Thursday, December 20, 2018

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही तत्कालीन शासनाची असते. अपेक्षा असते की शासन ही जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडेल.
ही जबाबदारी ज्यावेळी पार पाडायची असते, आणि ज्या खात्यांच्या आधाराने पार पाडायची असते, त्यावेळी ती खाते ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असावयास हवी, त्यांच्याकडे पुरेसे तज्ञ संख्याबळ हवे. त्या विभागाची आणि त्यातील कर्मचाऱ्यांची पण मानसिकता, ही शासन आपली कर्तव्ये पार पाडतांना, आपण जी आणि जशी अपेक्षित करतो, तशीच हवी; म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पण आपली जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडावयास हवी. असे किती कर्मचारी हे आजच्या शासनाच्या विविध खात्यांत काम करतांना आपल्याला दिसतात ? उत्तर सर्वांना माहिती आहे.
आम्हाला सरकारने नोकऱ्या दिल्या पाहिजेत यासाठी आपण सर्व आग्रही असतात, पण ही अशी काम करणारीच माणसं भरती करा, अशी कोणीही मागणी करत नाही. याच्या विपरीत जर कोणी काम करत असेल तर, असे काम करायला प्रवृत्त करणारे तसेच यांतून काही अडचण उद्भवली तर यांना वाचवणारे पण आम्हीच असतो. आम्ही म्हणजे आमचे शासन आणि जनता ! आपण ज्यांना शासन म्हणून समजतो, यांचा जर अभ्यास केला तर भलत्यासलत्याच बाबी पुढे येतात. जनतेबद्दल तर काय बोलणार नागरिकांची कर्तव्ये ही फक्त मराठी सातवी पर्यंत वीस मार्कांसाठीच असतात, त्याचा उपयोग आपल्याला करण्यासाठी नाही, ही बहुसंख्यांची समजूत !
विपरीत काम म्हणजे कायद्याच्या विपरीत काम ! कायद्याच्या विपरीत काम करायला प्रोत्साहन दिले जात असेल किंवा यांकडे डोळेझाक केली जात असेल, तर सुव्यवस्था ही बिघडणारच, यांत शंका नाही.
याची तक्रार घेवून जर आपल्यापैकी कोणी न्यायालयांत गेले, तर या व्यवस्थेने मांडलेल्या वस्तुस्थितीवरच निर्णय होणार ! न्यायालयातील न्यायाधीश किंवा वकील हे देव नाहीत. तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत. विरूद्ध पक्षाने केलेल्या चुकीचा, गलथानपणाचा, मग हे जाणूबुजून किंवा अजाणतेपणाने असो, फायदा दुसरी बाजू घेणारच ! याची तक्रार कशासाठी करणार ?
मतितार्थ - कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या शासनाने आपले कर्मचारी नेमतांना, त्यांना रोजगार मिळायला हवा, ही भावना अजिबात न ठेवता, हे कर्मचारी नेमून दिलेले काम जबाबदारी काळजीने, प्रामाणिकपणे आणि कुठलाही भेदभाव न करता पार पाडेल का, याचा विचार करूनच नेमले पाहिजेत ? हे आपल्याला जमलं, की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुटू लागेल.
Sameer Gaikwad यांची नुकतीच पोलीस व न्यायव्यवस्था याबद्दल पोस्ट वाचली, यावरून !

२२. ८. २०१८

No comments:

Post a Comment