Thursday, December 20, 2018

मी मूळचा रावेर, जि. जळगांव जिल्ह्यातील ! रावेर गांवाच्या आयुष्यात घडलेल्या अभिमानास्पद घटनांपैकी आज एक घटना आठवली. कारण होते, नागपूर येथे उच्च न्यायालयात येण्याचे !
आज न्यायालयाच्या कामानिमीत्ताने नागपूरला आलो होतो. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, या इंग्रजांच्या काळातील जुन्या दगडी, भरभक्कम इमारतीत मी उभा होतो. उगाचच तीन-चार कोर्ट हॉलमधे काम नसतांना पण जावून आलो. आणि आठवली ती एक, आमच्याच रावेर वकिल संघात ऐकलेली घटना, कै. ॲड. प्र. ना. चावरे यांनी सांगीतलेली -
तारे कुटुंब हे मूळचे आमच्या रावेर गांवचे. आमचे गांव आजच्या मध्यप्रदेशला जवळचे तसेच विदर्भाला पण जवळचे ! एकमेकांचे नातेगोते इथं विदर्भ, मध्यभारत, मध्यप्रदेशांत भरपूर ! तारे कुटुंबातील एक जण तत्कालीन मध्यप्रांतात आताच्या मध्यप्रदेश उच्चन्यायालयात न्यायाधीश झाले. रावेर सारख्या छोट्या तालुक्याच्या गांवासाठी ही अभिमानाचीच गोष्ट ! गांवातील मंडळींनी सत्कार समारंभ आयोजित केला. समस्त रावेरवासियांसाठी पवित्र आणि ऐतिहासिक असे ठिकाण होते - ‘रामस्वामी मठ’, समस्त ब्रह्मवृंद या जुन्या वास्तूत ! येथे उपस्थित रावेरकर मंडळींनी न्यायमूर्ती तारे यांचा ह्रद्य सत्कार केला. त्या वेळी रावेरवासियांना, दुसऱ्या राज्यांत जावून आपल्या गांवाचे नांव अभिमानाने सांगता येईल असे कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती सत्कारमूर्ती म्हणून मिळाली होती. त्यांच्या सोबतचा तो बंदोबस्त, बरोबर असलेली बडीबडी मंडळी हे सर्व गांववाल्यांना नविनच असणार, याचे स्वाभाविकच अप्रूप वाटणार !
नागपूर ही पूर्वी मध्यभारत या प्रांताची राजधानी होती. या प्रांताचा बराचसा भाग आता मध्यप्रदेशांत आहे, तर काही भाग महाराष्ट्रात आहे. यांचे पूर्वीचे नागपूर येथील उच्चन्यायालय हे आता मुंबई उच्चन्यायालयाचे खंडपीठ आहे. काही घटनांवरून आपण कितीही दूर असलो, तरी गांवची आणि गांवच्या माणसाची आठवण ही माणसाची पाठ सोडत नाही. ना या माणसांना आपण बघीतले असते, ना ही घटना आपल्यासमोर घडलेली असते. आपल्या गांवाची, गांवच्या माणसाची आणि त्याच्या या कर्तृत्वाची आठवण, आपण इतक्या दूरवर गेल्यावर, इतक्या काळानंतर पण का येत असेल बरं ?

३०.७. २०१८

No comments:

Post a Comment