Thursday, December 20, 2018

आज श्रावण वद्य अष्टमी, गोकुळ अष्टमी !

आज श्रावण वद्य अष्टमी, गोकुळ अष्टमी !
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
या आपण दिलेल्या वचनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी दुष्टांचे निर्दालन आणि सज्जनांचे संवर्धन करण्यासाठी या भारतवर्षात जन्म घेतला, तो पण तुरूंगात ! कारण करणार काय, प्रत्यक्ष जन्मदाते आईवडील, देवकी आणि वसुदेव, हे तुरूंगात डांबले गेले ते सख्ख्या मामामुळे ! तो मामा पण सर्वसाधारण नव्हता, तर तत्कालीन सत्ताधीश व समर्थ राजा होता. ‘देवकीचा आठवा पुत्र हा तुझा काळ ठरणार आहे’ या भविष्यवाणीने हादरलेला कंस, दुसरे काय करू शकणार ? वसुदेव व देवकीची अपत्ये जन्मताच मारून टाकणे, हे त्यांना तुरूंगात टाकल्यावर तर फारच सोपे होते. पण या विपरीत परिस्थितीत, संकटांना तोंड देत, भगवंतांनी आपले अवतारकार्य, या आपल्या पूर्णावतारात पूर्ण केले.
गोकुळाष्टमी म्हटले की माझ्या अजूनही काही आठवणी जाग्या होतात. आमच्याकडे गोकुळाष्टमी साजरी करायचे, वैशिष्ट्यपूर्ण पूजा असायची. श्रावण महीना असल्याने वातावरण पावसाळी ! आमचे घर काय आणि आसपासची गल्लीतील इतर घरे काय, त्यांच्या जन्माची शंभरी त्यांनी कधीचीच पार केलेली ! भोकरीकर गल्लीत बहुसंख्य भोकरीकर मंडळीच रहात होती. मुळात ही सर्व मातीचीच घरे, मजबूतीसाठी म्हणून वरून चुन्याची टीप मारलेली आणि भरपूर लाकूडकाम असलेली घरे; पण भरभक्कम वाटत ! श्रावणातील पावसाळी वातावरणामुळे घरे ओलसर वाटत, दमटपणा जाणवे ! यावेळी साहजिकच पानेफुले भरपूर असत. या महिन्यांत मंगळागौर, श्रावणी सोमवार, रूद्रावर्तन, पाऊस आला नाही तर महादेवावर अभिषेक आणि संततधार घरत त्याला पाण्यात ठेवणे, जिवतीचे शुक्रवार, राखी पौर्णिमा, राणूबाई काणूबाईचे रोट, नागपंचमी वगैरे भरगच्च कार्यक्रम असे, त्यात ही गोकुळ अष्टमी !
गोकुळ अष्टमीचा जास्त उत्साह असायचा तो माझी सर्वात मोठी काकू, कुसूम काकू हिला ! तिला काकू म्हणून कोणीही हाक मारले नाही, अगदी आम्हीच काय, पण गांवातील कोणीही ‘कुसूम वहिनी’ या नांवाशिवाय तिला कधी हाक मारले नाही. माझी चुलतभावंडे, म्हणजे तिची मुलं पण, तिला ‘वहिनी’ म्हणूनच हाक मारत.
परिस्थितीने आलेल्या अनुभवाने माणसाला ज्ञान मिळते, ते वरवरचे नसते, अनुभव वाईट असेल, तर त्या ज्ञानाचा रंग पक्का असतो. पूर्वी भरपूर गडगंज असलेल्या आमच्या घरातील सर्व मंडळींनी, नंतरच्या आलेल्या दुर्दैवी आघातांनी जे काही असंख्य हालअपेष्टात दिवस काढले असतील, काही वेळा अर्धपोटी वा उपाशीतापाशी दिवस काढले असतील, या अनुभवातून मिळणारे ज्ञान ही मंडळी कधी विसरली नसतील. आमची ही वहिनी, रात्रीअपरात्री कोणी घरी कितीही वाजता आला, तरी त्याला घरांत जर एखादवेळेस अन्न जरी शिल्लक नसेल, तरी टंगळमंगळ करायची नाही; ‘जेवण करून घ्या’ म्हणत स्वयंपाक करून खावू घालायची. मात्र उपाशी निजू द्यायची नाही. आता अपरात्री गेल्यावर जावू द्या, जेवायच्या वेळेवर जरी योगायोगाने गेलो, तरी अनुभव सांगण्यासारखे नसतात.
आमच्या घरी गोकुळाष्टमी करायची म्हणजे त्या दिवशी उपवास असायचा. मुलांना उपवासातून सूट असे. पण उपवास नसला तरी उपवासाचे पदार्थ खाल्लेले चालतात, ही फार मोठी सोय करून ठेवलेली असल्याने, जेवण केल्यावर त्यांच्यासाठी उपवासाचे म्हणून केलेल्या पदार्थावर हात मारता यायचा. जन्माष्टमीला आमचे घरी मातीचे गोकुळ करावे लागायचे. मग त्यासाठी कुठूनकुठून माती आणणे, ती पण शक्यतोवर चिकणमाती आणणे. कारण त्या शिवाय गोकुळ नीट तयार व्हायचे नाही. आमच्या देवघरांत साधारण दीडदोनवीत लांब व रूंद असा मजबूत पितळी चौरंग आहे. त्यांवर हे मातीचे गोकुळ, बहुतेक मधल्या घरात बसून, तयार केले जायचे. त्यावेळी आम्ही घरची मुलं काय आणि बाहेरची मुलं काय, यांत काहीही फरक नसायचा. गल्लीतील सर्व घरातील मुलं, ही प्रत्येकाच्या घरातलीच मुलं असायची. वहिनीच्या चारही बाजूला आम्हा मुलांचा गराडा असायचा. त्यावेळी माझ्या आजीचे सोवळे कडक असले, तरी तेव्हा थोडे बाजूला ठेवले जायचे. एकतर ही सर्व मंडळी म्हणजे बालगोपाळ मंडळी यांना आज काय बोलायचे आणि दुसरे म्हणजे तिचे याबाबतीत जातीपातीचे मूर्खासारखे विचार नव्हते.
‘मातीत खेळू नका’, हे या दिवशी फार काही सांगीतले जात नसे कारण वहिनीच हे माती-चिखलाचे घमेले घेवून बसलेली असे. शेजारी वाडग्यात पाणी, तुरखाटीच्या काड्या, झाडांची वा तुळशीचे पान असलेली काडी वगैरे सामुग्री पण असे ! मग छोट्याछोट्या गायी आणि कृष्णाचे सवंगडी तयार केले जात, ते चौरंगाच्या एका बाजूला ! हे गोकुळ असे, मधे थोडी मोकळे वळण करून त्यात पाणी - ही यमुना नदी ! एका बाजूला वसुदेव-देवकी यांच्या मूर्ती आणि जवळच जरा मोठी माणसाची मूर्ती, म्हणजे तो कंस ! कोपऱ्यात नारदमुनी ! या सर्वांना डोळे हवे, मग ज्वारीचे दाणे त्यांच्या डोळ्यांच्या जागी लावले जात. मध्यभागी हा त्यातल्यात्यात लांब नाग तयार केला जाई, हा कालिया नाग ! त्याच्या शेजारी काही बोटभर लांबीच्या नागाच्या मूर्त्या, या कालियाच्या बायका ! कुठं जंगल दाखवतांना, मातीत झाडांच्या छोट्या काड्या खोचल्या जात व तुळशी वृंदावनात तुळस खोचली जाई. हा असा सर्व जामानिमा होईपर्यंत तो चौरंग जवळपास गच्च भरून गेलेला असे. मध्यभागी जेमतेम आगपेटी एवढीच जागा शिल्लक असे, तिथं मग देवघरातील पितळीचा मोठा लंगडा बाळकृष्ण, उजव्या हातात लाडू घेतलेल्या अवस्थेतील, ठेवला जायचा. हे सर्व तयार झाले की मग हा चौरंग देवघरासमोर ठेवला जायचा.
रात्रीच्या पूजेची तयारी करावी लागायची. आम्हाला मातीत दिवसभर खेळायला मिळते या कारणाशिवाय, अजून गोकुळ अष्टमी आवडण्याचे कारण म्हणजे वेगवेगळे नैवेद्य ! दूधसाखर, दहीसाखर, लोणी व खडीसाखर आणि सुंठवडा ! सुंठवडाच थोडा तिखट लागायचा, पण तो आवडायचा ! पुन्हा दुसऱ्या दिवशी गोपालकाला ! पूजा व्हायची, हळदीकुंकू वगैरे सर्व वाहले जायचे. कृष्णाच्या आरत्या म्हटल्या जायच्या. त्यात माझी आजी ‘आरती कुंजबिहारीकी गिरीधर कृष्णमुरारीकी’ ही मला फारच वेगळी वाटायची.
आरत्या या मराठी किंवा संस्कृतमधेच असतात हा माझा समज ! मराठी आरत्या मला माहिती होत्या. सत्यनारायणाचे पूजेनंतर कै. मधुकर विटवेकर हे संस्कृतमधेच आवर्जून आरती म्हणायचे. त्यांना बऱ्याच संस्कृतमधल्या आरत्या यायच्या. तेव्हा मला मराठी व संस्कृतबद्दल आरत्या आहेत याची जरी शंका नव्हती तरी, आजीने म्हटलेली ही हिंदी आरती मी पहिल्यांदा ऐकली, तेव्हा ‘ही कोणत्या भाषेतील आरती’ म्हणून मी अवाक होवून बघत होतो. सर्व आरत्या संपल्या की मंत्रपुष्पांजली नंतर फुले, अक्षता वाहल्या जात. मग हा वेगवेगळा प्रसाद मिळे.
मग आमच्या गांवातील कृष्णाच्या मंदीरात दर्शनाला जायची तयारी ! गावांतील तीन मंदीरात कृष्णाच्या मूर्त्या होत्या. आमच्या गल्लीच्याच कोपऱ्यावर असलेले कै. नाना बुवा यांचे मुरलीधराचे मंदीर ! कै. नाना बुवा यांचे खरे नांव दिनकर शंकर बुवा पण या नांवाने व्यक्ती नेमकी लक्षात येण्यापेक्षा गोंधळ होण्याचीच जास्त शक्यता ! यांच्या मंदीरात कृष्ण जन्माचा उत्सव असायचा. दुसरे म्हणजे दत्तमंदीर ! हे दत्तमंदीर म्हणून जरी ओळखले जात असले तरी येथे सुंदर अशी मुरलीधराची मूर्ती आहे. मग तिथं पण दर्शनाला जावं लागे. तिसरे मंदीर म्हणजे ‘काट्यांचे मंदीर ! हे पाराच्या गणपतीजवळ होते, सध्या नाही. ही सर्व मंडळी नागपूर येथे असल्याचे समजते. इथं मी आजीबरोबर बऱ्याच वेळी जात असे. तेथील महाराज भागवत पण वाचत.
गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक शाळेला सुटी असे. आज कृष्णाचा जन्म झाला आणि सुटी उद्या का ? हे असले प्रश्न त्यावेळी मनांत येत, पण उत्तर आणि त्या मागचे कारण माहिती नसे. ते समजण्याच्या आंत दुसरा कुठला सण सुटी घेवून येत असे. त्यामुळे सुटीचे कारण किंवा माहिती नसली, तरी आम्हाला मिळणाऱ्या आनंदात काही फरक पडत नसे. आज आपणा सर्वांना या अशा गोष्टींची व त्यांच्या सुटींची उत्तरे आणि कारणे माहिती आहे, पण तितका सुटीचा आनंद आहे का ?

२. ९. २०१८

No comments:

Post a Comment