तेथील वॉचमनला विचारल्यावर ‘काश्मिरसे आया हैं’ इतकेच उत्तर मिळाले. याबद्दल त्यांनाच विचारल्यावर ‘आपल्या पापाचे परिमार्जन करतोय. काश्मिरी पंडीत आहे, हाकलून दिलंय त्याला, त्याच्या घरातून ! किंवा जीव वाचावा म्हणून पळून आलाय. परिणाम एकच ! आता त्याच्याजवळ काहीच नाही. बघू काय सोय लावता येते ती.’ मन गलबललं ! सातपुडा पर्वताजवळच्या एका तालुका पण नाही, अशा छोट्या गांवातील, महाराष्ट्रातला हा खासदार ! आपली वैद्यकीय प्रॅक्टीस मागे सारत, काय करतोय, सोय कोणाची करतोय, तर हिमालयाच्या कुशीतून अन्यायायाने हाकललेल्या एका ‘काश्मिरी माणसाची’ ! मध्यप्रदेशातील एखाद्या होतकरू विद्यार्थ्याची, जो भविष्यातला भारतासाठी एक कर्तव्यदक्ष अधिकारी असेल ! एक तर संस्कृत विषयातील ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी मिळवतोय ! ही सर्व मंडळी कोण होती, ते कोणाची काळजी घेत होते ? त्यांच्या जातीची होती का नात्यातली होती, यांतील कोणी ? ते काळजी घेत होते ते, त्यांच्या जातीच्या नसलेल्या माणसाची !
अशीच माझी तब्येत एकदा दिल्लीलाच बिघडली. योगायोगाने डॉक्टर साहेब तिथेच होते.
‘काय झालं ?’ त्यांनी विचारले. काय त्रास होतो, तो मी सांगीतला.
‘बरा खासदार पकडलाय ! तब्येत बिघडली तरी औषध देणारा आहे.’ डॉक्टरसाहेब ! असे म्हणत विचारपूस करत, त्यांनी औषधे लिहून दिली.
मी चिठ्ठी घेवून जवळच्या औषध दुकानावर गेलो. दुकानदाराला डॉक्टरचे नांव लक्षात येईना.
‘कौन डॉक्टर हैं ?’ त्याने विचारले.
‘जलगांवके सांसद हैं’ मी उत्तर दिले.
‘हा, एक सांसद डॉक्टर हैं, हमें मालूम हैं’ त्याने उत्तर देत औषधी दिली.
ते निवडून आल्यावर रावेरला मोठी मिरवणूक निघाली होती. नेमके आठवत नाही, की आमदार म्हणून का खासदार म्हणून ! पण घटना डोळ्यांसमोर स्पष्ट आहे. लक्ष्मीनारायणाच्या मंदीरावरून मिरवणूक पुढे गांवात येत होती. रस्त्यात कै. शारंगधरशेट कासार यांचे ‘सौभाग्य वस्तू भांडार’ नांवाचे दुकान लागले. दुकान छोटे होते पण ती माणसं मोठी होती. त्यांच्या मोठेपणाची जाण होती. डॉक्टरसाहेबांनी कै. शारंगधरशेट यांना दुकानांत बघीतलं आणि ते मिरवणूकीतून बाहेर आले. त्या दुकानाच्या छोट्या पायऱ्या चढण्यासाठी ! कै. शारंगधरशेट रस्त्यावर गडबडीने उतरून आले आणि डॉक्टरसाहेबांनी कै. शारंगधरशेट यांना रस्त्यात नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले. विजयी मिरवणुकीला वडिलधाऱ्यांचा मान ठेवणारी व्यक्ती मिळाली याची जाणीव झाली.
दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यावर, आमच्या अंदाजाने तिसऱ्यांदा पण त्यांना संधी मिळेल असे वाटले. मिळाली नाही. असं काही झालं की भरपूर चर्चा ठरलेली ! त्याला भर देणारी मंडळी पण असतेच !
‘पक्षाने ज्याला संधी दिली, त्याला निवडून आणणे हे आपले काम आहे.’ असे म्हणत, त्या निवडणुकीत आपले कर्तव्य पक्षाची जबाबदारी म्हणून चोख बजावले.
बरीच वर्षे मी इकडे औरंगाबाद येथे व्यवसायानिमीत्त स्थायिक झालोय. मी विद्यार्थीदशेत असणारी माणसं आता हळूहळू जग सोडून जात आहे. स्वाभाविक आहे. मी तिथं काही काम करण्यासाठी धडपड केली होती, हे काहींच्या लक्षात असेल. काहींना माहीती पण नसेल. जीवन हे नवनवीन आगमन स्विकारत असते. पण एक मात्र येथे आता नक्की सांगावेसे वाटते, की आता कै. बाळासाहेब डहाळे, कै. नाना बुवा, कै. द. रा. मडके, कै. धोंडोपंत दलाल, कै. काका शिंदे, कै. रूपचंद महाजन, कै. बबनशेट अग्रवाल, कै. रामभाऊ पहिलवान, कै. दीक्षित सर, कै. डॉ. चावरे, कै. डॉ. न. पु. जोशी, कै. झमटमलशेट गनवाणी, नाना लष्करे, कै. चावरे वकील, निरूळचे भिकाबापू, खिरवडचे जगन्नाथअप्पा, सावदा येथील कै. नरहर मटकरी, धामोडीचे कै. मनोहर पाटील —- किती नांवे आठवावीत आणि सांगावीत ! अकाली आम्हाला सोडून गेलेली कै. नंदु डहाळे, कै. विश्वनाथ महाजन वगैरे मंडळी ! ही मंडळी तुम्ही बघीतली असतील किंवा नसतील, पण यांच्या एकेक काडीकाडीने हे घरटं तयार झालंय ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून यांतील काही नांवे माहिती असतील तर काही माहिती पण नसतील. यांतील काही लौकीकार्थाने स्वयंसेवक नसतील पण कार्य मात्र स्वयंसेवकाचेच करत होते.
कै. शामलाताई गेल्यावर भेटायला गेलो, तरी त्यात पण ‘प्रॅक्टीस कशी चालली आहे’ हे आवर्जून विचारले. आपल्या सुखदु:खांना साक्षीदार असलेली व्यक्ती, कितीही काळानंतर भेटली तरी त्यातली आपुलकी विरळ झाली नसते, कमी झाली नसते, त्यातील जिव्हाळा व काळजी तीच असते ! कै. शामलाताई गेल्यावर सावद्यातील आपली त्या घरातील एक व्यक्ती कमी झाल्याचे जाणवले आणि काल डॉ. गुणवंतराव सरोदे गेल्याचे समजल्यावर, तर दुसरी पण व्यक्ती आता नाही, हे समजले.
स्त्रिया या जन्मत:च कमकुवत असतात, असं म्हटलं जातं. मी याला फारसा सहमत नाही. माझ्यासमोर अशी कित्येक उदाहरणे आहेत, पती स्वर्गवासी झाल्यावर त्या पत्नीने खंबीरपणे, तिचे पतीनिधनाचे दु:ख बाजूला सारत मुलांना वाढवलं आहे. तिच्यातील मातृत्व हे कमालीचे प्रबळ व मजबूत असते. निसर्गाची किमया आहे. मात्र पत्नीचा वियोग, हा धडधाकट व बलवान समजल्या जाणाऱ्या माणसाला पण सहन होत नाही. वरून खंबीर समजला जाणारा हा पुरूष, आतून ढासळला असतो. बस, त्याला या जगातून जायला काहीतरी कारण पुरतं !

३. १२. २०१८

No comments:

Post a Comment