Thursday, December 20, 2018

राग मुलतानी

काही आठवणी आणि व्यक्ती आपल्या मनांत इतक्या काही पक्क्या रुतलेल्या असतात, की कित्येक वर्षानंतर जरी आपल्याला कोणतीही वेगळी घटना दिसली, तरी तो पूर्वीचा प्रसंग आणि त्यावेळचा क्षण अगदी लख्ख आठवतो.
जळगांवमधील, आता ज्याला जुने एस टी स्टॅन्ड म्हणतात त्याच्या शेजारी, काँग्रेसभुवन आहे. जुनी दोन मजली इमारत. तळमजल्यावर मध्यभागी उजवीकडे वाचनालय आहे, तिथे मी फक्त वर्तमानपत्रच बघीतले आहेत. अजूनही काही पुस्तकांची कपाटे आहेत, पण कोणाच्या हातात, कधी त्यातील पुस्तके बघीतली नाहीत. त्याच्या वरच्या मजल्यावर, एक मोठा हॉल आहे. तिथे सुटीत काही कार्यक्रम ऐकावयास मिळायचे. त्या हॉलचे आणि शास्त्रीय संगीताचे काय नाते आहे, ते माहीत नाही; पण बरेचसे खाजगी संगीताचे, संगीत स्पर्धेचे, किंवा संगीतातील विशारदच्या वेळी घेतले जाणारे सभागायन हे मी तिथेच किंवा बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत ऐकलेले आहेत.संगीत सभा किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी ब्राह्मणसभेत फक्त ब्राह्मणांनीच यावे, असे अजिबात नसायचे, उलट त्यांच्या व्यतिरिक्त इतरांचीच संख्या जास्त असायची. त्यांत पण सर्वांना खरोखर आनंद असायचा. असो.
काँग्रेसभुवन येथे एकदा जळगावातीलच एक शिक्षक श्री. उपासनी यांच्या सत्कारानिमित्ताने कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांचे शिष्य श्री. अजित कडकडे आणि बहुतेक श्री. राजा काळे हे त्यावेळी तानपुऱ्यावर होते. पं. अभिषेकींचे गाणे आणि चांगले झाले हे म्हणजे द्विरुक्ती ! खरोखरच अप्रतिम गाणे झाले होते. त्यांचे 'काटा रुते कुणाला' हे नाट्यगीत तर फार रंगले.
जळगावात 'विकास मंडळ' नावाचे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे एक मंडळ आहे. ते संगीताचे कार्यक्रम, स्पर्धा घेत असत. त्यांत पुढाकार म्हणजे कै. विनायकराव पुराणिक, कै. शरदराव धर्माधिकारी, कै. बबनराव भावसार वगैरे मंडळींचा असे आणि त्यांना मार्गदर्शन हे गुरुवर्य कै. गोविंदराव कुलकर्णी यांचे असे. एकदा विकास मंडळ यांनी आयोजिलेल्या स्पर्धेत, मी पण माझ्या महाविद्यालयीन काळांत तबलावादनांत भाग घेतला होता, स्पर्धा दोन दिवस चालली होती. त्यांत आताचे प्रथितयश कलाकार, गायक श्री. हेमंत पेंडसे हे पण होते. मला एकल तबलावादनातील, प्रथम क्रमांक मिळाला होता. आता काही वाजवता येत नाही. त्यापूर्वी एकदा त्यांनीच, 'विकास मंडळ' यांनी युवकांची 'शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा' आयोजित केली होती. त्या दरम्यान जळगावला नुकतेच आकाशवाणीचे केंद्र सुरु झाले होते. आकाशवाणीच्या पण शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा असायच्या. त्यामुळे तयारी होईल या इच्छेने खूप जणांनी भाग घेतला होता. स्पर्धा दोन दिवस चालली होती, हे आठवते. त्यातील एकाला आवडणारा राग म्हणजे - मुलतानी ! तो त्यांनी तयारीने म्हटला होता. तबल्यावर कै. बबनराव भावसार होते. मुलतानी मधील - 'गोकुल वा' हा ख्याल आणि 'सुंदर सुरजन वा साई रे' हा छोटा ख्याल किंवा चीज मला अजूनही आठवते.
मुलतानी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग, तोडी थाटातील ! दिवसाच्या तिसऱ्या प्रहराला म्हटलं जाणारा हा राग संधिप्रकाश काळातील समजला आणि गायला जातो. तोंडी थाटातील असला तरी तोडीसारखा वाटत नाही, मींड प्रधान राग आहे. आपल्या कानाला अत्यंत गोड वाटतो. या रागाची जाती - ओढव संपूर्ण ! याचा वादी हा पंचम तर संवादी षड्ज ! 'नि सा ग म प नि सा, सा नि ध प म ग रे सा' हे याचे आरोह-अवरोह ! यातील कोमल रिषभ, कोमल गांधार आणि तीव्र मध्यम हे वैशिष्ठ्य ! आरोहात रिषभ आणि धैवत घेत नाही, अवरोहांत मात्र सर्व स्वर घेतात. मंद्र निषादापासून सुरु होणारा आरोह घेत पुढे जाणारा गायक हा पहिले तीव्र मध्यम घेतो आणि मग कोमल गांधारावर येतो, हे याचे खास वैशिष्ठय. कोमल रिषभाला षड्जचा कण लावून आणि कोमल गांधारला तीव्र माध्यमाचा कण लावून मींड घेत गावा, अंगावर रोमांच उभे रहातात.
संगीत मानापमान या नाटकातील कै. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे हे नाट्यपद संगीताने सजविले आहे ते कै. गोविदराव टेम्ब्रे यांनी, यांच्या हाताने हार्मोनियम बोलायचा म्हणे ! हे नाट्यगीत 'मुलतानी' रागातील, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजांत -
प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास हो मी तुला
मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद
किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला
हिंदी चित्रपट - 'शबाब' यातील संगीतकार नौशाद यांनी संगीत दिलेले आणि उस्ताद अमीरखां यांनी गायलेले 'दया कर हे गिरीधर' हे गीत !
आणि शास्त्रीय संगीतातील सध्याची आघाडीची गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी -

११. ८. २०१८

No comments:

Post a Comment