Thursday, December 20, 2018

मी इकडे, औरंगाबादला रहायल्या आल्यानंतर, स्वाभाविकच मला मराठवाड्यातील बऱ्याच धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आला. मात्र मराठवाड्याशी नाळ जुळलेलं, पण सध्या मराठवाड्यात नसलेली पण काही गांवे आहेत. त्यांत मला फारसे माहिती नसलेलं ठिकाण होतं, ‘बासर’ ! महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश म्हणजे आताच्या तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचे हे गांव ! गांव तसे छोटे आहे. महाराष्ट्रातील शेवटचे मोठे गांव म्हणजे धर्माबाद, यापासून साधारणत: पंधरा किलोमीटरवर हे असेल. ‘बासर’ हे गांव आताच्या तेलंगणा राज्यात आहे.
मी यापूर्वी एकदा कामानिमीत्त तिथं गेलो होतो, मात्र तरी मुलाला मुद्दाम सोबत घेवून गेलो, दर्शन व्हावे यासाठी ! या आठवड्यात पुन्हा जाण्याचा योग आला. मला ठिकाण आवडलं ! तिथं ज्ञान सरस्वतीचे मंदीर आहे. आपल्या समर्थ, शक्तीशाली बनायचे असेल, तर पहिले ज्ञानसाधना करावयास हवी. ज्ञानानेच लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो. हे सर्व जरी असले तरी परमेश्वराचा आशीर्वाद तिथं हवाच !
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।
सरस्वतीची मंदीरे भारतात फक्त दोनच ठिकाणी आहेत, असं मानतात. एक म्हणजे जम्मू काश्मिर येथे आणि हे दुसरे तेलंगणातील ‘बासर’ येथे ! हे मंदीर अत्यंत प्राचीन असून, गोदावरी आणि मांगीरा नदीसंगमावर आहे. सरस्वती ही विद्येची देवता, ज्ञानाची देवता ! जिथं वेद व्यासांनी तपश्चर्या केली, त्या जागेवर हे मंदीर आहे. यांच जागेत वेद व्यासांनी देवी सरस्वती, देवी काली आणि देवी लक्ष्मी यांच्या वाळूच्या मूर्त्या केल्यात. सध्याचे हे मंदीर चालुक्य काळात बांधले गेल्याचे मानतात. पंचमी आणि नवरात्रीचा उत्सव येथे मोठा असतो. मंदीर आणि परिसर मोठा आहे.
या भागांत बहुसंख्य जण आपल्या लहान मुलामुलीला शाळेत घालण्यापूर्वी ‘बासरला’ घेवून जातात, तिथं पाटी-पेन्सील घेवून देवी सरस्वतीची पूजा करतात, याला ‘अक्षर अभ्यासम्’ म्हणतात. इथं माकडं बऱ्यापैकी आहेत.
आपल्या बहिणाबाई सरस्वतीचे हे ऋण तिला आई समजून मानतात.
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनच्या, मनी
किती गुपितं पेरली
या रविवारी पहाटे पाच वाजता मला लॉजवर जाग आली, ती सरस्वतीच्या प्रार्थनेने ! मंदीरात पूजा सुरू झाली होती. त्यातील श्लोक समजायला अवघड नव्हते, लहानपणापासून ऐकत आलो होतो.
या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रा वृता |
या वीणा वरदण्ड मंडित करा, या श्वेत पद्मासना ||
या ब्रह्मा अच्युत शंकर प्रभृतिभि: देवै: सदा वन्दिता |
सा माम् पातु सरस्वति भगवति निःशेष जाड्यापहा ||

१८. ७. २०१८

No comments:

Post a Comment