Thursday, December 20, 2018

लहानपणी आपली सही करायची भयंकर हौस ! सगळी मोठी मंडळी आपल्या समक्ष कुठेकुठे सह्या करतात, आणि आपण फक्त पहातो. हेवा वाटतो. काही वेळा कारण नसतांना, त्यांची सही लफ्फेदार वाटते, अक्षर वळणदार नसलं तरी ! आपल्याला अशी सही करण्याची संधी येत नव्हती ना म्हणून !
बहुतेक मंडळी सही करायची ती इंग्रजीतच, सर्व मराठी मंडळी इंग्रजीतच सही करतात, हे बघीतल्यावर तर सही करायची तर फक्त इंग्रजीतच करायची असते, हा माझा समज झाला. बरीच वर्षे कायम होता. इंग्रजीतली सही असली, की कसं भारदस्त, शिकलेल्या माणसांसारखे वाटते. नाहीतर उगीच - निशाणी डावा अंगठा उमटवून दस्तूर लावल्यासारखं वाटायचे.
माझी पण सही सुरूवातीला इंग्रजीतच होती. काय करणार ? महाजनो येन गत: स पंथ: । नंतर मराठीत म्हणजे देवनागरीत सुरू केली.
एकदा, कोर्टात बाररूममधे गप्पा सुरू होत्या, न्यायालयाचे कामकाज मराठीत चालावयास हवे, याबद्दल ! बोलताबोलता विषय निघाला, अन् मी म्हणालो, ‘आपल्या सह्या आधी मराठीत करू या, मग पुढच्या गोष्टी !’
‘ज्यांचे अक्षर चांगले, त्यांच्या सह्या चांगल्या दिसतील.’ आमच्यापैकी एकाची शंका !
‘अक्षर कसेही असले तरी काय झाले ? ती आपली सही आहे. मी तर मराठीतच सही करतो.’ मी म्हणालो.
त्याचवेळी कै. ॲड. आर. जी. चौधरी यांचा कारकून श्री. अरूण कुलकर्णी हा त्यांच्या सहीसाठी अर्ज घेवून आला होता, आणि त्यांनी त्यांवर मराठीत सही केली. बोलण्याबोलण्यात मराठीतून, म्हणजे देवनागरीत सही करणारे आम्ही दोघे वकील झालो.
आता तर सुरुवातीची इंग्रजीतील सही आठवत नाही, पण काही ठिकाणी करावी लागते. बदलावी वाटत नाही. असो, एखादी जुनी आठवण !

२२. ८. २०१८

No comments:

Post a Comment