Thursday, December 20, 2018

जळगांवहून औरंगाबादला जातोय. गाडीत कसली सीडी का पेन ड्राईव्ह होता. कोणत्या तरी आॅर्केस्ट्रात गायलेल्या गाण्यांचे रेकॉर्डिंग होते. डोळे मिटून बसलो होतो. रस्ता गाडीत पण सरळ व स्वस्थ बसू देत नव्हता. नदीतील वाहतूक मा. नितीन गडकरी सुरू करतील तेव्हा करतील, पण सध्या रस्यावरूनच नदीतील वाहतुकीचा अनुभव कारमधून घेतो आहे. अशा हिंदकळत हिंदकळत अवस्थेत झोप लागणे शक्य नसते, कितीही थंडगार वाटत असलं तरी ! मिटल्या डोळ्यांनी बसलो असलो, तरी माझ्या कानावर गाणी पडत होती.
अचानक ‘दिल तो हैं दिल’ हे गाणे कानावर पडले. मी डोळे उघडले आणि ऐकू लागलो. स्वर लता मंगेशकर यांचा नव्हता, हे निश्चित ! पण मिटलेल्या डोळ्यांना टक्क उघडण्याचे सामर्थ्य हे लता मंगेशकर यांच्या आपल्या मनांत रूजलेल्या आणि डोक्यात पक्क्या असलेल्या गाण्याच्या चालीत असते. ते गाणं कोणीही म्हणो, आपली उत्स्फूर्त दाद असते, ती गानसम्राज्ञी स्वरलतेला, त्या लता मंगेशकर यांना ! कल्याणजी आनंदजी यांच्या स्वर साजेला !
जुनी गोष्ट आहे. सन १९७८-७९ ची असावी. भुसावळला नातेवाईकांकडे लग्नाला गेलो होते. राममंदीर वॉर्डात लग्न होते. महाविद्यालयात जावू लागलो होतो. चित्रपट पहावेसे वाटायचेच, सर्वांसाठी करमणुकीचे साधन तेवढेच ! भुसावळला सातारा पुलापाशी एक सिनेमा टॉकीज आहे. तिथं लागला होता, ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट ! तिथं लग्नासाठी जमलेल्यांपैकी काहींनी ‘मुकद्दर का सिकंदर’ला जाण्याचे ठरवले. लग्न वगैरे आटोपले. संध्याकाळी सहाचा असेल तो शो ! सोबत कोण होते, हे पण आठवत नाही आता. पण चित्रपटातील ‘सलामें इश्क, मेरी जान’ म्हणणारी रेखा डोळ्यासमोर अजून उभी रहाते. ‘दिल तो हैं दिल’ म्हणत पियानो वाजवणारी राखी आणि टाईपराइटर वरून उठणारा विनोदखन्ना डोळ्यासमोरून हटत नाही. ग्रीलच्या खिडकीतून पहाणारा आणि नंतरच्या काळात महानायक हे बिरूद मिरवणारा अमिताभ बच्चन ! कोण व कसे विसरणार ? दोघांची राखीसोबतची ती स्वप्नदृष्ये ! घाऱ्या तपकिरी डोळ्याची राखी आणि अमिताभ बच्चन ! आसपास पडलेल्या पर्वतातील बर्फात फिरत आहेत, हे एक ! आणि स्वर्गातील दृष्याची आठवण करून देणारे दुसरे हे दृष्य - मजबूत बांध्याचा कै. विनोद खन्ना आणि तीच घाऱ्या तपकिरी रंगाची राखी ! गीत संपता संपता कागद वाचल्यासारखा करून ओठाला लावणारी, दोन्ही गालांस लावणारी राखी, आणि गाणे संपल्यावर मागे दूर येवून उभा असलेला विनोद खन्ना ! काय विसरणार ?
ही अशी काही चित्रे असतात, की ती मनांत अजूनही स्पष्ट असतात. मनावर छापलेली असतात की काय कोण जाणे ? त्यांच्यावर बरीच चित्रे पडलेली असतात ना, त्यामुळे भले त्यांच्याकडे पटकन लक्ष जात नाही काही वेळा, पण असा काही स्वर लागला, की आपण आपल्या कॉम्प्युटरला ‘फाईंड’ ही कमांड दिल्यावर, तो ज्या तडफेने लाखो शब्दांच्या आणि चित्रांच्या गोंगाटातून आपणांस हवे ते सुळकन समोर आणतो. बस, तोच आणि तसेच, हा आपल्या मनाचा कॉम्प्युटर करतो. हे असे स्वर कानावर पडले तर मिटलेले डोळे उघडावयास लावतात, आणि ही आठवण सुळकन डोळ्यांसमोर उभी करतात !
एखादा स्वर कानावर पडल्यावर, सन १९७८-७९ या निदान चाळीस वर्षांपूर्वीचे गाणे आणि मनाच्या खोल कप्प्यातील व डोक्यात रूतलेली ही आठवण जशीच्या तशी डोळ्यांसमोर आणणारे आपले परमेश्वरी संगणक !
आज रात्रभर तरी डोळ्यांसमोरचे राखी, अमिताभ बच्चन आणि कै. विनोद खन्ना हलणार नाहीत. ही आमच्या काळातील मंडळी आपल्या सोबत आमचा तो तरूणपणाचा काळ घेवून जातात, काही वेळा तर विनोद खन्नासारखे आम्हाला कायमचे सोडून जातात. आम्हाला सोडून जाणारी ही, त्यांच्या आठवणी तरी आमच्यासाठी का ठेवून जातात ?

२. ९. २०१८

No comments:

Post a Comment