Thursday, December 20, 2018

आपल्याला कधीतरी दोन-चार महिन्यांत बाहेरगांवी जावंच लागतं. नेमक्या तिथल्या साड्या प्रसिद्ध आहेत, असं वारं उठते. काय गंमत असते, कुठं पण बाहेरगांवी असो, पण बाहेरगांवी नेमके साड्यांचेच मार्केट कसे काय चांगले असतं, देव जाणे !
‘तुमची पुस्तके काय, कुठेही सारखीच असतात. कुठूनही बोलवली तरी काय फरक पडणार आहे. साड्यांचे तसं नसतं. प्रत्येक ठिकाणचं वेगळं वैशिष्टय असतं.’
अजब तर्कशास्त्र ! असो. तरी पण ‘साड्यांसाठी प्रसिद्ध’ आहे, यांवर विश्वास ठेवून तिथून साड्या आणाव्यात ! आणल्यावर सर्व आवडलेल्या असतात, पण असं सांगायचे नसते.
‘आता आणल्याच आहे, तर राहू द्या ! परत कशा करणार ?’
‘मी विचारून घेतले आहे. आठ दिवसांत पाठवा, लगेच फोन करा.’ संभाव्य धोका लक्षात घेता, साड्या परत करण्याचा निर्णय घेणे शक्य नसते.
‘जाऊ द्या ! आता पाडव्याला आणायला नको.’ एक मधाचे बोट पाडव्यापर्यंत पुरणार असते. दिवाळी येते.
‘यंदा पाडव्याला काही नाहीये नं ?’ यांवर आपण काहीही बोलू नये. पाडवा उजाडतो. मोर्चेबांधणी मुलांना घेवून पक्की झाली असते. नेहेमीच्या साडीच्या किमतीच्या निदान चारपाच पट किंमतीची वस्तू ‘माझ्यासाठी नको, सर्वांसाठी म्हणून घेतेय’ असे म्हणून ‘नाईलाजाने’ घेतली जाते.
तात्पर्य - पाडव्याला काही नको, म्हटल्यावर गाफील राहू नये, तर जास्त खर्चाची तयारी ठेवावी.
(कसलीही फी न घेता दिलेला मोफत पण मौल्यवान सल्ला)

१४. ११. २०१८

No comments:

Post a Comment