Thursday, December 20, 2018

आमचे एकत्र कुटुंब पण खूप मोठे होते. आजोबा आणि त्यांचे सख्खे चार भाऊ ! त्यांचे अजून चुलत व चुलतचुलत भाऊ ! आमची रावेरला स्वतंत्र आमच्या नांवाची ‘भोकरीकर गल्लीच’ आहे.
कालौघात काही मंडळी फार पूर्वीच पोटापाण्यासाठी, उद्योगानिमीत्त वेगवेगळ्या गांवी गेली. काहींच्या शेतीवाडी कायद्याने किंवा अन्य कारणांनी गेल्या. गांव सोडणे भाग पडले. मग त्यांचा रावेर या गांवाशी काही संबंध राहीला नाही. देवधर्म काय तो गांवी राहिला. देव सर्वत्र आहे, या विचाराचे असल्याने मग मुद्दाम रावेरला येण्याचे काही कारण पण राहीले नाही.
पण काहीवेळा या आडनांवाशी परिचित असलेली कोणी कुठेतरी भेटले, तर मला विचारायचे ‘त्या अमक्या भोकरीकरांचे तुम्ही कोण ?’ मला मग उत्तर देणे कठीण व्हायचे. ते आपल्याच घरातील आहे किंवा नाही, याचा अंदाज यायचा नाही. अलिकडे सारखी आडनांवे आढळतात, ती त्यांनी नुकतीच बदललेली असतात. मग सोपा उपाय काढला आणि उत्तर निश्चित केले - ‘ते रावेरचे भोकरीकर असतील, तर मग आमचेच भाऊबंद ! नसतील तर मग नाही !’ मग त्याचे समाधान होई, ‘त्यांना विचारतो गेल्यावर, की ‘ते रावेरचे म्हणून का ?’
काही असलं तरी आपल्या गांवातील कडूगोड आठवणींसहीत ते ‘आपलंच’ गांव असते.

१४. ११. २०१८

No comments:

Post a Comment