Thursday, December 20, 2018

दिवाळीची सुटी संपली

दिवाळीची सुटी संपली, उद्यापासून न्यायालयात जावं लागणार. आपली नियमीतपणे दिनचर्या सुरू होणार !
सुटी ! आपल्याला मग ती एक दिवसाची का महिन्याची, हा प्रश्न दुय्यम ! ‘सुटी’ हा शब्दच असा आहे, की ऐकल्यावर मनाला बरं वाटतं. अगदी मनातल्या मनांत हसू येतं, समाधान वाटतं. ‘सुटी’ हा शब्द अगदी न कळत्या वयापासून, लहानपणापासून, आपला आवडता असतो, अगदी जसे आपण शाळेत जायला लागतो, तेव्हापासून शब्द आपल्याला आनंद देणारा आहे. आपल्याला तर बऱ्याच वेळा इच्छा नसतांना पण शाळेत जावं लागतं. शाळेत घालतांना, आपल्याला विचारतो कोण ? मुलगा वा मुलगी जरा शाळेत जाण्यासारखा झाला वा झाली, की शाळेत टाकावे, यापेक्षा पण त्याने दोन-चार तास स्वतंत्र, एकटे रहायला शिकले पाहिजे, म्हणून घरचे बालवाडीत टाकायचे. नाहीतर ‘पुढं शाळेत काय बूड टिकणार याचं’, हा मुख्य प्रश्न असायचा घरच्यांपुढे ! माझ्यावेळी या ‘बूड टेकवायची सवय करायच्या जागेला’ बालवाडी म्हणायचे ! आता काही ‘किंडर गार्डन’ का ‘प्ले गृप’ असे काहीसे म्हणतात, मात्र अर्थ तोच ! पुढे शाळेत बसतां यांवे म्हणून केलेली पायाभरणी !
मला, मी काहीतरी ३-४ वर्षांचा झाला असेल, तोच बालवाडीत घातल्याचे, आई सांगते. माझी बालवाडी म्हणजे काय, तर गल्ली पलिकडे असलेले, बावीशे गल्लीतले ‘बालाजी मंदीर’ ! तिथं शिक्षिका म्हणून अंबूबाई होत्या. नऊवारी पातळ, डोक्यावर अंबाडा, दांत मात्र पुढे होते त्यांचे ! त्या शिकवायच्या आम्हाला. आता इतर सर्व म्हणतात, म्हणून मी म्हणतो, की त्या शिकवायच्या ! कारण बालवाडीच्या मुलांना काय शिकवणार ? आम्हाला घरीच असल्यासारखे वाटायचे. कारण तिथं वेगवेगळ्या खेळांचेच प्रकार असायचे. मण्यांच्या पाट्या, रंगीत ठोकळे आणि रॅक मला आठवतात. लोखंडी तारेत ओवलेले रंगीत लाकडी मणी, त्या छोट्या रॅकमधे एकाखाली एक अशा आठदहा तारांत ओवलेले असायचे. प्रत्येकांत दहादहा मणी असायचे. ते इकडून त्या बाजूला न्यायचे व पुन्हा उलटे करायचे. खेळ होता, व समजल्यानंतर अंक ओळख होती. ते रंगीत ठोकळे एकावर एक ठेवायचे. ही सर्व पण सर्वांना पुरेल इतकी नसायची ! मुख्य भर असायचा तो गाणे म्हणवून घेणे, गोष्टी ऐकवणे, विना साहित्याचे खेळ खेळायला लावणे यांवर ! मला रोज बालवाडीत घेऊन जायचे आणि घरी परत आणायचे, ते कै. नारायण वाणी ! काळसर वर्ण, उभट चेहऱ्यावरील सरळ धरधरीत पण बारीक नेमके नाक, डोक्यावर काळी टोपी, अंगात पांढरा सदरा आणि धोतर ! सदऱ्याच्या खिशाला पेन असायचे व खिशात चष्मा ! मुलांना रोज प्रेमाने व काळजीने बालवाडीत नेणे आणि आणणे, सोपं नाही. आम्ही मुलं त्यांना नारायणकाका म्हणायचो ! त्यांच्यापेक्षा लहान मंडळी नारायणशेट म्हणायची, तर मोठी मंडळी नारायण म्हणायची. आपल्यापेक्षा वडील असले की भाऊ, दादा, काका, मामा किंवा ताई, काकू, मावशी, आत्या म्हटलं पाहीजे, हे त्यावेळी आपल्याला घरातीलच नाही, तर रस्त्यावरचा कोणीही कान पकडून शिकवू शके. बिना पैशाची व आपुलकी निर्माण करणारी, ही संबोधने, अलिकडे वापरली, तर आपल्याला ‘गावंढळ’ म्हणून ओळखले जाते.
नारायणकाका हे बऱ्याच वेळा मला कै. रामचंद्रशेट वाणी किंवा कै. सीतारामभाऊ वाणी यांच्या ओट्यावर किंवा बैठकीत बसलेले दिसायचे. यांची घरे आमच्या गल्लीच्या तोंडाशी, तर माझी बालवाडी म्हणजे ‘बालाजी मंदीर’ पलिकडच्या गल्लीत ! तिथं जायला वेळ तो काय लागणार ? आमच्या गांवातील वाणी समाजाच्या या मंदीराने, म्हणजे बालाजी मंदीराने आणि अग्रवाल समाजाच्या लक्ष्मीनारायण मंदीराने, सर्व समाजातील बालकांच्या शिक्षणाची पायाभरणी आपल्या मंदीरात केली, भगवान बालाजी आणि लक्ष्मीनारायण यांच्या समक्ष ! समाजाची एकी टिकावी व वृद्धींगत व्हावी यासाठी, सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव जोरात साजरे व्हावे, म्हणून संपूर्ण गांवासाठी आपले बाहू पसरले, तर ‘समस्त ब्रह्मवृंदाने’ रामस्वामी मठाच्या रूपात ! माझ्यानंतर माझ्या मुलांची पण शिक्षणाची सुरूवात या मंदीरातूनच झाली.
बहुतेक गांवात शाळांना स्वतंत्र इमारती नसायच्या. गांवातील अशी कोणी मंडळी मग गांवातील मुलांना शिकण्यासाठी मग अशी जागा उपलब्ध करून द्यायची ! वातावरण चांगलं असायचं, मूर्तीपूजा न मानणाऱ्या घरातील, समाजातील ही बालकं श्रद्धेने बालाजीला, लक्ष्मीनारायणाला नमस्कार करायची आणि प्रार्थना म्हणून मगच वर्गात बसायची. त्यांची माझी अजूनही ओळख आहे. देवाला नमस्कार केल्याने, देवाची प्रार्थना केल्याने, त्यांचे काही भयंकर नुकसान झाल्याचे किंवा देवाधर्माला प्रचंड शिवीगाळ केल्याने, प्रचंड फायदा वा लाभ झाला, असे मला आजवर कोणी सांगीतले नाही; तर उलट ‘त्यावेळी आपल्याला जे मंदीरातल्या शाळेत शिकायला मिळाले, ते आपल्या मुलांना या झकपक भल्यामोठ्या इमारतीत पण शिकायला मिळत नाही’ ही खंत ते कधीतरी भेटल्यावर अवश्य व्यक्त करतात. चांगले शिक्षण मिळायला, केवळ मोठी इमारत लागत नाही, त्यांतील चकचकीत फर्निचर वा दिव्यांचा झगमगाट लागत नाही; तर त्याला लागते, शाळा म्हणून जीव ओतणारे शिक्षक ! इमारती या तर मृत असतात, दगडधोंड्यांच्या, विटामातीच्या बनलेल्या असतात. त्यांत जीव ओतण्याचे काम, आपल्या संजीवनी मंत्राच्या सामर्थ्याने ही आधुनिक शुक्राचार्य असलेली शिक्षक मंडळी करतात, आणि त्यांना ‘शाळा’ बनवून जिवंत करतात. सरस्वतीचे मंदीर करतात.
दिवाळी, उन्हाळ्याची सुटी तर सर्व शाळेला असतेच. आम्हाला हायस्कूलला त्यावेळी नाताळची सुटी पण असायची. दिवाळीची सुटी २२ दिवस, नाताळची सुटी ११ दिवस असायची. उन्हाळ्याची सुटी मात्र साधारणत: ३० एप्रिलला शाळेच्या वार्षिक परिक्षेचा निकाल लागला की १२ जूनपर्यंत असायची. आमची दिवाळीची सुटी तर तशी बरी जायची. त्यात पण शिक्षकांनी घरी सुटीतील अभ्यास दिलेला असे, पण तो आम्ही फारसा मनावर घेत नसे आणि आमचे शिक्षक पण त्याच्या फारसे मागे लागत नसत. मात्र नाताळच्या सुटीवर सर्वच शिक्षकांचा फार डोळा असे. सरदार जी. जी. हायस्कूलला असतांना शाळेचा शिपाई हरिभाऊ सुटीची नोटीस घेवून येई. त्याचवेळी बहुतेक वेळा नेमका, तिवारी सरांचा तास असे. हरिभाऊने आणलेली नोटीस वाचली जाई. आता ११ दिवस सुटी म्हटल्यावर, आम्हा सर्वांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ‘हॅऽऽऽहॅऽऽऽ’ असा आवाज निघे आणि बाक, दप्तर किंवा पुस्तके आपटले जात. त्यांवर तिवारी सरांचे ठरलेले असे, ‘नोटीस पूर्ण वाचून झाली नाही. पुढे ऐका-‘ असे म्हणत आणि मग तोंडी सांगत - ‘संपूर्ण सुटीत ८ ते १ पर्यंत तुम्ही शाळेत रोज यायचे आहे. त्यावेळी माझा इतिहासाचा तास, दीक्षितसरांचा गणित, बोरोले सरांचा सायन्स, डेरेकर सरांचा संस्कृत वगैरे — होईल.’ असे करत शाळा परवडली पण सुटी नको, असे होवून जाई. मुलांचा कितीही वेळ अभ्यास घेतला, शाळेव्यतिरिक्त घेतला, सुटीत घेतला तरी पगार तेवढाच मिळणार आहे, हे माहीत असतांना देखील, हक्काच्या सुटीत त्याचे कोणतेही खाजगी कार्यक्रम न आखता, आम्हाला तुटपुंज्या पगारावर शिकवणारे हे शिक्षक आम्ही बघीतले आहेत, अनुभवले आहेत. आता शालेय अभ्यास शाळेत शिकवत नाही म्हणून खाजगी कोचिंग क्लास लावावा लागतो. पूर्ण अभ्यासक्रम न शिकवता पण ‘अभ्यासक्रम संपला’ हे जाहीर करणारे शिक्षक आहेत म्हटल्यावर, ‘आपण रहातो तरी कुठं ?’ असं वाटायला लागतं. सुटीचा उपभोग घेवू न देणाऱ्या शिक्षकांनी ही लहानपणापासूनच कठोर परिश्रमाची सवय लावली आहे, ती आयुष्यातून कशी जाणार ?
कोर्टाला जेव्हा सुटी लागते, त्यावेळी ही लहानपणीच लागलेली सवय कामास येते. नेहेमीच्या वेळीच पहाटे उठायचे आणि प्रलंबीत असलेले काम नियमीतपणे व कटाक्षाने दिवसभर करायचे, हे ठरलेले असते. मग कामाची थप्पी कमी व्हायला लागते. काही कामांना निवांतपणा लागणार असतो, ती कामं थोड्याफार प्रमाणात मार्गी लागतात. एरवी नेहमी कोर्टात कामाच्या वेळी तरी, आपले काम येईपर्यत वाट बघावी लागते. वाट बघत थांबणे, ही शिक्षा वाटते. तो वेळ आपल्या कोणाच्याच उपयोगात येत नाही. सुटीत मात्र प्रत्येक क्षण तुम्हाला उपयोगात आणता येतो, कामी लावता येतो. याचा उपयोग कोर्ट सुरू झाल्यावर दिसतो. बौद्धीक काम हे यंत्रवत करता येत नाही. त्याला विश्रांती, कामात बदल हा हवाच असतो, तरच कार्यक्षमता टिकते व उत्साहाने काम करता येते. मग कुठं वेगळा कार्यक्रम पण ठरवता येतो, सोयीप्रमाणे !
‘कोर्टाच्या सुट्या कमी करा’, ‘एवढ्या सुट्यांची काही आवश्यकता नाही’ वगैरे बऱ्याच वेळा ऐकू येतं. अगदी बरोबर ! मात्र हे कोणाला लागू असते ? सुटी असल्यावर जे काहीही काम करत नाही, त्यांना ? न्यायालयाची वेळ सुरू होण्यापूर्वी आणि न्यायालयाची वेळ संपल्यानंतर पण जे काम करतंच असतात, त्यांना सुटीचा काय फरक जाणवणार ? सुटीत त्यांचे जास्त, भरीव व मौल्यवान काम होते, एरवी ते गर्दीगोंधळात जमत नाही. सुट्या कोणासाठी हव्यात किंवा नकोत ? जी मंडळी कामाच्या वेळेत पण कधी ठिकाणावर नसतात, त्यांना कामाची वेळ संपल्यावर ‘वेळ संपली’ किंवा ‘सुटी आहे’ हे मोठ्याने सांगता येते; एकवी ते ‘नंतर पाहू’, ‘बघतो’ वगैरे शब्दाने सांगतात.
—- असो. आता सुटी संपली. कामाला लागायचंय, उद्यापासून !

१८. ११. २०१८

No comments:

Post a Comment