Thursday, December 20, 2018

मी राहुल गांधी अथवा नरेंद्र मोदी यांची पण भाषणे कधीही आवर्जून ऐकत नाही. भाषणे ऐकायची असतील, तर अभ्यासू आणि उत्तम वक्तृत्व असलेल्यांची ऐकावी, मग ते विषय कोणताही मांडो. कोणत्याही राजकीय नेत्यांची भाषणे ही अलिकडच्या काळात प्रचारकी झालेली आहेत. केलेल्या कामाची जंत्री देण्यापेक्षा, काय करणार याचाच पाढा असतो.
हे वेड्याला पण समजेल अशा गोष्टी कधीही, अगदी कोणाचे पण सरकार आले तरी, करता येणार नाही, अशा पण हे आत्मविश्वासाने बोलत असतात. याला मी आश्वासने म्हणत नाही, खोटे बोलणे म्हणतो. हे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून तपासता येईल. असो. राजकारण हा त्यांचा धंदा आहे. मात्र त्यांच्यामागे अंधपणे जाणे हा आपला धंदा नाही, त्यांवर तर आपले पोटपाणी अजिबात अवलंबून नाही. यांच्या भाषणातील सत्यता आपल्याला अनुभवास आली की मग आपण सांगावी, तोपर्यंत स्वत: धीर घरावा आणि आलेल्या अनुभवांशी, त्यांच्या गोष्टींची पडताळणी करावी.
राहूल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या पक्षनेतृत्वाच्या काळात त्यांच्या गेल्या दहा वर्षांत कशी अवस्था होती हे मी बघीतले आहे, अनुभवलेले आहे. आपण सर्वांनी पण अनुभवले असेलच. ज्यांनी तुलनेने बरे काम केले त्या माजी पंतप्रधान कै. नरसिंहराव यांना त्यांनी काय वागणूक दिली, हे पण सर्वांनी बघीतले आहे. आता ही मंडळी ज्यांची हुशारी सांगत आहे, त्या माजी पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचा कै. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री म्हणून असलेला कारभार आणि नंतर ते स्वत: भारताचे पंतप्रधान असतांना केलेला कारभार, दोन्ही आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. तुलना करा, लगेच फरक लक्षात येईल. याव्यतिरिक्त आपल्याला रोज समाजात वावरतांना आलेला अनुभव काही कमी नाही, भरपूर अनुभव आहे.
गेल्या चार वर्षांतील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चाललेल्या राज्यकारभाराने एक समजले, की हा काम करू शकणारा आणि तशी हिंमत असणारा माणूस आहे. त्यांना आपण नीट काम करू द्यायला हवे. त्यांत अडथळे आणण्यापेक्षा, मदत करा. सूचना देवून अजून चांगले काम करवून घ्या.
कॉंग्रेसच्या काळांत भयंकर अंदाधुंद कारभार होता आणि आता भाजपच्या काळात रामराज्य सुरू आहे, असा विचार करणारा मी नाही. सरकारचे धोरण म्हणजे दैनंदिन राज्यशकट प्रत्यक्षपणे, हा सरकारी कर्मचारीच हाकतात. मात्र त्याचे दोर सरकार ज्याचे आहे, त्यांच्या हातात असतात. अयोग्य काम केल्यावर, वेसण खेचली जाते आणि पाठीवर एखादा आसूड पण ओढला जातो, हे समजले की अयोग्य काम करण्याची इच्छा होत नाही, असे म्हणण्यापेक्षा हिंमत होत नाही. चांगले काम केले की ‘विभागीय चौकशी’ सुरू होत नाही, तर काही वेळा एकदोन बक्षीसे मिळतात. बढती होते. हे समजलं की कर्मचारी काम करतील. कर्मचारी नेमतांना, त्यांना काम नेमले असेल ते करता येते आहे का नाही, फक्त हेच पहा. हा आपला तर हा परका, हा आपल्या पक्षाचा तर हा विरोधी पक्षाचा, हा आपल्या जातीचा तर हा ‘त्या जातीचा’ यापैकी पाहू नका. त्यांची कामातील निष्ठा, कळकळ आणि देशाशी प्रामाणिकपणा पहा. रामराज्य आपोआप येईल. घोषणा द्याव्या लागणार नाही. यासाठी सरकार आणि विरोधी पक्ष पण सोबत हवेत. विरोधी पक्षाचे ध्येय चुकीचे घडू देणार नाही, हे हवे. सत्तेतून खाली खेचू, हे नको. हे ध्येय ठेवले की सत्ता मिळेल.
सरकारी कर्मचारी हे हाकलून देता येत नाही, कारण एकदा नेमलेले कर्मचारी, ते कोणाच्याही कारकिर्दीतले असो, निवृत्त झाल्यानंतरच घरी बसतात, तोपर्यंत त्यांच्या पद्धतीनेच काम करतात. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी किंवा अजून कोणी असले तरी कोणाकडेही जादूची काडी नाही की अल्लाउद्दीनचा दिवा नाही.
भलतंसलतं वाचून अजिबात गोंधळत नाही सामान्य वाचक ! मतदार तर अजिबात नाही कारण गेल्या चार वर्षांचे जे अनुभव तो घेत आहे, त्याप्रमाणे निदान गेल्या पंचवीस वर्षांचे म्हणू नका, पण चार वर्षांपूर्वीच्या दहा वर्षांचे अनुभव त्याच्या लक्षात आहे. ——- सर्वात शेवटी, कोणताही अंगठेबहाद्दर सांगेल - स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
एक उदाहरण देतो - शेतकरी आपल्या शेतात पूर्ण हंगामभर खपतो, तोपर्यंत त्याला काहीही मिळत नाही. पीक फक्त त्याच्या डोळ्याला दिसत असते. आपल्या डोळ्यात तेल घालून त्या हंगामाचे रक्षण करत असतो, कारण हा हंगाम चांगला सुरक्षित त्याच्या घरी येणे आवश्यक असते. पुढच्या हंगामापर्यंत त्याला या हंगामावर दिवस काढायचे असतात. ऐनवेळेस भलत्याच कोणी हे लुटून नेले, तर वर्षभर उपाशी रहाण्याची वेळ असते. मात्र तो हंगाम कापून घरी आला की तो मग शहाणा होतो. किती हंगाम आला, हे त्याला समजते. पूर्वी झालेल्या चुका लक्षात येतात. पुन्हा काय सुधारणा करायची, हे ठरवतो. आपण केलेल्या कष्टाच्या फळामुळे पुढील हंगामापर्यंत चिंता नसते. म्हणून यांनी गेल्या चारपाच वर्षांत केलेली ही मेहनत जनतेच्या घरी येवू द्या. त्याचे नीट मूल्यमापन करा, पूर्वीच अनुभव लक्षात घेवून ! याच्या त्याच्या, गावगप्पांच्या नादी न लागता, तुमचा हा पाच वर्षाचा हंगाम कोणाला लुटू देवू नका.
आज श्री. Praveen Bardapurkar यांनी ‘बदले बदले राहुल गांधी नजर आते हैं’ हा लेख लिहीला आणि मनांतलं थोडक्यात लिहीलं.

२२. ९. २०१८

No comments:

Post a Comment