Thursday, December 20, 2018

देशपांडे सर - कै. नरहर अनंत देशपांडे

देशपांडे सर - कै. नरहर अनंत देशपांडे
कोणत्याही शाळेत आपण विद्यार्थी म्हणून प्रवेश केला, की मग आपला त्या शाळेच्या नवागत विद्यार्थ्यांत समावेश होतो. आपण जर शिक्षक, कर्मचारी किंवा व्यवस्थापक मंडळात असलो, तर एक बरं असतं, की निदान संबंधितांचा आपल्याला परिचय तरी होतो, आपल्याला करून पण घेता येतो. पालक म्हणून शाळेत गेलो, तर ज्यांच्याशी आपला संबंध येतो, त्याचा परिचय पण करून घेता येतो. सगळ्यात वाईट अवस्था असते, ती या आपल्यासारख्या नविनच आलेल्या विद्यार्थ्याची ! त्याने दुसऱ्या कुठल्या तरी प्राथमिक शाळेतून या हायस्कूलला प्रवेश घेतलेला असतो. ‘अंधारात चालणे’ याचा प्राथमिक परिचय व प्रात्यक्षिक त्याला इथं होतो.
मी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलो आणि मग पाचवीला ‘सरदार जी. जी. हायस्कूल’ मधे प्रवेश घेतला. त्यावेळी बरोबर १२ जूनला उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरू व्हायची. नवा वर्ग, नवी वह्या-पुस्तके आणि नवीन मित्र, हा नाविन्याचा आनंद असायचा. अलिकडचं काही माहीत नाही, नेमकी १२ जूनला होते का वेगळ्या दिवशी होते. १२ जून ! शाळा सुरू होण्याचा हा दिनांक कोणी शोधून काढला, कोणास ठावूक ? शाळा उघडल्यावर पहिल्या दिवशी, तर सर्व विद्यार्थ्यांचा आपला नेमका वर्ग कोणता हाच गोंधळ चालायचा. काही वेळा तर आपापल्या मनाने, वेगवेगळ्या इयत्तांमधील विद्यार्थी, हे त्यांना जो सोयीचा वर्ग वाटेल त्यात बसल्याने वेगळाच गलका वाढलेला असायचा. जो वर्ग आपल्याला सोयीचा वाटतो, तो नेमका आपल्याला दिलेला नसतो. त्यामुळे तिथे भयंकर पळापळ करून जो बाक आपण पकडलेला असतो, त्यांवर आपले नांव पेनने लिहीण्यात आपल्या पेनची निब तुटलेली किंवा खराब झाली असते, ते सर्व वाया जायचं ! पुन्हा दुसरीकडे नवा वर्ग व नवी, जोमाने पळापळ आणि तोच प्रकार ! या गडबडीत कोणाच्यातरी पायातल्या चपला निसटायच्या, कोणाच्या स्लिपरचे बंद तुटायचे, कोणी घसरून दप्तरासहीत पडायचे, स्वाभाविकच त्याच्या अंगावर तेवढ्याच वेगात व त्याच कारणासाठी येणारे विद्यार्थी पडायचे. या गोंधळात चांगले बाक दुसऱ्यांना गेलेले असायचे. मग याबद्दल येणाऱ्या शिक्षकाकडे तक्रार ! मग ‘डार्विनचा सिद्धांत’ सत्य ठरायचा; धडधाकट, भक्कम विद्यार्थी पुढचे बाक पकडायचे आणि कृश, दुबळे मागे लोटले जायचे. त्यांना समोरचे फळ्यावरचे काही दिसत नसे आणि बऱ्याच वेळा पुढे बसणाऱ्याला समोरचे सर्व दिसत असूनही काही समजत नसे. हे शिक्षकांच्या देखील लक्षात यायचे, पण कसातरी मार्ग काढला जायचा, वर्ग सुरळीत सुरू व्हायचा.
सुरूवातीला तर आपल्याला कोण शिकवत आहे, हे आपण नविन असल्याने, समजत देखील नसायचे, कारण ते शिक्षक त्यांचा परिचय कधी करून देत नसत. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मात्र क्रमाक्रमाने उठवून ते प्रत्येकाचे नांव विचारून घेत असत. आम्ही मुकाटयाने उठून उभे राहून पूर्ण नांव सांगत असू ! वडिलांचे नांव गाळून मग आपले नांव ‘ऐटीत’ सांगण्यास त्या वेळी विद्यार्थीदशेत परवानगी नसायची. या सर्वांची नांवे ऐकून व थोडेफार शिकवून, तास संपला की ते बाहेर जात. ते बाहेर गेल्याबरोबर उत्स्फूर्तपणे काय होत असेल, तर शेजारच्याला पहिला प्रश्न ! ‘कोणते सर होते ?’ हा प्रश्न विचारणे. तो जर आपल्यासारखाच नवखा असला तर मग त्याला पण माहीत नसायचे. अशावेळी वर्गातील जुनी अनुभवी मंडळी, कामास यायची. त्यांना माहीत असायचे. ते सांगायचे, ‘हे तिवारी सर, हे पाटील सर, हे वानखेडे सर वगैरे’ आम्ही त्यांच्याकडे आदराने बघायचो. ‘तुला कसे काय माहीत ?’ या आमच्या प्रश्नावर ‘मागच्या वर्षी हेच होते.’ असे उत्तर मिळायचे. आता अलिकडच्या काळांत सर्वांनाच ‘यशस्वी भव’ हा आशीर्वाद मिळाला असल्याने, या अशा अनुभवी विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत असावी.
‘हे सर, चांगले शिकवत होते रे गणित ! आपल्यावर यायला हवे. कोण होते ?’ मी.
‘हॅं !’ एक तुच्छतापूर्ण उद्गाराच्या हास्यात, ‘दीक्षित सर पाचवीला शिकवायला येणार आहे का ? ते ‘हायर मॅथेमॅटिक्स शिकवतात, ११ वी ‘अ’ ला ! भोकरीकर सर, दीक्षित सर, वानखेडे सर, लोहार सर, पाटील सर, देशपांडे सर वगैरे ही मंडळी वरच्या वर्गांना ! आपल्याला नाही. आणि आपण तर ‘ब’ मधे आहे’. त्याचे स्पष्टीकरण !
‘आणि ते इंग्रजीच्या तासाला आले होते ते ?’ मी.
‘कोणते ?’ त्याचा प्रश्न !
‘अरे, ते गोरे गोरे ! हातात हिरवीगार कडूलिंबाची काडी पण होती.’ माझे सरांबद्दल वर्णन !
‘ते जोशी सर ! ते इंग्रजी छान शिकवतात आणि खेळ पण शिकवतात, पण वरच्या वर्गांना ! जोशी सर, देशपांडे सर, एस् आर कुलकर्णी सर, पुराणिक सर वगैरे मंडळी वरच्या वर्गांना !’ त्याचे स्पष्टीकरण ! हा चांगलाच अनुभवी असावा, याची खात्री झाली.
अन्याय म्हणजे काय, हे नेमके त्यावेळी समजले जरी नसले, तरी त्याचा अनुभव आला. चांगले शिकवणारे सर्व वरच्या वर्गाला, आपल्याला नाही, कारण आपण खालच्या वर्गात, त्यांत पण ‘ब’ मधे ! अगदीच टाकावू ! आपल्या वाटेला कुठे येणार ही मंडळी ! ही फक्त वरच्या वर्गांसाठी आणि शक्यतोवर ‘अ’ वर्गासाठीच !
आपण काही वर्षांनी नक्कीच वरच्या वर्गात जाणार आहोत, आणि जायलाच हवे, त्यावेळेस हे सर्व आपल्याला असतील, हे आपण विसरून जातो ना ! त्यापेक्षा महत्वाचे, की या सर्व ‘चांगल्या’ शिक्षकांनी पण पूर्वी पाचवीपासूनच शिकवायला सुरूवात केली असते. अगदी ‘ब’ वर्गाला काय पण ‘क’ किंवा ‘ड’ वर्गाला पण त्यांनी शिकवलेले असते, चांगलेच शिकवलेले असते.सर्वांना पायथ्यापासूनच कळसापर्यंत जावे लागते. थेट कळसावर जावून कोणालाच ठाण मांडता येत नाही. आपल्याला प्रत्यक्षात शिकवायला जरी नसले, तरी आपण त्यांच्याकडून शिकू शकतो, हे लक्षात आले की सोपं होवून जाते सर्व ! आपण एकाच शाळेत असल्याने शालेय कार्यक्रमात सर्वांचा संबंध येतोच. एकाच गांवातील असल्याने गांवातील कार्यक्रमात पण संबंध येतो. बऱ्याच वेळी हा संबंध अगोदरच घरांपर्यंत पण आलेला असतो. त्यामुळे अगोदरचा परकेपणा किंवा भिती, नंतर कमी झालेली असते.
किंचीत उभट चेहरा, नेमके असलेले नाक, गव्हाळ वर्ण, डोळ्याला गडद तांबड्या फ्रेमचा चष्मा, अंगात बहुतेक वेळा अर्ध्या बाह्यांचा शर्ट, त्याला डावीकडे खिसा व त्यांत तीन पेन, त्यातला एक ‘तांबड्या शाईचा’ पेन, काळसर किंवा तपकिरी वा राखाडी रंगाची ‘नॅरोकट’ पॅंट ! थोडा थंडावा वातावरणांत असेल तर, गळ्यात मफलर, त्याची दोन्ही टोके छातीवर ! थंडी असेल तर डोक्याला लोकरीची टोपी व अंगात स्वेटर ! किंचीत मान उचलून वर व समोर बघण्याची लकब ! बघीतल्यावर त्यांची बुद्धी व सौजन्य कोणासही जाणवेल, असे चेहऱ्यावरील भाव ! सडसडीत व जाणवेल इतकी उंची ! चालतांना झपझप पण अदबीने चालण्याची पद्धत ! —— होय, देशपांडे सर ! उत्तम इंग्रजी शिकविणारे, नरहर अनंत देशपांडे !
त्यांच्या घरी आमचे जाणे-येणे असायचे आणि सरांची मुले आमच्याकडे जात-येत असत, एका गल्लीचेच काय ते अंतर ! त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या आत्याबाईच ! सर मात्र क्वचितच येत, जवळजवळ नाहीच !
देशपांडे सरांचा साहित्याचा व्यासंग उत्तम ! रावेरला प्राचार्य राम शेवाळकर यांचे दोन-तीन दिवस व्याख्यान होते, बालाजी मंदीरासमोर, बावीशे गल्लीत ! विषय बहुतेक ‘रामायणातील राम आणि महाभारतातील कृष्ण’ असा होता. वक्ते नामवंत होतेच आणि सभेचे अध्यक्षपद सांभाळले होते, देशपांडे सरांनी ! एका तालुक्यांतील शाळेत इंग्रजी विषय शिकवणारा शिक्षक, सभेचा अध्यक्ष होतो, कोणत्या सभेचा, तर प्राचार्य राम शेवाळकर सारखे साहित्यिक वक्ते जिथं या अशा संशोधनात्मक असलेल्या विषयावर बोलणार आहे, त्याचा ! रावेरच्या रसिक श्रोत्यांची निवड चुकलेली नव्हती, हे ज्यावेळी प्रत्यक्ष प्राचार्य राम शेवाळकरांची कौतुकाची थाप त्यांचे सर्वंकष अध्यक्षीय भाषण ऐकल्यावर त्यांच्यावर पडली, त्यावेळी सिद्ध झाले.
‘संस्कृत दिन’ आमच्या शाळेत तसेच गांवी साजरा होत असे. संस्कृत हा विषय त्यांत मार्कस् चांगले मिळतात म्हणून बरेच विद्यार्थी घेतात. माझा पण संस्कृत विषय होता. संस्कृत दिन याचा कार्यक्रम होता, रामस्वामी मठात ! त्या दिवशी देशपांडे सर, व्यवहारे सर, पुराणिक सर वगैरे मंडळी संस्कृतमधे बोलली. संस्कृतमधे बोलतात ते मला फक्त पुणे आकाशवाणीवर सकाळच्या सुधा नरवणेच्या प्रादेशिक मराठी बातम्यांच्या अगोदर, आकाशवाणीवर संस्कृत बातम्या लागायच्या म्हणून माहिती ! बाकी रावेरमधे पण कोणी खडखडा संस्कृतमधे बोलतील, बोलू शकतील ही कल्पनाच डोक्यात नव्हती !
आम्हाला शिकवणारे सर्वच शिक्षक चांगले होते, प्रश्न आमच्या क्षमतेचा असे. तरी पण आपल्यावर नसलेले शिक्षक आपल्यावर शिकवायला यांवे, हे वाटायचेच ! देशपांडे सर यांच्या शिकवण्याचा अनुभव मला आला, तो थेट ११ वी मधे ! माझी ११ वी, लक्षात रहाणाऱ्या दोन गोष्टी - पहिली म्हणजे बरेच दिवस चाललेला शिक्षकांचा संप, त्यामुळे त्या काळातील भालेराव सरांचा भूगोलाचा तास सोडला, तर पूर्ण वेळ आम्ही मैदानावर असू ! आणि दुसरी म्हणजे आमच्या पुढाकाराने काढलेला विद्यार्थ्यांचा मोर्चा ! याची बातमी, त्यावेळी सर्व वर्तमानपत्रात नांवासह आली होती. आकाशवाणीवर पण आली होती.
आम्हाला देशपांडे सरांनी आम्ही ११ वी ला असतांना, अप्रतिम इंग्रजी शिकवले ! ‘आपले विचार, आपल्या लिखाणात मांडा’ हे त्यांचे सांगणे ! माझे इंग्रजी एका मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्याचे जेवढे चांगले असावे, तितपतच चांगले होते. एकदा एका निबंधाला सरांनी ‘Fair’ It is appreciable that you write your thoughts in your own language!’ हा त्यांनी निबंधाला दिलेला शेरा, मला आयुष्यभर माझ्या पुरणारा आहे. आपली शिक्षकमंडळी आपल्याला फक्त त्याच वर्गाच्या अभ्यासक्रमाचे शिकवत नाही, तर आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अभ्यासक्रमाचे पण शिकवतात. विद्यार्थ्याचे फक्त लक्ष हवे.
देशपांडे सरांनी शिकवलेली ‘स्पायडर’ ही कविता अजूनही, अस्पष्ट का होईना, पण आठवते. त्यांतील शब्दार्थ व भावार्थ खूप छान समजावून सांगीतला होता.
A hungry Spider made a web
Of thread so very fine,
Your tiny fingers scarce could feel
The little slender line.
Round-about, and round-about,
And round-about it spun,
Straight across and back again,
Until the web was done.
For all the flies were much too wise
To venture near the Spider;
They flapped their little wings and flew
In circles rather wider.
Round-about, and round-about,
And round about went they,
Across the web and back again,
And then they flew away.
माझी येथील शाळा संपली, मी जळगांवी गेलो. कधी आलो तर येथील जुने मित्र भेटायचे. सरांशी जावून भेटायचे व बोलायचे, ही हिंमत अजून आली नव्हती. सर पण निवृत्त झाले होते. बावीशे गल्लीतले भाड्याचे घर सोडून त्यांनी शिक्षक कॉलनीत त्यांचे नवीन घर बांधले होते. तिथं रहायला गेले होते ते ! पुन्हा रावेरला आल्यावर सरांना आणि आत्याबाईंना असंच बोलावले होते. जेवणखाण झाले, माझ्या आईवडिलांशी गप्पाटप्पा झाल्यात ! माझी ख्यालीखुशाली झाली. त्यांची मुलं म्हणजे माझी मित्रमंडळी वेगवेगळ्या गांवी, त्यांच्या उद्योगात होती.
त्यांनी नवीन घर बांधल्यावर, ते हे भाड्याचे घर सोडून तिकडे रहायला जाणार हे स्वाभाविक होते. समाजात न मागता व मोफत सल्ला देणारी मंडळी खूप असतात. तो काही वेळा योग्य असतो, तर काही वेळा अयोग्य ! काही वेळा हिताचा व फायद्याचा तर काही वेळा अहिताचा व गड्ड्यात घालणारा ! यांना पण असा बऱ्याच जणांनी त्या वेळच्या रितीप्रमाणे सल्ला दिला. साधारणपणे भाडेकरू हा घरमालकाला, त्याने आयुष्यभरात आजपावेतो जितके घरभाड्याच्या रकमेपोटी म्हणून पैसे दिले असतील, त्यापेक्षा जास्त रक्कम त्या घरमालकाकडून घेवून, मगच त्याची जागा त्याच्या ताब्यात देतो. या रितीला अनुसरून ‘तुमचे नुकसान होवू देवू नका. घरमालक चांगले आहे, ते देतील.’ सल्ला देत होते. हे काही सरांच्या मनाला पटत नव्हते.
‘ज्या वेळी शिक्षकाच्या गरिबीला आणि भाडेकरू कायद्याला पाहून, शिक्षकाला कोणी घरसुद्धा भाड्याने देत नसे, त्या काळांत त्यांनी मला भाड्याने घर दिले. मी घर बांधले. आता त्यांना धन्यवाद देवून, त्यांचे घर सोडायला हवे.’ त्यांचे निर्वाणीचे उत्तर ऐकले आणि त्यांनी घर सोडले. आपल्या स्वत:च्या घरात ताठ मानेने गेले.
कोण म्हणते, की शिक्षक फक्त शाळेत असतांनाच शिकवतात, त्यांच्या वर्गात बसले तरच समजते आपल्याला ! आणि तेवढाच त्यांना पगार मिळतो. लक्षात ठेवा, काही काही शिक्षक असे पण असतात, त्यांचे आपल्या विद्यार्थ्याला शिकवणे शाळा सोडल्यावर पण संपलेले नसते. आणि असे काही आपल्याला शिकवून जातात, ते आयुष्यभर पुरते ! याचा पगार पण त्यांना देत नाही कोणी ! बसं, अशी काही तरी एखादे वेळी, कोणी आठवण काढली की त्यांना बोनस मिळाल्याचा आनंद होत असेल स्वर्गात !

९. १२. २०१८

No comments:

Post a Comment