Thursday, December 20, 2018

काल 'ब्राह्मणांना आरक्षण हवे' या स्वरूपाची पोस्ट वाचण्यात आली.
स्वातंत्र्यापासून विविध जाती-जमातींना देण्यांत आलेल्या आरक्षणामुळे समाजाच्या इतर घटकांवर आणि त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झालेला आहे, याचा अशी मागणी करणाऱ्यांनी, आपला स्वार्थ बाजूला ठेवून आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून, विचार करावा. समाजात द्वेष निर्माण करणारे, समाजाचे विविध घटकांत तुकडे करणारे, परिणामी समाजाची पीछेहाट करणारे हे आरक्षण ब्राह्मणांनी कधीही मागू नये. ब्राह्मण समाज जर स्वतःला समाजाचा दिशा आणि विचार निर्देशक समजत असेल, तर त्याची ही मागणी त्याच्या त्याच्या कर्तव्यापासून, ध्येयापासून आणि उद्दिष्टाच्या त्या रस्त्यापासून पथभ्रष्ट करीत आहे हे दाखवत आहे.त्यामुळे या मृगजळाच्या मागे लागून ब्राह्मणांनी आपले, समाजाचे नुकसान न करता समाजाचे दायित्व समजून आजपावेतो जशी कळ काढली आणि त्रास सहन केला तसा अजून सहन करावा.
परमेश्वर आहे किंवा नाही याबद्दल काही शंका घेतात, पण प्रत्येक माणसाच्या मनातील परमेश्वर हा निश्चितच हे सर्व योग्यायोग्य जाणत असतो, दाखवत नसला आणि उघडपणे कबूल करत नसला तरी ! आपण एखाद्यावर अन्याय केला, आपण आपल्या स्वार्थासाठी कायम असत्याची कास धरली, आपण आपलं कार्यभाग साधून घेण्यासाठी लबाडी केली, खोटेपणा केला हे कबूल करायला फार मोठे धैर्य लागते, हिंमत लागते आणि मन पारदर्शी लागते. ही अशी उपरती, पश्चाताप हा कदाचित माणसाला त्याच्या अंतीम काळांत, यमराजाच्या दरवाजाचे दर्शन झाल्यावर होत असावा.
विषयच निघाला आज तर शासनाने एक करावे - ज्या कोणा होतकरू विद्यार्थ्याला, मग तो कोणत्याही समाजातील असो, शिक्षण घ्यायचे असेल आणि त्याचे शिक्षण केवळ पैशाअभावी होणार नसेल, तर शासनाने त्याचे पालक व्हावे आणि त्याची इच्छा असेल तोवर त्याच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलावी. पैशावाचून तो शिक्षणाला मुकला असे कदापिही व्हायला नको. समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाचे दर्शन द्यायचे असेल, तर होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करावयास हवी. विद्यार्थी होतकरू असावा, ढोंगी नसावा. ढोंगी, लबाड, खोटे आणि दुष्ट मंडळींना शिक्षा करायची असते, मदत नाही; हे शासनाने आणि सर्व समाजाने कायम लक्षांत ठेवायचे असते.

७. ८. २०१८

No comments:

Post a Comment