Thursday, December 20, 2018

वकिलांचा कारकून - श्री. पं. र. श्रावक

वकिलांचा कारकून - श्री. पं. र. श्रावक
मी कधीमधी वसंतकाकांकडे जायचो, बैठकीत तर फारच क्वचित ! बहुतेक माझे काम असायचे ते आजीकडे ! तिला आम्ही राधाकाकी म्हणत असू ! काही निरोप असेल, तर आजी सांगायची, ‘जा काकांना, सांग. ते बैठकीत बसलेय.’ मगच बैठकीत जायचो. तेव्हा काही वेळा तिथं गोऱ्या उजळ वर्णाचा, गोलसर चेहऱ्याचा, उंच कपाळ, डोळ्यावर चष्मा, डोक्यावर टोपी, अंगात पांढरा सदरा व कमरेला पायजमा आणि हातात पेन, या अवतारातील एक जण, त्या घडीच्या लाकडी डेस्कमागे बसलेला दिसायचा. कै. वसंतकाकांसमोर पानाचे तबक पडलेले असायचे. ते तक्क्याला टेकून निवांत रेललेले असायचे. मग काकांना निरोप दिल्याचे आजीला सांगायचे. ‘दुसरं कोणी बसलंय तिथं बैठकीत’, हे आपण म्हटल्यावर, ‘कोणी नाही, पंढरी असेल !’ हे तिचे उत्तर यायचं !
मी वकिल झाल्यावर जसा काही महिने मुंबईला राहून रावेरला घरी आलो, तशी पंढरीची भेट होणे क्रमप्राप्त होते. माझ्या डोक्यात पंढरीचा विषय नव्हता. कारण वसंतकाका सन १९७८-७९ ला गेले व मी वकील सन १९८५ ला झालो. दरम्यानच्या काळात तसा कोर्ट, रावेर व पंढरी यांच्याशी संबंध येण्याचे काही कारण नव्हते.
श्री. पंढरीनाथ श्रावक, म्हणजे माझ्या मागच्या पिढीपासून, माझे काका ॲड. कै. वसंतराव भोकरीकर यांच्यापासून आमच्या घरी चालत आलेला, वकिलांचा म्हणून कारकून ! नेहमी ऐकायला यायचं, की रावेरला कोर्ट आणि पंढरी यांचे आगमन एकाच वेळी झाले. पूर्वी रावेरला कोर्ट नव्हतं. भुसावळला जावं लागे, रावेर तालुक्यातील लोकांना. सुरूवातीपासून पंढरी रावेर कोर्टात आल्यामुळे, अत्यंत अनुभवी ! नविन आलेल्या वकीलांना पंढरीच्या हाताखाली बरंच शिकायला मिळे. मात्र पंढरीच्या अक्षराबद्दल बोलायचे नाही. बाळबोध देवनागरी लिपीत जरी लिखाण असले तरी ते मोडी लिपीत आहे, म्हणून आपल्याला समजत नाही, अशी लोकांना खात्री असायची. मला तर काही वेळा, अक्षर कसे असावे, हे कोर्टाच्या कामाच्या घाईत विसरून गेल्याने, पंढरी हा आपल्या हातातील पेन जवळच्या लिहीत असलेल्या कागदावर नुसताच काहीतरी हलवत असावा. जो आकार येईल तो येईल. कदाचित कोर्टातील या कागदावरील मजकूर कोणी वाचत नसावेत किंवा दहा-पंधरा वर्षांनंतर वाचतील, त्यावेळेस पाहू, असा पण समज जरी बोलून दाखवला नाही, तरी असू शकतो. बहुसंख्य पक्षकार तर पंढरीच्या हातचे पत्र मिळाल्यानंतर तातडीने आपल्याला भेटायला येत. त्या पत्रातील मजकूर नेमका समजत नसे आणि पुन्हा वाचला तर वेगळाच शब्द असावा, असं वाटे. डोक्याची खराबी करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटलेलं सोपं, हा प्रत्येकाचा निष्कर्ष असे.
पंढरीच्या वयाच्या मानाने मी खूपच लहान, मात्र मी वयाने खूप लहान असूनही, पंढरी कधी वरच्या किंवा वेगळ्या सुरात माझ्याशी बोललेले मला आठवत नाही. अत्यंत नम्र स्वरांत बोलणं ! मी बऱ्याच वेळी आदरार्थी बोलायचो तर काही वेळी बोलण्याच्या ओघात विसरून जायचो. पण तरी पंढरी मला वडीलधारी म्हणूनच जाणवायचा !
कोर्टात लिखाणासाठी प्रत्येक वकिलाचे स्वतंत्र कारकून नसल्याने वादीकडून पण दावा, अर्ज वगैरे पंढरीच्या हातचे अक्षरांत ! तर प्रतिवादीकडून पण कैफियत, प्रतिवादीचे विविध अर्ज हे पण पंढरीच्या हस्ताक्षरात ! मग बघावे तर काय, कोर्टाचे त्या केसचे संपूर्ण रेकॉर्ड हे पंढरीमय ! त्यात जर पंढरीच्या हस्ताक्षरातील कार्बन कॉपी दाखल असेल, तर मग विचारायलाच नको ! नुसत्या निळ्या सावल्यांसारखी अक्षरे ! एकदा नुकतेच नविन आलेले न्यायाधीश तर हे अक्षर पाहून चक्रावून गेले. पंढरीचे अक्षर समजायला, तसे मन व नजर लागायची. आम्ही त्यांत सरावलेले होतो, पण ते न्यायाधीश नाही. त्यामुळे एकतर त्यांना काही नीट वाचता येईना आणि सर्वत्र एकच अक्षर ! दमछाक झाली असावी. वादीप्रतिवादींनी एकच वकील लावले की काय ? अर्थात त्यावेळी टायपिंग, झेरॉक्स वगैरे सर्रास उपलब्ध नसायचे.
पंढरी कोर्टातच काय तो वेळेवर जायचा, माझ्या आॅफिसला नेहमी उशीरा ! इतके न्यायाधीश बघीतलेला पंढरी, मला सोप्या पद्धतीने गप्प करायचा. ते त्याला अजिबात कठीण नसे. बरेच साहेब त्याने आजपर्यंत पचवले होते. आपण उशीर का झाला हे विचारले, तर ‘काही नाही. स्नानपूजा आटोपून निघालो. पारावर गणपतीचे दर्शन घेतले. आज सोमवार होता. म्हटलं महादेवाचं पण दर्शन घ्यावं. त्यामुळे येतायेता उशीर झाला, झालं. बरं काम काय आहे आज ?’ झालं त्याचं उशीरा येण्याचे स्पष्टीकरण !
‘दर्शनाला गेलो, हे काय कारण आहे ? मग लवकर जायचं !’ माझा तक्रारीचा सूर !
‘बरं, उद्या लवकर येईल.’ त्यांचा नरमाईचा सूर. मला माहीत असायचं ! उद्या पण काही लवकर येणार नाही. नेहमीच्याच वेळेवर येणार पंढरी ! दुसऱ्या दिवशी हाच प्रकार !
आपण विचारले तर, ‘आज पारावरच्या गणपतीला गेलो. नंतर लक्षात आलं की आज मंगळवार ! मग देवीच्या मंदीरात जावून दर्शन घेतलं ! आणि लगेच आलो.’
पंढरीचे सर्व वार ठरलेले असत. पारावरचा गणपती मात्र रोज ! सोमवारी महादेव, मंगळवार व शुक्रवार देवीचे मंदीर, बुधवार पांडुरंगाचे व गुरूवारी दत्तमंदीर ! हे रोज आपली दिनचर्या सुरू होण्यापूर्वी ! शनिवारी सकाळी हनुमानाचे दर्शन व संध्याकाळी शनिमंदीर ! कारण ते गांवापासून लांब आहे. या दर्शनांची संख्या काही वेळप्रसंग पाहून वाढायची पण !
मी काही वेळा बोलत असे, तर काही वेळा बोलत नसे. बोलून काही उपयोग नाही, हे जसे एक कारण होते. तसे धार्मिक, पापभीरू वृत्तीची माणसं, आपलं काम चांगलं करतात. निष्ठेने करतात. त्यांत माझा हा धार्मिक स्वभाव, पंढरीला देवदर्शनास प्रतिबंध करणारा मी कोण ? मग काय ? पंढरीला आपण सांगीतले की ‘पंढरी वारसांचा, दावा पुन्हा चौकशीला घेण्याचा वगैरे अर्ज लिहायचा आहे’, हे म्हटल्यावर पंढरी पक्षकाराकडून आवश्यक ती सर्व माहिती घेवून, त्याप्रमाणे अर्ज पक्का तयार करून, थेट आपली सही घेण्यासाठीच यायचा. शंका असेल तर लिहीण्यापूर्वीच विचारायचा. मग असा तयार असलेला, अर्ज वाचल्यावर त्यांत काही दुरूस्त करण्यासारखे जवळपास नसे. दरखास्तीचा अर्ज लिहायचा असेल, तर त्यानुसार विशिष्ट फॉर्ममधे दरखास्त लिहावी लागे. त्यावेळी आजच्यासारखे तयार व छापील फॉर्म नसत. मग त्याप्रमाणे चार्ट करून, सर्व माहिती व्यवस्थित भरून आपण फक्त सही करायची. आज पण पंढरीकडे दरखास्त लिहायला किंवा अडीअडचण असली तर नवीन मंडळी येत असतील.
पक्षकार तारखेवर कोर्टात येवो किंवा न येवो, पंढरी त्यांच्या कामावर लक्ष ठेवायचा. कोर्टात त्या पक्षकाराच्या कामांत अर्ज द्यायची गरज पडल्यास अर्ज द्यायचा. मग पुढील तारखेस पक्षकार आला व अर्ज द्यावा लागला की ‘मागचे तीन आणि आजचे तीन’ हे त्याचे वाक्य ठरलेले ! ते पक्षकारास पाठ झालेले असे. मागील तारखेस नाही म्हटल्यावर पक्षकाराच्या हातात पाच रूपयाची पंढरीसाठी नोट असायचीच. दोन्ही बाजूच्या लोकांना लिहून देणाऱ्या पंढरीमुळे कोणा पक्षकारांची भांडणे झाली नाहीत. याची लावावावी, त्याच्याकडे आणि त्याची चिंगी याच्याकडे असे पंढरीने कधीही केले नाही. असं केलं तर खूप काही मिळवतां आलं असतं.
पंढरीचा षष्ठ्यब्दीचा सत्कार होता बालवाडीत ! मी असणारच, हे स्वाभाविक ! पंढरीला मनगटी घड्याळ दिलं. एच् एम् टी कंपनीचे ! त्यावेळी एच् एम् टी कंपनीचे घड्याळ हे सर्वमान्य होते. पण यानंतर देखील पंढरीच्या येणेच्या वेळेत काही फरक पडला नाही. किती वाजता बोलावले होते आणि किती वाजता आलो, म्हणजे किती उशीरा आलो हे हातावरच्या घड्याळामुळे समजायचे एवढेच ! फक्त त्यामुळे येण्यासाठी नेमका उशीर किती झाला हे समजू लागले. एवढीच काय ती प्रगती.
आम्ही वकिलमंडळी बाररूममधे बसलो होतो. पंढरी बाररूम मधे बोलावल्याने आला. पंढरीच्या हातावर घड्याळ दिसल्यावर चावरे वकीलांनी सहज विचारले, ‘पंढरी, हातावर घड्याळ ?’
‘भोकरीकर साहेबांनी दिलं, कार्यक्रमाच्या निमित्ताने !’ पंढरीचे उत्तर !
‘चावरे साहेब, त्या एच् एम् टी घड्याळाचा पण काही उपयोग नाही. पंढरीला माझ्या आॅफिसला जेव्हा यायचे, तेव्हाच येतो. फक्त नेमका उशीर किती झाला आहे, हे मात्र आता सांगायला लागले आहे.’ मी बोललो.
‘पंढरी कोर्टात वेळेवर येतो. अगदी त्याचेजवळ घड्याळ नव्हते तेव्हापासून ! त्याचे वकील मात्र उशीरा येतात रोज !’ चावरे वकील !
पंढरी हसतहसत निघून गेला. बाकी वकील मंडळी पण हसायला लागली. हा भयंकर टोला मला होता. मी कोर्ट जरी अकराचे असले तरी बारा वाजेपर्यंत कोर्टात यायचो. पूर्वी माझे घरालगतच आॅफीस होते, त्यामुळे उशीर होत नसे. नंतर मी नवीन घर बांधले, ते दूर होते, साधारण दोन-अडीच किलोमीटर ! मग घरी पोहोचायला उशीर होई. माझ्याजवळ कोणतेही वाहन नव्हते. रोज सकाळी आॅफिसला पायी यायचे आणि मग घरी पायी जायचे. त्यानंतर जेवण करून कोर्टात, उशीर होणारच ! पण यावरून कोर्टात कधी वादावादी, अजिबात नाही.
आता पंढरी थकला आहे. वयोमानाने काम होत नाही. मी रावेर सोडून तेराचौदा वर्षांपूर्वीच, इथं औरंगाबादला हायकोर्टात वकिलीसाठी आलो. रावेरला जाणं कमी झालं. कधीतरी गेलो आणि जमलं तर पंढरीच्या घरी जावून यावं, पण आता ते पण नाही. रावेरला जाणेच जवळपास नसल्याने कमी झालंय ! पंढरी पण रावेर कोर्टात कधीचाच येत नाही, त्याच्या मुलाला तो वारसा दिलाय.
आज पण इथल्या माझ्या किंवा कोणत्याही वकीलाच्या कारकुनाला सांगीतल्यावर पण त्याला जर काही आलं नाही, तर पंढरीची आठवण येते. कोणी कारकून पक्षकाराशी, वकिलांशी नीट बोलत नाही, पायरी सोडून बोलतांना दिसले की पंढरीची आठवण येते. केव्हातरी पंढरीच्या मुलाला, प्रशांत श्रावकला फोन करावा आणि पंढरीशी बोलावे की ‘पंढरी इकडे औरंगाबादला येवून जा. बरंच काम पेंडींग पडलंय!’

२३. ९. २०१८

No comments:

Post a Comment