Thursday, December 20, 2018

मागे तीन वर्षांपूर्वी, ३० डिसेंबर २०१५ रोजी या गीताचे गीतकार - मंगेश पाडगांवकर यांना देवाने बोलावून घेतले, आपल्या सोबत नवनवी गीते लिहायला ! चांगली गीते लिहायला हवे होते. बरीच गीते लिहून तयार झाली.
अरे पण आता, ही लिहिलेली गीते गाणार कोण मोठा प्रश्नच, देवालाच पडलेला प्रश्न ! मग काय पटकन बोलावून घेतले - अरुण दाते यांना, दिनांक ६ मे २०१८ रोजी ! सर्व तयारी झाली, प्रत्यक्ष परमेश्वरासमोर गायचे ! अरुण दाते पण हजर देवाच्या दरबारांत !
अरे पण या सुंदर गीतांना चाल कोण लावणार ? त्यांना बोलावयाचे राहूनच गेले. चुगली केली कोणीतरी. देव झाले म्हणून काय झाले ? आणि लक्षांत आणून दिले, - अहो, आपल्याच नांवाचे आहे, बोलावून घ्या त्यांना ! आणि दुर्दैव आमचे, त्यांना दुसरे कोण आठवणार ? काय आमचे 'यशवंत देवच' आठवावे !
आज आपल्यातून 'यशवंत देव' त्यांच्या म्हणजे देवाघरी कायमचे निघून गेले.
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

३०. १०. २०१८

No comments:

Post a Comment