Thursday, December 20, 2018

ज्येष्ठा आणि कनिष्ठा !

ज्येष्ठा आणि कनिष्ठा !
गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे ‘गणेश चतुर्थीला’ झाले की यांच्या येण्याचे वेध लागतात. या दरवर्षी भाद्रपद शुद्ध सप्तमीला, अनुराधा नक्षत्रावर आपल्याकडे येतात. अष्टमीला जेष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन होते. नवमीला मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन होते. त्या परत आपल्या घरी जातात. गणपतीच्या आईचे, पार्वतीचे हे नांव गौरी, तिचे हे व्रत ! महाराष्ट्रात याला महालक्ष्मीचे व्रत पण म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्रांत आणि ही संस्कृती जिथं म्हणून आहे, तिथं गाजत असलेला गौरीगणपती हा जोडसण !
माझ्या लहानपणी तर आमच्या घरचा हा सण घरापुरता, वैयक्तिक रहातच नसे. गणपतीचे दिवस असल्याने, गल्लीतील सर्व बाळगोपाळ मंडळी रोज गणपतीच्या आरतीसाठी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी यायचीच. त्यात ही माझ्या घरची तयारी दिसली, की उद्या माझ्याकडे महालक्ष्मी येणार आहे, हे सर्वांनाच समजायचंच ! मग काय ? या महालक्ष्मींच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत, ही बाळगोपाळ मंडळी, जवळपास आमचे कडेच ! यांत कोण मुलं, कोणत्या जातीची आहे, हे त्यावेळेस समजत नव्हतं. बरं होतं, ते. हा विचार तर, अलिकडे मनांत यायला लागलाय, या आसपासच्या भयंकर वातावरणाने ! आपल्या मनांत काही नसलं तरी, जबरदस्तीने विचार कोंबले जातात. सुटकाच नाही त्यातून ! भीषण !!
माहे्रवासीण आपल्या घरी आल्यावर तिच्या आईची, वडीलांची, घरच्या मंडळींची जी लगबग असते, ती आपल्या काही सणउत्सवातून दिसते. वास्तविक इथं प्रत्यक्षांत कोणी माहेरवासीण येत नाही, तर महालक्ष्मीलाच, जेष्ठाकनिष्ठा गौरींनाच बोलावले असतं, आपल्याकडे ! देवीदेवतेलाच आपली लेक मानून माहेरवासीण मानणे, केवढी भव्य आणि जिव्हाळ्याची कल्पना ! देवीला लेक मानून, ‘माहेवासीण म्हणून ये’ ही प्रार्थना करणे, ही तर खरंच स्त्रीच्या मातृत्वातील प्रेमाची कमाल मर्यादा झाली. सासरी काय आहे आणि कसं आहे, पण माहेरी तरी दोन दिवस, तिला चांगलंचुंगल देवू. ही भावना या भूतलावरील असलेल्या मातेचे आपल्या लेकीप्रती असलेले वात्सल्य, ती त्या स्वर्गलोकीच्या आपल्या लेकीवर, प्रत्यक्ष जगन्मातेवर वर्षाव करून दाखवते.
मग घरभर अगोदरच पावलांचे ठसे उमटवलेल्यांवरून, टेकवत टेकवत, हे महालक्ष्मींचे डोक्यावरून खण ठेवलेले मुखवटे घरातील सवाष्णी, सुना आपल्या घरात दोन्ही हातांनी अलगद धरून आणतात. या लाडक्या माहेरवासिणींना ‘महालक्ष्या आल्या — सोन्याची पावलं, महालक्ष्या आल्या — सोन्याची पावलं’ म्हणत वाद्यांच्या गजरांत मुख्य दरवाजातून आपल्या घरांत आणायचे. बैठक, माजघर, स्वयंपाकघर, कोठीघर, देवघर, जात्याचे घर, न्हाणीघर वगैरे सर्व घर दाखवायचे. सोबत अवतीभोवती फिरत असलेल्या बालगोपाळांच्या हातातील ताटं, ताटल्या, ताम्हण, डबे यांच्यावर पळी, चमचे, काड्या घेऊन वाजत असलेल्या, कसल्याही तालासुरांचा पत्ता नसलेल्या, वाद्यांच्या गजरांत तिची स्थापना करायची. गौरी बसवायच्या ! बस ! या लेकुरवाळ्या असलेल्या गौरींना मला तर वाटते, या सोबत वाजत असलेल्या नादमय झांजा, शंख घंटा यांच्या नादापेक्षा, या बाळगोपाळ मंडळींनी हल्ल्यागुल्याने केलेल्या वाद्यांचेच स्वागतच आवडत असावं !
यांतील एकीला सोवळे नेसवावे लागे, तर दुसरीला नविन साडी ! सोवळंवाली जेष्ठा तर दुसरी कनिष्ठा ! सोवळंवालीजवळ पूजेच्या वेळी मुलबाळ नाही, तर दुसऱ्या ओवळ्याच्या महालक्ष्मीला मुलाबाळांना कड्यावर खांद्यावर घेवून, हा संसाराचा गाडा ओढावा लागे. तिची पूजा पण करायची, तर कड्यावरच्या त्या लेकरासहीतच ! आमचे घरी बहुदा दरवर्षी एकीला, म्हणजे जेष्ठा किंवा कनिष्ठेला साडी नेसवतांना वेळ लागायचाच, मग जेष्ठा का कनिष्ठा कोण नाराज आहे, याची विनाकारण रुखरुख ! दोन्हीची आवसासावर होवून, दागदागिने घालून, एकदा का कनिष्ठेच्या कड्यावर तिचे बाळ बसवले की झाल्या गौरी उभ्या, माहेरवासणी म्हणून !
मग दुसऱ्या दिवशी तिच्या पूजेसाठी लागायची विविध फुले, पत्री ! सुवासिक पत्री म्हणून केवड्याचे कणीस तर तिला लागतेच ! गुलाब, शेवंती, झेंडू, मोगरा, चांदणी वगैरे जी मिळतील ती, विविध प्रकारची फुले आणणे. त्यांचे हार करणे, त्यांच्या बैठकीभोवतीची सजावट, रांगोळ्या, चार बाजूला हिरवेगार गडद पोपटी रंगाचे केळीचे खांब ! समोर ओटीत घातलेली वेगवेगळी फळे, मक्याची कणसं हे पण लागायचं. यासाठी शेतात जावं लागायचं. त्या दिवशी कोणाच्याही शेतातील फुले ही सर्वांची असायची. नाही कोण म्हणणार आणि कोणाला म्हणणार ?
‘अरे, का महालक्ष्मीच्या पूजेच्या फुलाला नाही म्हणतोय ?’ या प्रश्नावर तो फुलझाडाचा मालक तरी काय म्हणणार ?
‘हां, घ्या भाऊ तुम्ही. पण थोडी घ्या. बाकीच्यांना पण लागतील. देवाची पूजा आज, सर्वदूरच आहे.’ असे काहीतरी म्हणत तो विरोध करून पहायचा.
माझ्या वडिलांचे मित्र कै. अ. बा. अग्रवाल, त्यांना सर्व ओळखायचे ते धन्नाशेठ अग्रवाल याच नांवाने ! त्यांच्याकडे मी वडिलांसोबत बऱ्याच वेळा जायचो. त्यांच्या घराचे नांव, ‘बालगोपाल भवन’, अगदी महालक्ष्मी मंदीराजवळच त्यांचे घर ! तेथे कै. धन्नाशेठ यांचे वडिल, पायरीवर बसलेले असायचे. माझ्या वडिलांच्या त्यांच्या मित्रांबरोबर गप्पा; तर आम्हा मुलांच्या त्यांच्या मित्रांच्या वडिलांसोबत ! गमतीदार प्रकार ! यांत वयाचा अडसर अजिबात नाही. त्यांची पण नातवंड सोबत असायची. त्यांच्या घरातील काचेच्या कपाटात, चांदोबा मासिकांची जी रंगीत देवादिकांची छान, आकर्षक मुखपृष्ठे लावलेली असत, त्यांची मला अजून आठवण आहे. यांच्या शेतात, त्याला ते ‘नजरबाग’ म्हणायचे बहुतेक, केवड्याचे झाड होते. त्या केवड्याचे कणीस त्यांचे वडील महालक्ष्मीच्या पूजेला आठवणीने द्यायचे.
पूजेच्या दिवशी त्यांना, गौरींना वाहिलेली कापसाची केलेली वस्त्रे, हळद लावून तयार केलेले सुताचे बंधन ! खणानारळाने तिची ओटी भरायची. मग पक्वान्न काय, पुरणपोळीचा नैवेद्य काय, सोळा भाज्या, तळण, खास प्रसाद म्हणून गौरीच्या आवडीचे आंबील काय ? काय करू अन् काय नाही असं होवून जातं, घरातील गृहस्वामिनीला ! माझ्या आजीचे मधेच विचारणे, ‘अग, त्या काशिनाथशेटकडे सांगीतले का ? त्यांनी आपल्या महालक्ष्म्यांना नवस केला होता. त्यांना त्या नवसाला पावल्याय. त्याच्याकडे आपल्या महालक्ष्म्यांची नेहमी आठवण असते बरं !’
‘हो. सांगीतलंय त्यांच्याकडे. आपल्या घराला घर लागून आहे, कसं विसरणार ?’ आईचे उत्तर ! मग थोडा वेळ जायचा शांततेत !
‘अग, दरवर्षी अकोले डॉक्टरांकडची रास असते. त्यांना प्रसादास सांगीतलेय का ?’ आजीला जसे नावं आठवतील, तसे ती विचारते. यांवर होकारार्थी उत्तर देत नाही, तोच ‘त्या बेबीच्या आईला सांगीतले का ? विसरून जाल. मी लेक मानलेय तिला ?’ पुन्हा आजीचे विचारणे सुरूच असायचे. बेबीची आई म्हणजे, गल्लीच्या पार टोकाशी असलेले गिनोत्रा यांचे घर ! हे मूळचे पंजाबातील. आपल्याला १५ आॅगस्ट, १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्याचे सुदैवी किंवा दुर्दैवी साक्षीदार ! त्यानंतरच्या घडलेल्या असंख्य दुर्दैवी घटनेने रानोमाळ झालेल्या कुटुंबियांपैकी एक, आमच्या गांवात आलेले, स्थायिक झालेले !
‘अहो, त्यांची पोरं ही दिवसभर आपल्याचकडे आपल्या पोरांसोबत आहेत.’ आई सांगायची.
‘हं. मग ठीक आहे.’ आजीचे उत्तर.
‘त्या रामचंदला सांगीतले का ?’ आजी. रामचंद म्हणजे शेतात काम करणारा.
अशा पद्धतीने शेजारीपाजारी महालक्ष्मीच्या प्रसादास म्हणजे जेवायला, संपूर्ण गल्ली व शेजारच्या गल्लीतील पण मंडळी असायची.
महालक्ष्मीला भोजनोत्तर जो विडा लागायचा, तो ‘गोविंद विडा !’ हा पाच पानांचा तयार करतात. त्यात सुपारी बडीशेप, सुकामेवा, गुलाबपाकळी, गुलाबपाणी, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, जेष्ठमध, कंकोळ, तीळ, खोबरे, पत्री, खडीसाखर, काळा मनुका, मध, कापूर, केवड्याच्या पानात घालून मुरवलेला काथ वगैरे बहुगुणी वस्तू त्यात टाकलेल्या असतात. याचा आकार हा चौपेडी असतो. खायचे म्हटले तर एका वेळी, एक विडा पूर्णपणे आपल्या तोंडात बसत नाही, त्याचे दोनतीन घास करावेच लागतात. गोविंद विडे पण पाच लागायचे. जेष्ठाकनिष्ठा यांच्यासाठी दोन विडे, त्यांच्या दोन बाळांसाठी दोन आणि गणपतीचा एक, असे पाच ‘गोविंद विडे’ पूजेत ठेवावे लागायचे. हा गोविंद विडा करणे पण कौशल्याचे काम आहे. विडा हा निदान दुसऱ्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत बंदीस्त रहायला हवा, मोकळा सुटायला नको. कारण हे विडे गौरींचा प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी घरातील आई, काकू वगैरे घ्यायच्या. बाळांच्या विड्यासाठी भावंडाची झुंबड ! गणपतीच्या विड्याबद्दल मात्र तडजोड नसायची, तो मुलांचाच असायचा. मग आपल्या वाटेला आलेला चिमूटचिमूट विडा भक्तीभावाने खात समाधान मानले जायचे.
जेवतांना पंगतीतील सर्वात मोठे केळीचे पान आम्हाला, मुलांना हवं असायचं, तर आमच्या वाटेला लहान लहान पाने यायची. नेवेद्याचे पान आम्हाला हवं असायचं कारण ते अगोदरच सर्व वाढलेले. नंतर पण सर्व पदार्थ वाढतील की नाही ही शंका ! पण नैवेद्याचे पान पूजा करणाऱ्यांना मिळायचे, शक्यतोवर माझ्या मोठ्या काकांना ! त्यांच्यासाठी आजीने नवसाचा फुलोरा पण कबूल केला होता. तो महालक्ष्म्यांच्या वर टांगलेला असायचा. या भरगच्च भरलेल्या पानांतील काहीही ‘जेवतांना टाकायचे नाही’ ही पुन्हा ताकीद देवून झालेली.
त्या पानावरील बऱ्याचशा वेगवेगळ्या रंगाच्या चटण्या, पंचामृत, कोशिंबीर, वाटल्या डाळी या पानाच्या वरच्या भागांत डावीकडून उजवीकडे ! तर पातळभाजी, फळभाजी व इतर भाज्या त्याच्या उजवीकडे व पानाच्या मध्यभागात. त्याच्या लगत आमटी, पुरणाची आमटी, कढी, खीर यांच्या वाट्या ! पानाच्या खालच्या भागांत डावीकडे भजे, वडे, पापड, कुर्डया वगैरे तळण ! मोदक, करंज्या, सांजोऱ्या, पापड्या या पण असायच्या. त्याच्या लगत उजवीकडे मग भरभक्कम तूप असलेली पुरणपोळी ! त्याच्या अलिकडे शेजारी भाताची मूद व त्यांवर वरण, तूप ! शेजारीच पुरणाच्या आरतीचा प्रसाद आणि महालक्ष्मीचा खास प्रसाद म्हणजे आंबील ! हे आमचेकडे ज्वारीचे पीठ ताकात शिजवून, हळद घालून करतात. याची चव आम्हाला विचीत्र लागायची, पण प्रसाद असल्याने आम्ही खायचो. हे सर्व संपवतांनाच आम्हाला दम लागायचा. ते संपता संपत नसे, पण तरी पापड कुर्डया पुन्हा पुन्हा हव्या असायच्या. भजेवडे पण पुन्हा मिळाले तर चांगलं, असं वाटायचे; पण ‘पहिले पान चक्क कर, मग बाकीचे मिळेल.’ या ताकीदीने काहीच मिळायचे नाही. वाढणारी जर दयाळू असेल, तर ‘जाऊ द्या, मी खाईल उरले तर’ म्हणत एखाददोन भजे, पापड, कुर्डया वाढून जात. तेवढाच काय तो आनंद ! बाकी वडिलधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पान चक्क होईपर्यंत पोटाला तडस लागलेली असायची. श्वास सुद्धा घेता येणार नाही, ही अवस्था ! बरं, सर्वांचे जेवण झाल्याशिवाय भर पंक्तीत मधेच उठायचे नाही, ही पध्दत ! त्यामुळे इतका वेळ ही मोठी माणसं काय जेवतात व का जेवतात, हा मला नेहमीच पडलेला प्रश्न ! पण त्यावेळी काही इलाज नसायचा.
येणारी बाहेरची मंडळी महालक्ष्मीचे दर्शन घ्यायची, तिचेसमोर आणलेल्या धान्याची रास टाकायची, तिला मनोभावे नमस्कार करायची. निवांत बसायची. भोजनाचा प्रसाद घ्यायची, मग आटोपून घरी जायची. हे सर्वांचे जेवणखाण आटोपत नाही, तर संध्याकाळ होत आलेली.
संध्याकाळचे हळदीकुंकू, त्याची गडबड ! गांवातील, शेजारपाजारच्या गौरी अगदी सजूनधजून या जगन्माता गौरीच्या दर्शनाला यायच्या. बहुतेक सर्वच लेकुरवाळ्या असल्याने, त्यांच्यासोबत बऱ्याच वेळा मुलंमुली असायचीच. मुलींना यायला परवानगी तर मुलांना बंदी ! काही जण हा बंदीहुकूम मोडून यायचे. गौरीच्या दर्शनाला जातोय, हळदीकुंकवाला नाही, हे स्पष्ट करून ! हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला मुलांनी जावू नये, हा नियम साधारण कितव्या वर्षापासून लागू करावा, याबद्दल मतभेद आहेत. तर मुलांनी हळदीकुंकू हा फक्त बायकांसाठीचाच कार्यक्रम असल्याने तेथे जावू नये, हे साधारण त्यांना कितव्या वर्षापासून समजायला लागते, असे मानावे, यांत पण मतभेद आहे. कमी वयाची मुलं असतील तर त्यांना वाटते, आपण खूप मोठे झालेलो आहोत, घरी एकटं राहू शकू’ पण घरातील कोणाचा यांवर विश्वास नसल्याने त्याला हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला पण पिटाळले जाते. उलट जरा मोठे झाल्यावर पण, ‘आपण एकटे रहायला पुरेसे मोठे नाही’ हे निकराने सांगत असतांना पण, घरातील मंडळी ‘बायकांत काय लुडबूड करतोय ?’ म्हणत दामटून घरात बसवतात. त्यामुळे यांत नेमके खरे कोण व खोटे कोण, हे ती जगन्माता गौरीच जाणे ?
पण या गर्दीने, मुलाबाळांच्या गोंगाटाने घर कसं भरलेले व दणाणून जायचं ! या दर्शनाला आलेल्या ललनांचा उत्साह भरभरून वहात असायचा, हळदीकुंकू लावणे सुरू असायचं. ख्यालीखुशाली विचारणे सुरू असायचं. खिरापत दिली जाई. कोणी सुरेल गाणारी असेल तर, देवीचा जोगवा, भजन म्हणायची. असे मस्त वातावरणांत असतांनाच, एखादी कोणीतरी म्हणायची, ‘नांव घ्या आता. उखाणा घ्या.’ म्हणून टूम काढायची. हा आग्रह तर असा असायचा, की जिच्या कानावर हा शब्द पडेल, तिला वाटत असे ‘आपल्यालाच म्हणताय, की ‘उखाणा घ्या’ म्हणून ! बस, निदान अर्धा तास बैठक वाढायची आणि त्यांत नवीन भर पडतच असायची. कोणाचे काही उखाणे तर कोणाचे काही ! दिवसभराच्या दगदगीने घरातील गृहीणी थकल्या असल्या, तरी त्यामुळे त्यांच्या या आताच्या आनंदात वा उत्साहात काही फरक पडत नसे. दिवसभराच्या त्या घरातील गृहस्वामिनीच्या आदरातिथ्याने तृप्त झालेली, जगन्माता गौरी आपल्या तेज:पूंज चेहऱ्याने या घरातील गृहीणीकडे, तेथील माणसांकडे पहात, ‘यांचा आनंद आयुष्यभर असाच राहू दे’ असा आशीर्वाद देत उभी असायची. हा असाच आनंद पुढील वर्षीपण या नांदत्या घरी मिळावा यासाठी !

No comments:

Post a Comment