Thursday, December 20, 2018

मला एक जुनी आठवण आली. जळगांवच्या ‘लोकहितवादी मंडळ’ या संस्थेची !
मी महाविद्यालयांत असतांनाचा काळ, सन १९७८-८५ पावेतो. जळगांवला काही मंडळी ‘लोकहितवादी मंडळ’ हे व्याख्यानमाला आणि ‘राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा’ आयोजित करत, अत्यंत समर्थपणे ! व्यवस्थापन अतिशय नीटनेटके ! या ‘लोकहितवादी मंडळात’ कै. श्रीकृष्ण जळूकर, श्री. गजाननराव पन्नालाल जोशी, ॲड. वसंतराव वाणी ही मंडळी माझ्या परिचयाची ! त्यांत फारसा परिचय नसलेले पण सर्वांना माहिती असलेले गोडबोले टेलर, ‘गोरसधाम’ ही जळगांवातील प्रसिद्ध खानावळ चालवणारे श्री. वाणी हे पण होते. यांच्या व्याख्यानाला मी जळगांवी असलो तर नक्की जायचो.
त्या राज्यस्तरीय महाविदयालयीन वादविवाद स्पर्धेत पण मी महाविद्यालयांत असतांना भाग घेतला, बक्षीसही मिळाले. त्यानंतर वकिल झालो. माझे व्यवसायातील वरिष्ठ ॲड. वसंतराव वाणी हे आमच्या गांवचे, रावेरचे ! यांच्या आग्रहाखातर त्या स्पर्धेचे परिक्षक म्हणून पण काम बघीतले. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभाध्यक्ष श्री. अरूणभाई गुजराथी होते. त्यावेळी कै. श्रीकृष्ण जळूकर यांनी परिक्षकांचा परिचय करून देतांना, ‘एकेकाळचे बक्षीसपात्र स्पर्धक म्हणून येथे आलेले आज परिक्षक आहेत.’ ऐकतांना बरं वाटलं !
ही मंडळी व्याख्यानमाला आयोजित करत, त्यांत खूप छान वक्ते बोलावत. एकदा गंगाधर गाडगीळ यांना बोलावले होते. विषय भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी होता. गंगाधर गाडगीळ हे जसे ख्यातनाम लेखक होते, विनोदी साहित्य त्यांनी लिहीले होते. नवकथेचे स्वरूप बदलविणारे कथाकार होते, तसेच ते नामवंत अर्थतज्ञ देखील होते. बऱ्याच जणांना त्यांची ही ओळख म्हणावी तितकी नाही.
त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरूवातच छान केली.
माझा तसा देवावर विश्वास नाही, कारण मी अजून देखील देवाला बघीतले नाही. माझी देवाला बघण्याची इच्छा पण नाही. वाटेल त्या इच्छा काहीवेळा आत्मघाती असतांत. देवाच्या घरी गेले की गेलेला पुन्हा परत येत नाही, हे लहानपणीच माहिती आहे. मी त्यामुळे तो खरंच आहे की नाही, याची खात्री करायला देवाकडे जाणार पण नाही. तरी देखील मला वाटते की जगांत देव आहे, निदान भारतात तर नक्कीच आहे. कारण अर्थशास्त्राच्या नियमाच्या बहुतांश विपरीत गोष्टी असतांना, सरकारचे अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने चमत्कारिक धोरण असतांना, प्रगतीच्या व विकासाच्या विरूद्ध असे अर्थशास्त्रदृष्ट्या निर्णय घेतले जात असतांना देखील भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करत आहे, हे देव असल्याशिवाय शक्यच नाही ! अजून काय पुरावा हवा, देव असल्याचा ?
श्रोत्यांमधून जबरदस्त दाद मिळाली नसती तरच नवल !
(Ramesh Zawar यांच्या दुसरीकडील एका प्रतिक्रियेने हे आठवले)

१४. ७. २०१८

No comments:

Post a Comment