Thursday, December 20, 2018

साधारणत: १९७८-७९ साल असावे ! जळगांवला ‘कृषक भवन’ला निसर्गकवी श्री. ना. धों. महानोर यांची सायंकाळी ‘काव्यसंध्या’ हा कार्यक्रम सुरू होता. शहरातील रसिक श्रोते, तसेच श्रोते आणि स्त्रीपुरूष त्या कार्यक्रमात उपस्थित होते. आमच्यासारखी महाविद्यालयात शिकणारी रिकामी मुले पण उत्साहाने आणि कुतूहलाने तिथं उपस्थित होती.
श्री. ना. धों. महानोर यांचा आणि जळगांवचा तसा जुना ऋणानुबंध ! ते जळगांवी शिकले. त्यानंतर पण आमच्या ‘नूतन मराठा कॉलेजला’ ते बऱ्याच वेळा प्रसंगानुरूप आले. मात्र त्यावेळी जास्त उत्सुकता होती ती यासाठी की सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. दिग्दर्शक होते श्री. जब्बार पटेल ! आणि इतर कलाकारांसोबत खान्देशकन्या कै. स्मिता पाटील या त्यांत होत्या. बहुसंख्य मंडळी ही नाट्यक्ष्त्रातील ! आणि गीतकार होते, श्री. ना. धों. महानोर ! याचा त्यावेळी बऱ्यापैकी गाजावाजा झालेला होता. त्यामुळे श्री. ना. धों. महानोर यांच्या या कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी होती.
या वेळी आपणांस, हा चित्रपट कसा घडला वगैरे ऐकायला मिळेल, ही खात्री होती. या अशा आणि संगीताच्या कार्यक्रमाला, मला जरी अगदी पुढे जायला मिळाले, तर मी अगदी पहिल्या रांगेत देखील जावून बसतो. त्यांत मला या कार्यक्रमांतील फार समजते किंवा समजणार असते, यापेक्षा कार्यक्रम नीट पहाता व ऐकता येतो, हा मुख्य भाग असतो. या कार्यक्रमांत पण जवळपास दुसऱ्या वा तिसऱ्या रांगेत होतो. माझ्या जवळच कै. भैया उपासनी होते, मनापासून दाद देत ! त्यावेळी त्यांचा माझा परिचय असा नव्हता.
त्यांची काव्याची गाडी ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील अनुभवांवर आलीच ! मग त्यांत त्यांनी उपयोगात आणलेले विविध गीतप्रकार म्हणून दाखवले किंबहुना गाऊन दाखवले, अगदी खड्या आवाजात !
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या गीताची कल्पना, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं येतंय या आभाल’ म्हणजे काय ? ‘वही’ हा गीतप्रकार यांत कसा व का वापरला ?
खूप छान व संस्मरणीय संध्याकाळ ठरली ती ! त्यांची गीते सुंदरच ! आपल्या भागातील माणूस मोठा झाला आणि मुख्य म्हणजे तो आपण बघीतला, तो आपल्याला ऐकायला मिळाला, हे समाधान खूप मोठे असते. ते समाधान मला त्या वेळी मिळाले आणि ‘जैत रे जैत’ यांवर बक्षीसांची व पुरस्कारांचा वर्षाव व्हावा असे, अगदी मनापासून वाटले. यांत खरोखर मोठीच माणसे होती, त्या क्षेत्रातील ! गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काही नव्याने सांगावे असे काही नव्हते. नवीन मंडळी होती, ती म्हणजे गीतकार श्री. ना. धों. महानोर आणि अभिनेत्री स्मिता पाटील ! त्यांना भरपूर लाभ होईल, असे वाटायचे !
त्याच वेळी ‘देवकीनंदन गोपाला’ या नांवाचा चित्रपट मराठी चित्रसृष्टीतील दादा समजले जाणारे, ‘राजदत्त’ हे दिग्दर्शीत करीत होते. कथा होती ‘संत गाडगेबाबा’ या महात्म्यावर ! त्यांची भूमिका करणार होते, साक्षात ‘नटसम्राट’ या भूमिकेचे शिवधनुष्य ज्यांनी सर्वप्रथम उचलले, ते डॉ. श्रीराम लागू ! ‘पिजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेने, ते चित्रपटसृष्टीतील अभिनयांत पण ‘मास्तर’ आहेत, हे त्यांनी दाखवून दिले होते.
चित्रपटांला संगीत होते कै. राम कदम यांचे ! ‘पिंजरा’ या चित्रपटांनेच नाही, तर त्या पूर्वी पण त्यांच्या संगीतातील सामर्थ्याची सर्वांनी अनुभूती घेतली होती. आणि गीतकार होत, आधुनिक वाल्मिकी मानले गेलेले, कै. गजानन दिगंबर माडगूळकर यांचे ! त्यांतील एक गीत तर गाणार होते, साक्षात पं. भीमसेन जोशी हे ! योग जुळून यावा तो तरी किती ? कपीलाषष्ठी बहुतेक याच वर्षी असावी.
या दोन्ही चित्रपटांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. मात्र दुर्दैवाचा घाला आला तो आधुनिक वाल्मिकी, ग. दि. माडगूळकर यांच्यावर ! भगवान रामचंद्राने त्यांना दि. १४ डिंसेबर. १९७७ रोजी आपलीच रामकथा ऐकायला स्वर्गात आपल्याकडे बोलावून घेतले.
‘जैत रे जैत’ हा चित्रपट मला बघता आला नाही. त्याची गाणी तुफान गाजत होती, म्हटलं गीतकार म्हणून श्री. ना. धों. महानोर सर्वमान्य व राजमान्य होणार !
मी ‘देवकीनंदन गोपाला’ हा चित्रपट बघीतला. चित्रा टॉकीजला ही तुफान गर्दी ! त्यांत ही गदीमांची दुर्दैवी बातमी ऐकल्यावर मात्र ह्रदय हळवे झाले. पुन्हा ही अशी गीते आता लिहीणार कोण ? तो शब्दप्रभू तर आपल्यातून निघून गेला ! आपण काय देवू शकतो, त्या शब्दप्रभूला ? शेवटचा निरोप आणि खरोखर शेवटचाच पुरस्कार ‘ ! मला आठवते त्या वर्षी सर्वोत्तम गीतकार पुरस्कार मिळाला होता, कै. गजानन दिगंबर माडगूळकर यांना !
आज ‘विठ्ठलाचे पायी थरारली वीट’ हा त्या आधुनिक वाल्मिकीचा अभंग ऐकत होतो, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजात ! त्याला अभंगाएवढेच वजन प्राप्त झाले आहे. बैठकीतील शेवटी गाण्याच्या संकेत असलेल्या ‘भैरवी’ या रागातील ! संत गाडगेबाबांची महायात्रा निघालेली आहे, आणि मागून पंडीतजींचे भैरवीचे सूर ऐकू येताहेत. गीत लिहीणारा पण आपल्यात नाही, ही जाणीव चित्रपटगृहातून बाहेर पडतांना दु:खी करून टाकत होती. आज ऐकत होतो, ऐकतांना सरसर मन मागे गेलं !
विठ्ठलाचे पायी थरारली वीट
राऊळींची घाट निदादली
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यांत
तुका समाधीत चाळवला
अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव
निघाला वैष्णव वैकुंठासी
संत माळेतील मळी शेवटला
आज ओघळला एकाएकी

८. ७. २०१८

No comments:

Post a Comment