Thursday, December 20, 2018

मी चौथीत असतांना आमचा अभ्यासक्रम बदलला, त्यामुळे आमची पुस्तके बदलली. माझी आई पुस्तके बदलल्यावर चिडायची, नवीन पुस्तके आणावी लागायची, पूर्ण पैसे देवून; पण तिची अडचण तिला माहीत ! आम्हा मुलांना काय त्याचे ? तिचे नेहमीचे म्हणणे, ‘पुस्तके बदलतात म्हणजे काय करतात ? इतिहास बदलतो का भूगोल बदलतो ? सायन्स, गणित व भूमितीत काय बदलणार ? भाषांतील धडे बदलवतात, काही दम नसलेले धडे कविता टाकतात, आणि मुलांना नविन पुस्तके घ्यायला लावतात.’ तिच्यातली सहन करावी लागणारी अडचण बोलायची !
पण काही असले, तरी पुस्तके नविन मिळाल्यानंतर होणारा आनंद जास्तच असतो. त्यामुळे अभ्यासक्रम बदलल्यावर मराठीचे नवीन पुस्तक आले. त्यांत ओळखीचे धडे व कविता नव्हत्या. कशा असणार ? त्यावेळी जुन्या मराठी चौथीच्या पुस्तकातील एक कविता मला फार आवडायची, ती 'श्रावणबाळ' या नांवाची, कवी - ग. ह. पाटील यांची ! पण ती मला अभ्यासाला राहिली नसल्याने मी त्यावेळी नाराज झालो होतो. आज पुन्हा दिसली आपल्यासाठी देत आहे.
शर आला तो, धावुनि आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
हा! आई गे! दीर्घ फोडुनि हाक
तो पडला जाऊन झोक.
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी.
(चाल बदलून)
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणूनी नयनी
तो वदला, हा हंत! तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा.
मग कळवळुनि नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधली वेळ
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असतील बसले
कावड त्यांची घेऊन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला
(चाल बदलून)
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगभग भरुनि झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला
मी एकुलता पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृद्धपणी मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा, बघतील ते वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
(चाल बदलून)
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मजमाघारी करा तुम्ही सांभाळ
होऊनिया श्रावणबाळ.
परि झाकुनी हे सत्य कसे राहील?
विधिलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
घ्या झारी ... मी जातो .. त्याचा बोल
लागला जावया खोल
(चाल बदलून)
सोडिला श्वास शेवटला
तो जीवविहग फडफडला
तनुपंजर सोडुनि गेला
दशरथ राजा, रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी.
कवि - ग. ह. पाटील.

१४. ९. २०१८

No comments:

Post a Comment