Thursday, December 20, 2018

------------स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा !

'विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशत' हे बाप रखुमादेवीवरू म्हणून आपली ओळख करून देणारे संत ज्ञानेश्वर, यांचा हा अभंग, स्वरांत सजविलेला आहे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ! स्वरातून शब्दांच्या अर्थाचा, शब्दज्ञानांचा प्रकाश जाणवतो, तसाच सुराची प्रभा पण दिसते.
आमच्या संत तुकाराम महाराजांचा 'कन्या सासुरासी जाये', हा मात्यापित्यांच्या जिवाची कन्येला सासरी रवानगी करतांना होणारी तडफड दाखविणारा अभंग ! आपल्याला ऐकायला सोप्या वाटणाऱ्या, पण गायला कठीण असणाऱ्या चालीत बांधला आहे, तो श्रीनिवास खळे या गुणी संगीतकाराने ! मात्यापित्यांची वेदना स्वरात उमटली आहे, हे पाहणाऱ्याला पण वाईट वाटते, असे सामर्थ्य असणारा हा स्वर !
ज्यांचा आधुनिक वाल्मिकी म्हणून यथार्थ उल्लेख केला जातो, त्या कै. ग. दि. माडगूळकर यांचे ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे गीत ! ‘सीतेला वनांत सोडून ये’ हे प्रभू रामचंद्रांचे वचन लक्ष्मणाने, सीतेला सांगीतल्यावर, अत्यंत वेदनागर्भ आवाजात लक्ष्मणाला विचारणारी सीता ! आपल्या करूण, सुमधूर स्वराने जिवंत करतात, ते कै. बाबूजी उपाख्य सुधीर फडके ! पोटात प्रत्यक्ष श्रीरामाचा असलेला अंश घेऊन, आपल्या व्याकूळ आवाजात, पतिव्रता सीता विचारते. चौदा वर्षे वनवासात देखील रामाला साथ देणारी सीता लक्ष्मणाला विचारते ! भैरवी थाटातील जोगिया या रागावर आधारीत हे गीत ! सीतेची व्यथा प्रत्यक्ष सीतेच्या तोंडून आपण ऐकतो आहे, इतके ते विचारल्यावरून आपण विद्ध होतो.
पं नरेंद्र शर्मा यांनी आपल्या प्रासादिक लेखणीने लिहीलेले, पवित्र अरुणोदय, सकाळ डोळ्यांसमोर उभे करणारे ‘ज्योती कलश छलके’ हे ‘भाभी की चुडीयॉं’ मधले कै. बाबूजी उपाख्य सुधीर फडके यांनी सुरेल बांधलेले ‘भूप’ रागातले भूपाळीस्वरूप गीत ! गृहदेवता सकाळी उठल्यावर सडासंमार्जन, तुळशीची पूजा करतांना घरातील लोकांसाठी पावित्र्य, मांगल्य मागते. स्वरातील पावित्र्य आणि मांगल्याचे स्वर, सकाळची कामे चालली आहे, हे डोळे मिटून ऐकले तरी जाणवते.
राजा मेहदी अली खान यांच्या लेखणीतून उतरलेले हे आपल्याला गूढवातावरणांत नेणारे ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो’ अत्यंत समर्थपणे संगीतात सजवले आहे, ते संगीतकार मदनमोहन यांनी, ‘वो कोन थी’ या चित्रपटासाठी ! पहाडी रागावर आधारलेले हे गीत ! चित्रपटातील नायिका, साधनाची विरहव्याकूळ आर्जवे पहातांना, त्या गूढ वातावरणांत पण मन खिन्न होते, दु:खी होते. हे विरही, प्रणयी मात्र गूढ वाटणारे सूर !
मराठी चित्रपटसृष्टीत, आपल्या विविध भावांतील असंख्य गीतरचनांनी आपला अमीट ठसा उमटविलेले, गीतकार कै. जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून उतरलेले, अध्यात्म शृंगार रसात सांगीतलेले हे कसदार गीत, ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’ ! मराठमोळ्या वातावरणातील आणि मातीतील संगीतकार कै. राम कदम ! यांनी ‘ग्यानबा तुकाराम’ या वारीला चाललेल्या वारकऱ्यांच्या धूनेची चाल दिली, ‘पिलू’ रागात ! वारकऱ्यांचा भोळाभाबडा भक्तीभाव, भजनातील आर्तता आणि गोपींची विनवणी ! जलांमधे अडकलेल्या, वस्त्रे अंगावर नसलेल्या गोपींना पाण्यातून बाहेर येता येत नाही, ही अगतिकता दाखवणारा व विनवणी करणारा हा स्वर !
गीतकार प्रकाश मेहरा यांचे ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातील ‘सलामें इश्क मेरी जान’ हे त्या कोठ्यावरील नृत्यांगनेने म्हटलेले, त्या वातावरणांत म्हटले जाणारे गीत ! स्त्रीची वेदना गीताला आपल्या संगीताने दिली आहे, संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी ! उर्वशी पारितोषिक यथार्थ ठरवणारी अभिनेत्री रेखा ते पडद्यावर म्हणत असते, महानायक अमिताभ बच्चनसाठी ! कोठ्यावरचा वेदनादायी स्वर आपल्या मनांत रूतून बसतो.
'जन पळभर म्हणतील हाय हाय' हे राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांच्या लेखनीतून उतरलेले, आपल्याला जीवनसत्य सांगणारे 'भावगीत' ! आपल्या संगीताचा वसंत फुलवत सजविलेले आहे ते, संगीतकार कै. वसंत प्रभू यांनी ! प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या वाचूनही, हे जग थांबलेले नाही, ते जीवनाचे तत्वज्ञान सांगून 'मल्हार' रागाच्या स्वराने भिजवणारा हा स्वर !
देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या, कडाडत्या शब्दांत, आपल्या भारतमातेचे वर्णन करणारे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे शब्द ! ‘जयोऽस्तु ते, जयोऽस्तु ते, श्रीमहन्मंगले शिवाऽस्पदे शुभदे’ ! ही संस्कृतप्रचुर रचना स्वरबद्ध केली आहे, ती मधुकर गोळवलकर या गुणी संगीतकाराने 'हंसध्वनी' या रागांत ! आपल्यातील देशप्रेमाची उर्मी अंतःकरणातून वर उसळविणारी ही स्वातंत्र्यवीरांची वाणी आणि तितकाच धारदार स्वर !
'मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग, राजसा किती दिसांत, लाभला निवांत संग' हे कवी सुरेश भटांचे हृदय पिळवटून टाकणारे, विरहिणीचे शब्द ! किती दिवसांचा विरह आहे, त्या विरहिणीला कोणास ठावूक ? विरहाला विरही स्वरांत बांधले आहे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ! विरहीणीची भावना व्यक्त करणारा स्वर यापेक्षा तो काय वेगळा असणार आहे ?
'मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा' हे शांताबाई शेळक्यांचे लोकगीतांचे, कोळीगीतांचे शब्द ! त्याच भावात सजविलेले आहे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ! समुद्रावर आपण कोळ्यांसारखे डोलायला लागतो, असा हा समर्थ स्वर !
'उठाये जा उन के सितम और जिये जा, यूँ ही मुस्कुराए जा आँसू पिये जा' हे वेदनेने भरलेले शब्द लिहिले आहेत शकील बदायुनी यांनी आणि तेवढेच करूण स्वर दिले आहेत नौशाद अली यांनी ! 'अंदाज' या चित्रपटातील गीत, 'नर्गिस' चित्रपटात गट असते 'दिलीपकुमारसाठी' ! 'केदार' रागावर आधारलेले हे गीत ! याला समर्थपणे साजरा करणारा हा स्वर !
'ये जिंदगी उसिकी है, जो किसीका हो गया' हे गीतकार 'राजेंद्र कृष्ण' यांचे शब्द अजरामर केले आहेत ते 'रामचंद्र चितळकर उपाख्य सी. रामचंद्र' नावाच्या संगीतकाराने ! स्वर बांधलेले आहेत, ते 'भीमपलासी' या रागांत ! आपले अंतीम क्षण समोर दिसत आहेत. आजपावेतो आपल्या प्रेमासाठी दिलेले आपले जीवन आणि त्याचसाठी स्विकारत असलेले मरण ! पडद्यावरील अनारकली, अभिनेत्री बिना रॉय आणि तिचे अंतीम क्षण दाखवणारा पण प्रेमात सर्व अर्पण केल्याचे समाधान जाणवून देणारा हा स्वर ! गेली कित्येक वर्षे सतत उंचीवर असलेले गीत आणि हा स्वर !
किती लिहीणार आणि काय लिहीणार ? या स्वराचे वर्णन तरी काय करणार आणि कुठवर करणार ? आमच्या जन्माच्या पूर्वीपासून हा स्वर या आसमंतात भरून आहे. आमच्या आजोबांनी ऐकला, वडिलांनी ऐकला, आम्ही ऐकला आणि आमच्या मुलांनी पण ऐकला ! स्वर वहातोचआहे, वहातोच आहे. जसे वाहत्या झऱ्याला कसले आले आहे हो बंधन, तो आपला खळाळत वाहत असतो. काही वेळा वाटेत गड्डा आला, दुःख होत असेल का त्याला ? होत असेल ना, पण त्याला पण भरून हा निर्झर पुढे वाहतच असतो. वेडेवाकडे वळण आले का, वळणे घेत जाऊ या, पुढे तर जायचेच आहे. स्वरांत चिंब भिजत आलेलो आहे आणि अजूनही भिजायचे आहे.
------------स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा !

२८. ९. २०१८

No comments:

Post a Comment