Thursday, December 20, 2018

सौ. शामलाताई सरोदे

मागच्या आठवड्यात सौ. शामलाताई सरोदे गेल्याचं समजले. धक्का बसला, जाण्यासारखी तब्येत वाटत नव्हती. पण परमेश्वराने जो चित्रगुप्त नांवाचा माणूस हिशोबासाठी बसवलाय, हा अजिबात अफरातफर करत नाही. ना चांगल्या माणसांसाठी ना वाईट माणसांसाठी ! एखाद्या वाईटाला उचलून जगातलं पाप कमी झालं, असं आपल्याला वाटतं न वाटतं, तोच हा एखाद्या चांगल्या माणसाला उचलून घेतो आणि सर्वांना हळहळायला लावतो.
विश्व हिंदू परिषदेने साधारणत: सन १९८५ च्या दरम्यान एकात्मता यज्ञयात्रा, गंगामाता भारतमाता यात्रा आयोजित केली होती. मी एल् एल्. बी. आटोपून रावेरला यायला लागलो होतो. लहानपणापासून पापभीरू वातावरणात आणि संघपरिवारात वावरल्याने, काहीतरी काम हे स्वयंस्फूर्तीने करणार, करावे लागणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे ही जबाबदारी आणि त्यानंतर पुढील जबाबदाऱ्या येत गेल्या, त्या परमेश्वर कृपेने पार पाडल्या गेल्यात.
त्यावेळी हिरिरीने आम्हा सर्वांसोबत असायचे, ते डाॅ. गुणवंतराव सरोदे ! त्यानंतर आठवतात त्या त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लढवलेल्या येथील विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका ! त्यांचे मोलाचे असलेले सर्व समाजाला सहकार्य आणि त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असलेल्या त्यांच्या धर्मपत्नी, म्हणजे सर्वांच्या ताई सौ. शामलाताई !
आज सावद्याला गेलो होतो. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन व नेहमीच मजबूत आधार असलेले, डाॅ. गुणवंतराव सरोदे यांच्या भेटीला ! सौ. शामलाताई आणि डाॅ. गुणवंतराव सरोदे यांच्या त्या वेळच्या असंख्य आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. आज त्यांच्या घरी जातोय, पण सौ. शामलाताई भेटणार नाही, एवढंच नाही तर यानंतर कधीच भेटणार नाही, दिसणार नाही; हे मनाला समजावत होतो. जड जात होतं पटणं !
डाॅक्टरसाहेबांची भेट झाली. माझ्या व्यवसायाची त्यांनी या त्यांच्या दु:खात पण अगत्याने चौकशी केली. ‘आम्हाला ही जाणार याची कल्पना होती,’ त्यांच्यातला अनुभवी डाॅक्टर बोलत होता. सोबत त्यांच्या सूनबाई होत्या. ‘त्यांच्या बोलण्यात तुमचे नांव असायचे’, सूनबाई मला सांगत होत्या. चहापाणी झाले. ज्याच्या दु:खात माणूस असतो, तो विषय मी तिथं गेल्यावर नांवापुरता काढतो. त्याच त्या विषयाने त्या संबंधीत व्यक्तीचे मन अगोदरच सुन्न व बधीरसे झाले असते, पुन्हा आपण तोच विषय काढून त्याला मनस्ताप देवू नये, हा माझा विचार ! काहींना पटतो, तर काहींना नाही पटत !
‘डाॅक्टरसाहेबांनी आता दगदग कमी केलीय’ हे म्हटल्यावर मात्र त्यांच्या विषयावर आलो. ‘आपलं काम काय होतं ? सत्ता मिळवणं ! मिळवली आणि दिली या पिढीला सांभाळायला ! काही अडचण असली, तर हेडमास्तर म्हणून करावं काही काम ?’ आमच्या गप्पा सुरू होत्या. निघण्याची वेळ झाली. त्यांना नमस्कार केला. निघालो. डाॅ. अतुलची भेट मात्र राहून गेली, ही रुखरुख !
एखाद्याच्या आयुष्यात त्याची जवळपास पन्नास वर्षे सावलीसारखी सोबत करणारी, एखाद दिवशी फटकन त्याला सोडून निघून जाते. मागे रहातात, त्या व्यक्तीच्या, तिने सोडून गेलेल्या असंख्य आठवणी ! वेदनादायक तरीही नियतीचे अपरिहार्य, अखंड फिरत असलेले कालचक्र ! कोण काय करणार त्यांच्यापुढं ?

२१. १०. २०१८

No comments:

Post a Comment