Thursday, December 20, 2018

मी इथं फेसबुकवर वावरत असतो, काहीवेळा जास्त रेंगाळल्यासारखा वाटत पण असेल ! येताजाता काही दोनचार वाक्यं लिहून जातो. बऱ्याच वेळा विषय हा बघीतलेल्या व्यक्ती, अनुभवलेल्या घटना असा असतो. काहीवेळा वकिलीतील घटना व अनुभव असा पण असतो. कमी प्रमाणात संगीतावर ! कारण लिहीतांना वाटतं, आपल्यालाच काही फारसं कळत नाही. त्यांत अलिकडच्या जे काही कानावर पडतं, त्या संगीताने तर अजूनच भिती वाटते की आपण लिहीलेलं कोणी तरी वाचेल का ? मात्र मूळ कायदा या विषयावर मी लिहीतो, ते तुलनेने कमी आणि इथं टाकत नाही.
जुन्या आठवणी हक्काने अनुभवण्याचे याशिवाय खात्रीचे दुसरे कोणते ठिकाण असणार ? काही वेळा तर घटना थोडीफार सारखी जाणवते पण आयुष्यांत येवून गेलेली माणसं ? ही जर कायमची गेलेली असतील, त्यांचा उमेदीचा कर्तृत्वाचा काळ जर संपलेला असेल, तर ते किंवा त्यांचे कर्तृत्व पुन्हा भेटण्याची शक्यता नसते. मग हा आपल्याल्यापुरताच नाही, तर त्यांची भेट सर्वांनाच करून देण्याचा सोपा मार्ग ! थोडीफार अडचण असते की त्यांचे सर्वच गुणावगुण येथे लिहीता येत नाही, लिहू पण शकत नाही. मात्र जे काही लिहायला हरकत नाही असं असतं, ते फक्त आपल्या आठवणीच्या जोरावर, स्मरणशक्तीवर व लिखाणकौशल्य(?) यांवर विश्वासून लिहायचे असते. काही बऱ्यापैकी इथं उतरले, लोकांना आवडले. काहींनी सर्वमान्य मार्गाने इथं सांगीतले, तर काहींनी संपर्क साधून ! काहींनी मात्र कधीतरी योगायोगाने भेट झाली, तर ‘तू लिहीलेलं वाचलं आणि डोळ्यांसमोरून तो जाईंना ! डोळ्यांत पाणी आलं बघ आठवणीने ! जाऊ दे ! एवढाच त्याचा सहवास होता.’ मला असं कोणी बोललं की हजारो ‘लाईक्स्’ मिळत पोस्ट ‘व्हायरल’ झाल्याचा आनंद होतो.
माझ्या वकिलीतील आठवणी या बहुतेकांना आपल्या जिव्हाळ्याच्या वाटतात. नित्य अनुभवातील असतात ना ? हे कोर्टकचेऱ्या एक प्रकारचे युद्धच असते. ‘युद्धस्य कथा रम्य:’ त्या कोणाला आवडत नाही ? बहुतेक माणसांना कायदा, त्यातील गमती, घडामोडी, हारजीत यांचे एक आकर्षण असते. कोर्टाबद्दल सर्वात जास्त गैरसमज जर कोणी पसरवले असतील, तर ते आपल्या सिनेमांनी ! त्यांच्या मनाला वाटेल तसे कायदे आणि कोर्टाचे कामकाज दाखवतात. इतका प्रचंड पैसा सिनेमा तयार करण्यासाठी खर्च करतात. नटनट्यांच्या कपड्यांवर व लहरीखातर खर्च करतात, तर एखाद्या वकिलाकडे ते स्क्रीप्ट द्यावे तपासायला ! फक्त कायदेशीर काही त्रुटी आहेत का, ते तपासून घ्यावे यासाठी. वकीलांना बिचाऱ्यांना सगळ्यांचाच अभ्यास करावा लागतो, कारण कोणाचे कुठे काही पटले नाही की शेवटचे सनदशीर वाक्य ठरलेले असते, ‘आता आपण कोर्टात भेटू’ किंवा ‘इतका मातलाय का ? आत्ता सरळ करतो. कोर्टाला काही कुलूप नाही लागलेय !’
बाकी संगीता संबंधी लिहावयाचे, तर लहानपणापासून कानावर पडत असलेले थोडेफार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ! त्यांवर आधारलेली सिनेगीते, भावगीते वगैरे ! नुकतीच परवा ‘मारवा’ या रागावर लिहीलं. वाचकांचा प्रतिसाद चांगला होता. सोबत दिलेलं संगीत हजारोंनी ऐकलं ! तुलनेने मला प्रतिसाद कमी, काही हरकत नाही. त्यांच्या तपश्चर्येचे ते फळ आहे, त्याला मिळालेली पावती आहे.
येथील मंडळी व बाहेरची पण, भर घालतात या लिखाणाचं पुस्तक काढा म्हणून ! माझ्या मनांत मूलभूत प्रश्न येतो, हे कोण वाचेल बरं ? ——- बस ! येथे थांबतो.

२५. ११.. २०१८

No comments:

Post a Comment