Thursday, December 20, 2018

परवा रविवारी जळगांवला गेलो होतो व त्या दिवशी मुद्दाम थांबलो होतो. जळगांवी जाणे होते, पण थांबणे काही होत नाही. माझी अवस्था म्हणजे महामंडळाच्या बसप्रमाणे ! अगदी बस स्टॅंडवर बस जाते, तिथं काही वेळ थांबून पुन्हा परतीचा प्रवास करते, त्याप्रमाणे गेली कित्येक महिने सुरू होते. अर्थात फोनवर सर्वांशी कामानिमीत्त बोलणे होत असतेच, त्यामुळे काम अडत नाही. अडचण असते, ती ज्यांच्याशी व्यावसायिक काम काही पडत नाही, त्यांच्याशी बोलणं राहूनच जाते.
सोमवारी व्यवसायाच्या कामांसोबत ठरवले, मित्रांच्या भेटी घ्यायच्या ! दोन जण बाहेरगांवी होते, त्यामुळे त्यांचा विषय बारगळला ! अजून महाविदयालयात बरोबर होता, ते नांव डोक्यात होते, फोन लावावा वाटले आणि लावला. ‘मिटींगमधे आहे. आटोपल्यावर फोन करतो.’ आणि बंद केला. कुठे आहे हा भाऊ, काही समजेना ! जावून धडकलो. वेळ घेवून भेटायला जाण्याइतकी गरज नव्हती, फक्त त्याचं तिथं असणं आवश्यक होतं.
आकाशवाणी जळगांव येथे गेलो. मित्र तिथं आहे, हे समजलं ! चला, भेट होतेय ! मला तेथील परिसर नवीन नाही, पण आता वातावरणातील वर्दळ कमी झालीय ! पूर्वी आकाशवाणीचे केंद्राधिकारी, तिथं बसायचे, तिथं मित्राच्या नांवाची पाटी बघीतल्यावर, खरंच आनंद झाला !
श्री. विजय सपकाळे ! आकाशवाणी जळगांवच्या प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमांची मुख्य, महत्वाची जबाबदारी सांभाळत असल्याचे पाहून आनंद वाटला. नेहमीप्रमाणे हातपाय नसलेल्या गप्पा झाल्या, चहापाणी झाले. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम कमी होत असल्याबद्दल मी खंत व्यक्त केली. ‘माझ्या गांवाला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम करणार असाल तर सर्व व्यवस्था माझी’ हे माझे आश्वासन झाले. बऱ्याच वर्षांपूर्वी झालेल्या ‘निशा निगले’ यांच्या कार्यक्रमाची आठवण निघाली. मी कार्यक्रमाची सर्व व्यवस्था, राजे रघुनाथराव देशमुख वाचनालयाचा त्यावेळी पदाधिकारी असल्याने केली होती, पण कार्यक्रमाला हजर राहू शकलो नाही, माझी पुण्याला परिक्षा होती; ही टोचणी अजून त्रास देते.
बाकी सर्वांच्या आठवणी निघाल्या. आकाशवाणीतल्या मंडळींच्या आणि बाहेरच्या, आमच्या दोघांच्या सामायिक परिचितांच्या ! कौटुंबिक गप्पा पण झाल्यात. औरंगाबाद येथे येवूनही, भेट न घेतल्याने माझे रागावणे पण झाले. कठीण अवस्थेतील आपल्या वाटचालीची आठवण झाली. —— आणि शेवटी येथील आठवण म्हणून फोटो !

१३. ११. २०१८

No comments:

Post a Comment