Thursday, December 20, 2018

——- केल्याने होत आहे रे !

——- केल्याने होत आहे रे !
‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ ही म्हण ! आपल्याला हे, जे कधीही कोर्टाची पायरी चढले नाही, ते तर सांगतातच; पण ज्यांना काही कारणांमुळे किंवा दुसऱ्याने कोर्टात ओढल्याने, जबरदस्तीने चढावी लागली, ते पण असं सांगतात; अशी बरीच मंडळी आहे. काही मंडळी मात्र कोर्ट आहे, म्हणून काहीतरी ठीक चालले आहे तुमचं आमचं ! नाहीतर काही खरं नव्हतं, कोणी काहीही केलं आणि कसं पण वागलं, तरी कोर्टाचे दरवाजे बंद ! ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी अवस्था झाली असती मग ! अहो, न्यायालयांत दाद मागण्याचा अधिकारच काढून घेणाऱ्या, आपल्या राज्यघटनेतील प्रसिद्ध घटनादुरूस्तीचा आपल्याला न विसरतां येणारा अनुभव आहेच. तसं पाह्यलं तर, आमच्यासारख्यांना रोजच कोर्टाची पायरी चढावी लागते, पोटासाठी ! आता त्यामुळे आम्ही शहाणे आहोत का नाही कोण जाणे ? कदाचित त्या म्हणीला, ‘वकील व न्यायाधीश आणि कर्मचारी’ यांचा अपवाद असेल, पण हे जाहीरपणे सांगत नसतील कोणी ! महत्वाचे दडवून ठेवणे, हे आपल्याला पण काही नवीन नाही.
आपल्यासमोर काही तरी एखादी घटना घडते, किंवा आपल्याला प्रसंगी अनुभव पण येतो, आणि मग आठवणींच्या कप्प्यातील एखादी जुनी आठवण बाहेर येते. ही बहुतेक सन १९९३-९४ मधील घटना असावी.
एकदा माझे एक वकील मित्र माझ्याकडे आले. येतांना सोबत त्यांनी एका वकीलपत्रवर, पक्षकाराची असते तिथं, सही आणली होती, आणि मला सांगीतले, ‘हे पहा, या वकिलपत्रावर माझ्या सासऱ्यांची सही आहे. हे माझ्या घरचे काम आहे. मी चालवत नाही, तुम्हाला चालवायचे आहे. माझ्या सासऱ्यांवर फौजदारी केली आहे. घरचा मामला आहे, काळजीपूर्वक बघा.’ बहुतेक त्यांत जामीन अगोदरच दिलेले होते. त्यामुळे केस चौकशीला येणार होती. मी वकीलपत्र घेतले. माझे कारकून श्री. पंढरीनाथ श्रावक यांना बोलवले. वकीलपत्रावर माझी सही केली. ज्या केसमधे दाखल करायचे ते कागद दिले, फाईल तयार करायला सांगीतली आणि वकीलपत्र त्या केसमधे दाखल करायला सांगीतले. त्यांना एकदा सासऱ्यांसोबत माझ्या आॅफिसमधे येण्यास सांगीतले. वकिलाचे स्वत:चे काम दुसऱ्या वकिलाने घेवून चालवणे यासारखे दुसरे कठीण काम नाही. तारेवरची कसरत असते.
काही दिवसांनंतर ती केस सुरू झाली. दरम्यानच्या काळात ते एकदा येवून गेले. मला जी काय जुजबी माहिती घ्यायची होती ती घेतली. केस खूप कठीण होती असे नाही. पण घरातील संबंधीत केस असली, तर भिती असते, काळजी असते. आम्हा वकिलांना याची रोजची सवय असल्याने विशेष वाटत नाही. सगळ्यांची संकटे, दु:ख, काळज्या आमच्या डोक्यावर घ्यायच्या आणि पक्षकारांना निर्धास्त ठेवायचे, शेवटी समाधान व न्याय मिळवून द्यायचा, हे आमचे काम !
ती केस यांच्यावर एका महिलेने केली होती. महीलेनी केस माणसावर केली, म्हणजे त्याच्याकडे समाज कसा बघतो, समाजातील वातावरण कसे होते, याचा विचारच करावा. त्याच्याबद्दल त्रयस्थ म्हणून देखील आपल्या मनांत काय विचार येतो, हे आपण समजू शकतो. तिची या केसमधील तक्रार म्हणजे - यांनी घरी येऊन तिला अद्वातद्वा शिवीगाळ केली, तिला मारायला अंगावर धावून आले, तिला भिती वाटेल असे वर्तन केले वगैरे वगैरे असे आरोप केलेले ! त्यांत काही साक्षीदार पण दिलेले होते आणि सरतेशेवटी कडक शासन होवून न्याय मिळावा ही मागणी केली होती. केस पूर्णपणे खोटी असल्याचे आमचे मित्र सांगत होते. केस खाजगी असल्याने सुरूवातीच्या जबाबावर, आणि सकृतदर्शनी न्यायालयाला तथ्य वाटल्याने तक्रारीची दखल घेतली होती. यांना नोटीस काढली होती.
ज्यांच्यावर दिवाणी किंवा फौजदारी केस झालेली असते, तो प्रत्येकच आपण अत्यंत निरपराध असून, आपल्यावर विनाकारण केस केली आहे, केलेली केस खोटी आहे, निष्कारण गोवले आहे असेच सांगतो. त्यामुळे त्या सांगण्यावरून वकील मंडळी आपले पक्षकाराबद्दल किंवा केसबद्दल मत बनवत नाही. उलट हे जर वेगवेगळ्या पद्धतीने, कांगावा करून, पक्षकाराने वकीलांना सांगितले, तर नक्की काहीतरी घटना घडलेली असून पक्षकार आपल्यापासून लपवत आहे, ही वकीलाची खात्री होते. ‘आपण निरपराध असल्याचा आव आणला, की बरं असतं’ हा पक्षकारांचा समज दूर करण्याचा बरीच वकील मंडळी प्रयत्न पण करत नाही. त्याला काही महत्व पण नसते. याउलट वस्तुस्थिती पटकन सांगीतली, तर वकीलाला खरी घटना समजते, विखुरलेले दुवे जोडता येतात. आपल्या पक्षकाराच्या चुकीवर मार्ग शोधण्यावर विचार करता येतो. तो त्याच्या हिताचाच असतो. असो.
या केसची अशीच एकदा तारीख होती, त्या दिवशी पुढील साक्ष झाली. मी साक्षीदाराची अर्धवट उलटतपासणी घेवून पुढे मुदत घेतली. आता घडलेल्या घटनांची पुन्हा उजळणी होणे आवश्यक होते. काम आटोपले. या केसचे पक्षकार आले होते. ते आणि मित्रमंडळी दुपारनंतर चहा पिण्यासाठी हॉटेलमधे त्या वकील मित्रांसोबत गेलो. लालचंद आणि मदन यांची जोडगोळी होतीच. चहा वगैरे झाल्यावर, गप्पा मारत बसलो होतो. तो लालचंद महाजन यांनी सांगीतले, ‘ते दसनूरवाले तुम्हाला भेटले का ?’ मी त्यांच्यावतीने ते वकीलसाहेबच भेटल्याचे सांगीतले व तेथून बाहेर आलो. तो त्यांची पण भेट झाली. त्यांना वकील मित्रांसोबत पुन्हा आॅफिसला येण्याचा निरोप दिला.
ठरल्याप्रमाणे ते आले. पक्षकार चांगले सधन होते, तसेच समजुतदार पण होते. त्यांचे सासरे म्हणजे वयाने सत्तरीपुढचे, हाडाचे शेतकरी, तब्येतीने मजबूत ! त्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ आणि गोल चेहऱ्यावरील, भव्य कपाळावर असलेला बुक्कागोपीचंदनाचा टिळा, हा ते वारकरी पंथातले असल्याचे दाखवत होते. पांढरा स्वच्छ सदरा आणि धोतर नेसलेले ते गृहस्थ, आॅफिसच्या पायऱ्या चढतांना त्यांच्या मुलाची मदत घेत होते. पायऱ्या चढून आल्यावर ते हुश्श करत खुर्चीत बसले.
‘साहेब, आमच्यावर विनाकारण केस केली आहे.’ ते आल्यावर जरासे बसले, जरा दम घेवून त्यांचे सांगणे.
‘हे असं, प्रत्येक जण आम्हाला सांगतो. सर्व तोंडी असते. त्यामुळे त्या बाई जे शपथेवर सांगताय, ते खोटं का मानावं ?’ माझा प्रश्न !
‘तुम्ही माझी तब्येत पहाताय. मी काय पळतपळत तिच्यावर धावून जाणार आहे ? ही माळ गळ्यांत घालून फिरता फिरता म्हातारा झालोय !’ गळ्यातील तुळशीची माळ आपल्या दोन बोटांत पकडून ते मला म्हणाले.
‘अहो, ते ठीक आहे. पण तुमचा व तिचा संबंध नसतांना, ती तुमच्याबद्दल खोटं कशासाठी सांगेल ? तुमचा व तिच्या तक्रारीचा काही तरी संबंध असेलच. ते जर तुम्ही सांगीतलं, तर मला काही समजेल व मार्ग काढता येईल. आणि स्वच्छ सांगतो, तुम्ही माझ्यापासून लपवताय, त्यांत तुमचा फायदा नाही, तर नुकसान आहे. तुमचा आणि त्या बाईचा काही शेताचा व्यवहार होता का ?' माझा प्रश्न !
‘शेताचा व्यवहार’ हे विचारल्यावर ते चपापले. कारण मी असं काही विचारेल, याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना नंतर मात्र हसू आलं.
'जावाईबुवांनी, बरोबर आणलंय तुमच्याकडे ! तुम्हाला कसं काय समजलं, की ही मूळ शेताचीच भानगड आहे म्हणून ! हा, तुमच्यासारख्यांना भविष्य पण येतं म्हणा ! आता तुमच्यापासून काय लपवता ?' असे म्हणत त्यांनी आकाशाकडे पहात हात जोडले आणि सांगू लागले.
'सन १९५५-५६ ला हिच्या नवऱ्याने मला शेत विकलं. आता त्या वेळची जी काही किंमत होती, ती मी दिली. तरी तिच्या मनांत अलिकडे कोणी भरवून दिलं, की मी किंमत कमीच दिली. काही जण तिला सांगतात, सरकार आता आदीवासींना जशा त्यांच्या गेलेल्या जमिनी, परत त्यांच्या ताब्यात देताहेत, तसंच तुमच्या पण गेलेल्या जमिनी ताब्यात देतील. जरा जोर लावा. जमिनी मिळून जातील. मग हे असं सुरू झालं. तीच बाई शिवीगाळ करते. बाईच्या नादाला कुठं लागा, म्हणून गप्प बसावे लागते. समाजात विनाकारण चर्चा !’ ते सांगत होते.
'मग ही शेताचे सोडून, वेगळीच घटना कशी काय लिहीली केसमधे ? या घटनेला साक्षीदार पण आहेत.' मी स्पष्टीकरण विचारले.
'कशाचं काय, अन् फाटकात पाय ! ही तारीख सांगताय ना केसमधे, त्यावेळी माझी पोरगी जळगांवला दवाखान्यात ॲडमीट होती, तिला बघायला मी जळगांला गेलो होतो. आता जळगांवला अनायसे गेलो होतोच, तर माझी पण तब्येत तिथं डॉक्टरांना दाखवून दिली. काही तपासण्या केल्या. त्यांनी औषधं लिहून दिली. ती दवाखान्यातून घेतली, पुरा दिवस गेला आणि रात्री परत आलो. जळगांव आमच्या गांवाहून ७०-७५ किलोमीटर ! पुरा दिवस जातो, सकाळी गेलं की काम आटोपून रात्री घरी येतो माणूस ! ते पण स्वत:चे वाहन असले, तर काही कामं होतात. नाहीतर नुसता हेलपाटा ! अहो, काही खरं नाही केसमधे, तिला अशा खोट्यानाट्या केसेस करायची सवयच आहे. याच कोर्टात पूर्वी पण केसेस केल्या होत्या.’ ते बोलले. मी विचारात पडलो. हे मात्र त्यांचे सांगणे खरे वाटत होते.
'बरं, तुमच्या त्या दवाखान्याची व मुलीच्या दवाखान्याची कागदपत्रे आज आहे का तुमच्याजवळ ? मला बघता येतील ?' मी विचारले. माझ्या मनांत केस कशी चालवावी लागेल, हे आकार घेत होते.
'आहेत, पण आज आणली नाहीत. उद्या परवा घेवून येतो'. त्यांचे उत्तर !
'तुम्ही म्हणाले की तिला अशा केसेस करायची सवयच आहे, तर कोणाकोणावर केसेस केलेल्या आहेत अशा ?' मी विचारले. त्यांनी दोन चार जणांची नांवे सांगीतली. मी त्यातील कोणाला ओळखण्याचा प्रश्नच येत नव्हता.
'ज्यांच्यावर केसेस झाल्या होत्या, त्या कधी झाल्या होत्या ? ते तुमच्या बाजूने सांगतील ?' मी विचारले.
'तसं, सांगतील म्हणा. गांवशिवचा मामला आहे आणि न सांगून जातील कुठं ? ते पण फसले होते, अशेच अटकले होते. काहीतरी देवूनघेवून केस आपसात केली त्यांनी.' त्यांचे उत्तर !
‘हे पहा, माझ्या म्हणण्याप्रमाणे करायचं असेल तर खर्च जास्त येईल. तुमचे काम होणे महत्वाचे समजतो मी ! चालेल का ? माझा प्रश्न !
‘वकिलसाहेब, पैसे कितीही लागू द्या. करू खर्च ! तुम्ही विनाकारण काही सांगत नाही, आम्हाला माहिती आहे. आता सरकलोय ना पुढे, मग मागे हटायचे नाही. होऊन जावू द्या ! पैसे काय आज आहे, अन् उद्या नाही. पण ही खुटी एकदाची मोडाच ! पुरं गांव किर्रर्रर्र झालंय, या पायी ! ******%%++^ बाईची केस म्हणून आपण बोलू शकत नाही, अन् पुरं गांव आपले हिज्जे पाडते चारचौघात !’ ते संतापून कळवळले !
त्यांची अवस्था माझ्या लक्षात आली.पुढच्या वेळी त्या लोकांना घेवून या आणि सांगीतलेली कागदपत्रे सोबत आणा म्हणून त्यांना निघतांना सांगीतले.
दोनतीन दिवसांनी त्यांचा मुलगा पिशवीत काही कागदपत्र घेवून, कोणा एका माणसासोबत आला. ते कागदपत्र बघीतले, त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. सोबत कोण आलंय हे विचारल्यावर ‘यांच्यावर पण केस केली होती, म्हणून तुमच्या सांगण्याप्रमाणे आणलंय ! त्यांच्याशी चर्चा केल्यावर हे समजलं, की यापूर्वी पण अशा याच स्वरूपाच्या काही केसेस तिने व तिच्या मुलाने केल्या होत्या. नंतर त्या आपसात झाल्या. त्याची कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. केसेस अजून कोणावर झाल्या यांची नांवे माहिती होती. मग पंढरीला बोलावले. त्यांची व पंढरीची गाठ घालून दिली, आणि सांगीतले, ‘हे सांगताय त्या सर्व केसेसच्या सहीशिक्क्याच्या नकला काढायच्या आहेत. त्यासाठी लागणारी माहिती कोर्टातील जुन्या दप्तरातून काढून घे.’ हे सर्व जण बराच वेळ बसले. मग सर्व केसेसचे नंबर, निकाल तारीख वगैरे काढली. मला येवून सगळे सांगीतले.
‘या सर्व नकला आपल्याला जळगांव कोर्टातून काढाव्या लागतील. सर्व जुने रेकॉर्ड जळगांवला असते.’ मी सांगीतले. जळगांवी जावून कोणाला भेटायचे, त्यांना काय सांगायचे हे सांगितले आणि ‘या नकला काढायच्या आहेत, हे त्यांना सांग.’ असे सांगून माहितीचा कागद त्यांच्याजवळ दिला. ते निघून गेले आणि पुढील आठवड्यात त्या सर्व नकला घेवून आलेत. नकला बघीतल्या. पक्षकाराचे म्हणणे खरे होते. अपेक्षेप्रमाणे पावलं उचलायचे ठरविले. त्या सर्वांना एकदा पुढे केस कशी चालवायची यासाठी आॅफिसमधे बोलावले.
केस चालली. फिर्यादीचे व तिच्या साक्षीदारांचे सर्व जाबजबाब आटोपले होते. त्यांच्या उलटतपासणीत मी हवे. ते विचारून घेतले होते. नंतर पुढील काम सुरू होणार होते. कोर्टाने आम्हाला पुरावा द्यायचा का म्हणून विचारले. मी अर्ज देवून या फिर्यादी व तिच्या मुलाच्या पूर्वी त्यांनी केलेल्या विविध केसेसच्या निकालाच्या सहीशिक्क्याच्या नकला दाखल केल्या. त्यांवर कोर्टाने विरूद्ध बाजूचे म्हणणे विचारात घेतले. पुराव्यासाठी नकला नाकारणे शक्यच नव्हते. त्यांचा विचार निकाल देतांना होणार होताच. मग डोकं जरा शांत झालं.
आरोपी हा निर्दोष असून त्याच्यावरील आरोप हे फिर्यादी पक्षाने सिद्ध करायचे असतात. बहुसंख्य वेळा फिर्यादीच्या चुकीमुळे, कायद्याचे आरोपींच्या हक्कांचा विचार करता असणारे संरक्षण वगैरे असलेल्या बाबी लक्षात घेता, संशयाचा फायदा देवून आरोपीला सोडले जाते. आरोपीवरचे आरोप हे फिर्यादीने निरपवादपणे सिद्ध करायचे असतात. घडलेल्या घटनेतील आरोपीच्या सहभागाबद्दल कोर्टाला थोडी जरी शंका निर्माण झाली, तरी त्याचा फायदा आरोपीला मिळून, त्याचा परिणाम त्याच्या मुक्ततेत होतो. आरोप सिद्ध होणे हे कर्मकठीण त्यामुळे स्वाभाविकच सिद्ध न झालेल्या आरोपाखाली त्या आरोपीला शिक्षा कशी देणार ? अशा परिस्थितीत फिर्यादीची फिर्याद खोटी आहे, असा पुरावा आरोपीने देणे हे विकतचे दुखणे घेण्यासारखे आहे. पण मी तो प्रयोग केला, पुरावा देवून केला. बऱ्याच जणांनी माझा पुरावा संपल्यावर मला मूर्खात काढले व पक्षकाराला घाबरवून टाकले. हा पण नेहमीचा अनुभव !
युक्तीवाद झाला. युक्तीवादात फिर्यादीने मनापासून आरोपीने कोणकोणते गुन्हे केले असून, त्याला शिक्षा होणे कसे न्यायव्यवस्थेचा दरारा रहाण्यासाठी कसे आवश्यक आहे, हे सांगीतले. मी युक्तीवादात - ‘आरोपीने कसलाही गुन्हा केलेला नसल्याने, त्याला न्यायालय निर्दोष मुक्त करणार, याबद्दल माझ्या मनांत शंका नाही’ हे सांगीतले. मात्र त्या बरोबरच न्यायालयाने आरोपी हा त्याच्या म्हातारपणात, या शारिरीक अवस्थेत विनाकारण कोर्टात किती वर्षे खेट्या घालतो आहे, हे पहावे. त्याचे वाया गेलेले कामाचे तास, त्याला होत असलेला अखंडीत मनस्ताप, समाजात होत असलेली मानहानी हे पहावे. फिर्यादीची कोर्टात खोट्या तक्रारी करून. नंतर आपसात करून आरोपीकडून पैसे उकळण्याची वृत्ती पहावी. लोकांना न्यायालयाचा धसका बसायला नको. कायदा मोडणाऱ्यांना न्यायालयाची भिती, तर ज्यांच्यावर अन्याय होतो आहे, झाला आहे, त्यांना न्यायालयाचा आधार वाटायला हवा. यासाठी आरोपीला निर्दोष मुक्त करून फिर्यादीला तिच्या खोट्या तक्रारीबद्दल दंड करण्यात यावा.
युक्तीवाद संपला. निकालासाठी न्यायाधीशांनी पुढची तारीख दिली. आम्ही कोर्टाच्या बाहेर आलो. नेहमीप्रमाणे लालचंदच्या हॉटेलमधे सर्व जण चहाला ! सोबतचे वकील मित्र ‘भोकरीकर वकील, आरोपीला निर्दोष सोडा हे ठीक आहे. पण फिर्यादीला दंड ? हे फारच झालं ! आरोपी सुटला, तरी पुष्कळ ! भले मग पंच, साक्षीदार, पुरावे फोडायची वेळ आली तरी बेहत्तर ! इथं आरोपी पुरावा देतोय, फिर्यादीला शिक्षा व्हावी म्हणून ? कठीण आहे.’ यांवर मी काय बोलणार ? ‘निकालापर्यंत थांबा’ एवढेच म्हणालो.
‘वकीलसाहेब, आता काहीही होवो. तुम्ही खरं तेच सांगीतलंय !’ पक्षकाराचे समाधानी उद्गार !
निकालाची तारीख होती. पक्षकाराला मी एक गरज पडली तर जामीनदार व त्याच्या मिळकतीचा उतारा आणि रोख पैसे जवळ ठेवण्यास सांगीतले. दुर्दैवाने शिक्षा झाली तर, तयारी असावी म्हणून ! आमचा पुकारा झाला आम्ही आंत कोर्टात गेलो. न्यायाधीशांनी निकाल सांगीतला - आरोपीला निर्दोष सोडून देण्यात आले आहे. फिर्यादीला खोटी तक्रार केली म्हणून रू. १,०००/- चा दंड करण्यात आला आहे.
निकाल ऐकून आम्ही बाहेर आलो. माझे पक्षकार तर डोळ्यात पाणी आणून माझी वाट पहात होते.
केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ।
यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे ।।

३०. ९. २०१८

No comments:

Post a Comment