Thursday, December 20, 2018

आज श्रावण महीना सुरू झाला. पण श्रावण महीना म्हणण्यापेक्षा, श्रावणमास म्हटलं की डोळ्यांसमोर हिरवागार निसर्ग येतो, दऱ्याखोरे, झाडंझुडूपं, नद्यानाले येतात. निळं गडद ढग येतात, मधूनच सूर्यकिरण चमकतात. पशुपक्षी येतात.
चिमण्यांची उन्हं पडलेली असतांनाच पाऊस पडला, की लग्न लागतात ही आमची बालवयातील समजूत ! त्यांची लग्नकार्य चातुर्मासात बंद वगैरे नसतात. पशुपक्षांना कसला आलाय चातुर्मास आणि त्यातील व्रतवैकल्य ? ते तर खरं निसर्गसाथी, निसर्गपूजक !
खरं तर श्रावणमास म्हटलं की मला, आमच्या शाळेत शिकलेली निसर्गकवि, बालकवि त्रंबक बापूजी ठोमरे, या आमच्या खानदेशातील कविची ‘श्रावणमासी’ ही कविता आठवते. कित्येक श्रावणमास गेले असतील, बालकविंच्या पश्चात पण त्यांच्या ‘श्रावणमासी’ या कवितेची हिरवीगार, मखमली चादर आपल्या मनांवरून काही हटत नाही, हटणार नाही.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
——————— ————— ———— ——-
श्रावणमास आणि त्यांतील निसर्ग हा तर मनाला नवसंजीवनी देणारा, भुरळ घालणारा आणि एकमेकांना साद घालणारा ! ‘मिलन’ या चित्रपटातील नूतन आणि सुनीलदत्त हे श्रावणाचे गीत गात आहे.

१२. ८. २०१८

No comments:

Post a Comment