Thursday, December 20, 2018

‘Me Too’

आपल्याकडे अलिकडील काळांत दिसत असलेले - ‘Me Too’ याचे वारे लक्षात घेता, या विषयाबद्दल न्यायशास्त्रात दखल घ्यावी लागेल.
सत्यमेव जयते नानृतम् सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाऽक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परं निधानं ॥
‘सत्यमेव जयते’ हे ‘मंडुकोपनिषद’ यांतील वाक्य आपण भारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य म्हणून घेतले आहे. याचा मतितार्थ असा की सत्याचा जय होतो. महाभारतातील ‘यतो धर्म: ततो जय:’ हे नामदार सर्वाेच्च न्यायालय यानी स्विकारलेले वाक्य आहे. थोडक्यात आपल्या संस्कृतीत सत्यवचनाला कमालीचे महत्व आहे आणि ते शासनाने तसेच न्यायसंस्थेने पण मान्य केले आहे. हे धोरण बरोबरच आहे, अनुकरणीय असेच आहे, यांत शंका नाही.
शासनाला, न्यायसंस्थेला म्हणजेच पर्यायाने तुम्हीआम्ही रहात असलेल्या समाजाने हे धोरण मान्य असून, त्यांनी ते स्विकारलेले आहे. या धोरणास, म्हणजे ‘सत्य विजयी व्हावे’ किंवा ‘जिकडे धर्म तिकडे जय’ याला आपणांस सत्य करून दाखवायचे असेल, या वचनांची प्रचिती सर्व समाजाला द्यायची असेल, तर समाजाचा घटक म्हणून आपणा प्रत्येकाचे वर्तन हे सत्य असावयास हवे, धर्माप्रमाणे असावयास हवे; तरच आपल्याला याचा अनुभव व प्रचिती येवू शकेल. ही व्यवस्था आदर्श म्हणून अपेक्षिलेली आहे आणि आपणा सर्वांनाच हे माहिती आहे की असे वर्तन, आपणा सर्वांकडून शक्य नाही, त्यामुळे या बोधवाक्यांची पूर्णांशाने प्रचिती वा अनुभव येण्याची, आपल्याला समाज म्हणून सुतराम शक्यता नाही.
ही आदर्श व्यवस्था वा हे आदर्शवत वातावरण शक्य नसल्याचे, समाजधुरीण व समाजशास्त्रज्ञ यांनी तसेच इतर सर्वांनीच ओळखले असल्याने, त्यातून विपरीत असे काही निष्पन्न होवू नये, म्हणून योग्य मार्ग काढण्यासाठी विविध नियम, बंधन, आचरणप्रणाली निर्माण करण्यात आल्यात. त्यांचे पालन न केल्यास, योग्य ते दंडात्मक शासन करण्याबद्दल देखील नियम तयार केलेत. जे नियम पाळतील त्यांना, प्रोत्साहनपर असे धोरण पण आखले गेले. थोडक्यात जास्तीतजास्त लोकांनी स्वेच्छेने वा दंडाच्या भितीने, संभाव्य शासनाच्या दडपणाखाली का होईना, पण सत्यानुरूप आचरण करावे आणि धर्माने वागावे, अशी व्यवस्था केली गेली.
ही काटेकोर अशी व्यवस्था सर्वसामान्य जनतेसाठी जशी आहे, तशीच राज्यकर्ते आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी पण आहे. जितके पद मोठे, जबाबदारी मोठी व समाजमान्यता मोठी तितके कडक शासन ठरविले गेले. कायद्याचे अज्ञान हा बचाव, कोणासही उपलब्ध नसला, तरी देखील त्याचे असलेले अज्ञान हा शिक्षेच्या परिमाणात परिणाम करणारा घटक मानला गेला. एखाद्याने आपल्या कृतीने परिणाम काय होतील याची कल्पना नसल्याने, केवळ अज्ञानाने केलेली कृती आणि परिणामांची पूर्ण जाणीव असून देखील, जाणीवपूर्वक केलेले वर्तन यांत हा महत्वाचा फरक लक्षात ठेवून होणाऱ्या दंडात्मक कारवाईत फरक ठेवण्यात आला.
आपले असत्याचरण हे आपण स्वत:हून कबूल करू किंवा ते गुन्हा शोधणाऱ्या यंत्रणेमार्फत शोधण्याचे स्विकारले गेले. गुन्हा शोधण्यास यंत्रणा असफल ठरली, तर गुन्हा करणाऱ्यांपैकी कोणी पश्चात्तापाने त्याबद्दल सांगीतले, तर त्याला त्याच्या परिणामांची पूर्ण कल्पना देवून दया दाखवण्याची पण तरतूद आहे.
ही इतकी न्यायशास्त्रीय तत्वे, नितीमूल्ये, दंडनीय अपराध व त्याबद्दल होणारा दंड वगैरेंचा जामानिमा एवढ्यासाठी केला की प्रत्येकाने सत्याचरण करावे व धर्माने वागावे. येथे ‘धर्म’ हा शब्द ‘त्या व्यक्तीचे अपेक्षित कर्तव्य’ या अर्थाने वापरलेला आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध वगैरे अर्थाने वापरलेला नाही. तेव्हा धर्माचरण आपण अपेक्षितो, त्यावेळेस त्या व्यक्तीचे अपेक्षित कर्तव्य काय आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.
धर्माचरण अपेक्षित असलेले घटक म्हणजे - शासन व त्यांचे अधिकारी, कुटुंब व त्यांतील सदस्य, समाज आणि समाजबांधव, समाजबांधव आणि शासन व त्यांचे अधिकारी वगैरे सर्वांनी एकमेकांशी कसे वागावे यांचे नियम ठरवले गेले आहेत. तरी देखील कोणी आपल्या तात्कालिक फायद्यासाठी, आपली वरचढ भूमिका असल्याने आपणांस कोणी विरोध करणार नाही याची जाणीव असल्याने किंवा कर्तव्यच्युत होवून सरळ भ्रष्ट आचरणाचा मार्ग नितीबाह्यपणे स्विकारून होणारे लाभ पदरांत पाडून घेत असत. याबद्दल असणारे नियम न पाळल्याने आणि ते आपण पाळले नाही, हे लपविले गेल्याने, अनपेक्षितपणे त्याचवेळी किंवा काही काळानंतर समस्या निर्माण होवू लागल्या. त्यातून असत्याचरण कोणी केले, हे उघड होवू लागले.
नियम न पाळल्याने होणारे परिणाम हे तात्कालिक असतात, तसेच कायमचे असतात. याचे परिणाम काही वेळा दुरूस्त करता येतात, तर काही वेळा दुरूस्त करता येत नाहीत. काही वेळा त्यांतून अनपेक्षितपणे तिसरीच समस्या उद्भवते आणि ती निवारता येत नाही. काही परिणाम तर इतके काही भीषण असू शकतात, की ते कधीही दुरूस्त करता येत नाहीत. माणसाची मानसिकता लक्षात घेवून, काही वेळा अशा अडचणी या मुद्दाम, हेतुत:, अवेळी निर्माण करण्यात येतात. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर, मिळणाऱ्या संधीवर विपरीत परिणाम होवून, त्याचे आयुष्यातील बराच काळ हे या स्वरूपातील अचानक आलेले वा जाणीवपूर्वक निर्माण केलेले संकट निवारण करण्यात जातो. त्यातून एकमेकांबद्दल कायमची शत्रुत्वाची भावना निर्माण होते आणि त्यातून अजून विविध समस्या निर्माण होतात, केल्या जातात. या भावना सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, व्यापारविषयक, आर्थिक, कलाक्षेत्र वगैरेत वावरणाऱ्या सर्व मंडळीत असतात. या भावनांपासून अभावानेच कोणी मुक्त आहे.
याची आपल्या नित्य परिचयाची काही उदाहरणे आणि काही संभाव्य परिणामांची थोडी जंत्री खालीलप्रमाणे देता येईल.
1. सासू व सासरची मंडळी ही सुनेला ती सासरी आल्यावर त्रास देते, मग त्याचा वचपा सून तिला त्याचवेळी त्रास देवून उट्टे काढते किंवा सासू विकलांग झाली की उट्टे काढते किंवा मुकाट सहन करते. भविष्यात चांगले दिवस येतील, या आशेवर दिवस काढते. अति झालं तर वेडवाकडी घटना घडते आणि सर्व सासरच्या मंडळींना दंडात्मक कारवाई सहन करावी लागते. काही वेळा सूनच वाह्यात असते, ती असलेल्या कायद्यांचा उपयोग करून, वेडेवाकडे व गलिच्छ आरोप करून, धमकावून रक्कम उकळते. सासरचे नंतर जीव वाचला म्हणून निःश्वास टाकतात. मुलाच्या आयुष्याचे या घटनेमुळे पुढे काय होईल याचा कोणीच अंदाज करू शकत नाही, ते वाऱ्यावरच असते. काहीवेळा संबंधीत नसलेली मंडळी हे कौटुंबिक वातावरण इतके काही खराब करतात, की एकमेकावर अतीव संशय निर्माण होवून, नको ती पावलं उचलली जातात आणि त्या कुटुंबाची एकी भंग पावून, वाताहत होते. भविष्यात एकत्रितपणे राहिले तर ते कुटुंब बलशाली बनेल, ही शक्यता संपुष्टात आणली जाते.
2. राजकीय मंडळी एखाद्यास राजकीय विजनवासात पाठवायचे असेल, तर एरवी जरी एकमेकांच्या गळ्यातगळे घालून, एकत्रितपणे जनतेला मूर्ख बनवून, संगनमत करून भ्रष्टाचार करत असतील तरी, नेमक्या निवडणुकांच्या वेळीच खऱ्याखोट्या, बऱ्याच कालावधी पूर्वीच्या, बिनमहत्वाच्या विषयांच्या आरोपांची झड उठवून देतात. आपल्या बगलबच्चांमार्फत न्यायालयांत खोट्यानाट्या केसेस करून, त्याच्याबद्दलचे वातावरण खराब करतात. त्याचा फटका त्याच्या निवडणुकीतील यशावर होवू शकतो.
3. कलाक्षेत्रांत, आर्थिक क्षेत्रात, व्यापार क्षेत्रांत, व्यावसायीक स्पर्धेत, नोकरीत पण हाच प्रकार अवलंबिला जातो. कोणी पण स्पर्धेतून बाद झाला वा मागे फेकला गेला, तर त्याला कित्येक वेळा आपले मूळ स्थान पुन: मिळवतां येत नाही.
4. काहींचा हा व्यवसाय बनलेला असतो की बदनामीची धमकी देवून अपेक्षित लाभ या अशा गैरमार्गाने पदरात पाडून घेणे.
अलिकडे महिलांवर पूर्वी कोणी केलेल्या अन्यायास वाचा फोडली जावी, या उद्देशाने तिने तत्कालीन सहन केलेला अन्याय जाहीर करून त्यास दाद मागण्याचा कल दिसू लागलेला आहे. यांत बेकायदेशीर, अनैतिक, चुकीचे वा गैर काहीही नाही. मात्र आज, इतक्या कालावधीनंतर ही दाद मागतांना, त्या महिलांच्या मनांत कोणता हेतू आहे, याबद्दल स्वाभाविकच संभ्रम वा शंका निर्माण होते. त्याला समोरची व्यक्ती उत्तर कसे देईल ? घटना खरी असून, त्यांवर अपेक्षित उत्तर आले, प्रतिक्रिया आली तर हरकत नाही. इतक्या काळानंतर का होईना पण अन्यायाला वाचा फुटली व त्याचे निवारण झाले असे म्हणता येईल. मात्र असे जर झाले नाही, बनावट घटना असल्याचे नंतर समजले तर ज्यांवर आरोप झाले आहेत, त्याचे होणारे नुकसान हे होवून गेलेले असेल.
यापेक्षा पण भीषण म्हणजे ज्या गोष्टी विस्मृतीत गेल्याने सर्व शांततेत सुरू आहे, आपली जुनी दुष्कृत्ये उजेडात येतील या भितीने, ही मंडळी दबून आहेत, ती अभावानेच दबून रहातील. तिथं ही मंडळी जाणीवपूर्वक समाजविघातक बाबी सुरू करतील, त्यांचा तो व्यवसाय बनेल. हा सर्व विचार दंडप्रक्रिया संहितेत असल्याने उशीरा केलेल्या तक्रारीतील सत्त्यतेबद्दल जास्त काळजी घेवून निर्णय दिले जातात. काही घटनांबद्दल तक्रारीला मुदतीचे बंधन आहे.
न्यायशास्त्र व दंडसंहीता ही समाजात शांतता नांदावी यासाठी निर्माण करण्यात आली आहे. ते अपरिवर्तनीय नाही. आज निर्माण झालेला महिलांवरील जुन्या काळांत झालेल्या अन्यायाची वाचा फोडण्याबद्दल असलेला कल लक्षात घेवून, त्यांत अजूनही सत्याच्या पुन:स्थापनेसाठी आवश्यक ते बदल केले जातील, नव्हे हेच अपेक्षित आहे. तरी पण महिलांनी आता बदललेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपण गैरमार्ग वापरणार नाही व समोरच्याला वापरू देणार नाही, हा निश्चय तर करावाच आणि या सोबत ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ हे तत्व लक्षात ठेवून, तात्काळ पाऊल उचलून, अयोग्य वर्तनास प्रतिबंध करावा.

१५. १०. २०१८

No comments:

Post a Comment