Thursday, December 20, 2018

पिठोरी अमावास्या

आज श्रावण अमावास्या ! या दिवसाला पिठोरी अमावास्या म्हणतात. हा दिवस आपण पोळा म्हणून साजरा करतो. केवळ शेतकऱ्यांनाच याचे महत्व नाही तर त्याच्या जिवावर जगणाऱ्या तुम्हाआम्हा सर्वांनाच त्याचे महत्व आहे. दिवसेंदिवस शेतातील कामांत यंत्राचा वापर वाढला, स्वाभाविकच बैलांचे महत्व कमी होत गेले. मात्र वर्षभर आपल्यासाठी राबराब राबणाऱ्या, या बैलाची आजच्या दिवशी पूजा करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो.
कै. यशवंत दिनकर पेंढरकर म्हणजे कवि यशवंत ! यांचा ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरवाने उल्लेख केला जातो. राजकवी म्हणून मला दोन नांवे माहिती आहेत, पहिले राजकवी भास्कर रामचंद्र तांबे आणि दुसरे हे यशवंत दिनकर पेंढरकर ! आज त्यांची, कवि यशवंत यांची, आठवण येण्याचे कारण म्हणजे, त्यांची ‘सण एक दिन’ या नांवाची कविता !
मी मराठी चौथीत होतो. माझी शाळा म्हणजे नाल्यावर ! आमचे घर आणि शाळा यांच्यामधे माझ्या काकांचे घर ! शाळा सुरू झाल्याची घंटा ऐकू आल्यावर पळतपळत गेलो, तरी शाळेला काही उशीर झाला नसे.
मी चौथीत असतांना, त्या वर्षी आमची पुस्तके बदलली होती. पुस्तके बदलणे हा मुलांना आनंद असतो, कारण नविन पुस्तके मिळायची. पुस्तके बदलली नसली म्हणजे कोणाची असलेली, जुनी पुस्तके पण वापरावी लागायची. त्यांत कोणाला काही वावगे वाटत नसे. नवीन पुस्तके मग एकंदरीत कमीच घेतली जात. शेवटची किंवा अनुक्रमणिकेपर्यंतची पाने नसली, तरी ते पुस्तक वर्षभर धकून जाई. त्याला चांगले मजबूत शिवून ब्राऊन पेपरचे कव्हर घातले की झाले ! वर्षभर त्या पुस्तकाला काही होत नसे.
बाजारात आली होती. पुस्तक दुकानदारांचा तर प्रामाणिक सल्ला होता, की पाठ्यपुस्तके घेण्याऐवजी गाईड घ्या. जसा पुस्तकांचा सेट असतो, तसा त्यांनी सर्व विषयांचे गाईड विकायला ठेवले होते. मराठीचे वेगळं गाईड पण होते. मराठीचे गाईड म्हणजे काय ? हे माझ्या समजण्याच्या पलिकडे होते. तर ‘गाईडमधे चुकीचे लिहीलेले असते’ ही आईची समजूत ! दुकानदार हा गाईड घेतल्याशिवाय पुस्तक देत नव्हता. पुस्तक हवे तर गाईड घेणे ‘कंपल्सरी’ ! शेवटी वडिलांनी दोन मराठीची पाठ्यपुस्तके आणि एक गाईड, असा मार्ग काढला. दोन घेण्याचे कारण म्हणजे, माझा चुलतभाऊ व मी लहानपणापासून एकाच वर्गात ! त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी एकेक मराठीचे पुस्तक !
कोणत्याही वर्गाचे पुस्तक असो, मला नवीन वर्ष सुरू झाले की मराठीचे पुस्तक सर्वप्रथम वाचायला खूप आवडते. हे चौथीचे मराठी पुस्तक हातात पडल्यावर सर्वप्रथम त्यांत ‘समर्थ रामदासांचे अभंग’ होते ! नंतर वेगवेगळे धडे व कविता ! आम्हाला सर्व विषय शिकवायला, वर्षभर एकच शिक्षक असत. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन परवडणारी नव्हती. सणवार तर खूपच पाळले जात. श्रावणी सोमवारी लवकर घरी यायला मिळायचे, सकाळी उपवास असायचा. त्यामुळे जेवण न करता, मुलं शाळेत आलेली असत. श्रावणातला शेवटचा दिवस, म्हणजे पोळा ! हा जोरात साजरा व्हायचा. पोळ्याच्या अगोदर येणारा शुक्रवार, हा ‘पोळ्याचा बाजार’ म्हणून ओळखला जायचा. वर्गात बहुसंख्य मुले ही शेती असलेली होती, त्यामुळे बैलांचे महत्व त्यांना त्या काळांत तरी सांगण्याची अजिबात आवश्यकता नव्हती.
पठाण गुरूजी खूप छान शिकवायचे. त्यांचे शिकवणे हे अगदी हळू आवाजात असे. मग नवीन धडा किंवा कविता वगैरे शिकवायची असेल, तर गुरूजी सर्व मुलांना फळ्याजवळ बोलवत असत. माझी जागा बहुतेक टेबलखाली किंवा खुर्चीजवळ असायची. त्यांचा पांढरा स्वच्छ पायजमा, पांढराच मनिला आणि डोक्यावर पांढरी स्वच्छ गांधी टोपी ! उभट चेहरा, उजळ वर्ण आणि गाल किंचीत आंत गेलेले. अंगकाठी सडपातळ ! लालसर विटकरी रंगांचा चष्मा एकतर डोळ्यांवर किंवा पाकिटांत घालून शर्टाच्या डाव्या खिशात ! खिशाला दोन फाउंटन पेन असायचे, एक निळ्या-काळ्या शाईचा व दुसरा लाल शाईचा ! त्यांचे अक्षर फार वळणदार ! आम्हाला कित्ता पुस्ती कटाक्षाने गिरवायला लावायचे. त्यांचा मुलगा पण माझ्याच वर्गात होता. गुरूजी हे आपल्या हातातील छडी क्षणभर पण दूर ठेवत नसत. मला मात्र कधी तिचा प्रसाद मिळाला नाही.
पोळ्याच्या अगोदर, आमच्या पठाण गुरूजींनी ‘सण एक दिन’ ही कविता शिकवायला घेतली. कविता शिकवून झाली. गुरूजींनी प्रश्न विचारला, ‘या कवितेत तुम्हाला काय समजलं’ ? मी हात वर केला आणि ‘गुरूजी, सर्वात शेवटी सांगीतलेलं आहे. सण एक दिन, बाकी वर्षभर, ओझे मरमर, ओढायचे’ ! गुरूजींच्या हळू आवाजातली शाबासकी आज पण कानांत मोठ्याने ऐकू येते.
आपणा सर्वांसाठी ती कविता -
सण एक दिन
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार
राजा परधान्या, रतन, दिवाण
वजीर, पठाण, तुस्त मस्त
वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलांलागी
डुल-डुलतात, कुणाची वशिंडे
काही बांड खोंडे, अवखळ
कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
हिरवे तांबडे, शोभिवंत
वाजती गळ्यांत, घुंगरांच्या माळा
सण बैलपोळा, ऐसा चाले
झुलींच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले ?
आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर
जरी मिरविती, परि धन्याहाती
वेसणी असती, घट्ट पाहा
जरी झटकली जराशीहि मान
तरी हे वेसण खेचतील
सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मरमर, ओढायाचे !
— यशवंत

९. ९. २०१८

No comments:

Post a Comment