Thursday, December 20, 2018

कोणत्याही व्यक्तीने एखादे वेळेस व्यक्त केलेल्या तिच्या आरक्षणाबद्दलच्या मताबद्दल, आपली वेगळी भावना असू शकते. ते स्वच्छ व निकोप मनाने व्यक्त करण्याऐवजी आपण, आपल्या संविधानातील तरतुदीच्या त्या अर्थाबद्दल गदारोळ करतो. त्या विधानाबद्दल व त्यातून निघणाऱ्या उघड वा छुप्या अर्थाबद्दल विविध तर्कवितर्क लढवितो. त्या व्यक्तीने केलेल्या विधानातून वा त्या विधानाच्या लावलेल्या अर्थातून आपण, वेडेवाकडे अर्थ काढून जाणीवपूर्वक सामाजिक वातावरण खराब करतो. इतकेच नाही तर, त्या व्यक्तीच्या आणि तिच्या जातीबद्दल भलीबुरी, ऐकता येणार नाही, ऐकायलासुद्धा लाज वाटेल अशी आपली विकृत मनोवृत्ती दर्शवणारी शेरेबाजी करतो. त्यात जर अनायसेच ती व्यक्ती आपल्या राजकीय, सामाजिक वा जातीय अस्मितेविरूद्ध असेल, तर मग आपल्या अध:पतनास सीमाच नसते.
यापेक्षा भारतातील जे काही संविधान मानणारे राजकीय पक्ष असतील, त्यांनी जाहीर करावे, की ज्या कारणासाठी आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, ते उद्दिष्ट आम्ही किती काळात साध्य करू ! त्यानंतर आरक्षण ठेवण्याची गरज रहाणार नाही. आरक्षण बंद करू. हे जर कोणत्याही राजकीय पक्षाला ठरवता येत नसेल आणि सर्व जनतेला जाहीरपणे सांगता येत नसेल किंवा असे सांगण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची हिंमत होत नसेल, तर हा दिखावूपणा, ढोंग, खोटारडेपणा व लबाडी बंद करा. हे वर्तन आपल्या संविधानाची खिल्ली उडविण्यासारखे असून, घटनेशी व त्यातील हेतूशी प्रतारणा करण्यासारखे आहे.
अपेक्षा आहे की एखादा तरी सत्ता मिळवण्याची इच्छा करणारा आणि क्षमता असलेला राजकीय पक्ष यांवर आपली भूमिका स्पष्ट करेल. —- अन्यथा संविधान मानणारी आणि त्याचा आदर करणारी, सर्व भारतीय जनता जे समजायचे असेल, ते समजणारच आहे.

१. १०. २०१८

No comments:

Post a Comment