Thursday, December 20, 2018

१ ऑगस्ट !

१ ऑगस्ट !
हा दिवस तर मला नेहमीच आठवतो. अगदी शालेय वयापासून, सकाळीच गणवेश घालून जास्तच उत्साहाने शाळेत जाणे होई, कारण या दिवशी अभ्यासाची काळजी नसे. या दिवशी आम्ही आवर्जून ऐकलेली आहेत, ती आमच्या तत्कालीन शिक्षकांची भाषणे ! भाषणे असायची ती 'भारतीय असंतोषाचे जनक' या नांवाने ओळखले जाणाऱ्या एका 'तेला तांबोळ्याच्या पुढाऱ्यावरची' ! मात्र शिक्षकांच्या भाषणांपूर्वी, आम्हाला ऐकावी लागायची, ती माझासारख्याच माझ्या छोट्यामोठ्या मित्रांची भाषणे ! कोणी बोलताबोलता विसरून जायचे, आणि मग हसायचे नाही अशी ताकीद असली तरी हसू यायचेच. आमच्यासारखी मुले भाषण करायची म्हणजे काय, त्या गोष्टीच असायच्या. मग त्यांत काय नसायचे - 'शेंगाच्या टरफलाची गोष्ट' तर नक्कीच असायची, 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच' हे वाक्य असायचे. 'मंडालेच्या तुरुंगातील सहा वर्षाच्या शिक्षेच्या काळात त्यांनी आपल्या असामान्य बुद्धीने लिहीलेला 'गीतारहस्य अर्थात कर्मयोगशास्त्र' या ग्रंथसंबंधाने गोष्ट असायची ! आमच्या संस्कृतीबद्दल, अगदी अनादी काळापासून चालत आलेल्या या आमच्या चिरंतन तत्वज्ञानावरील, भगवान श्रीकृष्ण आणि क्षत्रियोत्तम अर्जुन यांच्यातील प्रत्यक्ष युद्धप्रसंग उद्भवला असतांनाचे संवाद, जे अगदी सुलभतेने सांगीतलेल्या 'भगवद्गीता' या असामान्य ग्रंथाच्या रूपाने आपल्यात आहेत, हे पण सांगणे असायचे.
थोडे मोठे झाल्यावर यांच्या वेगळ्या गोष्टी वाचायला आणि ऐकायला मिळाल्या त्यांत - सार्वकालीन आणि सार्वत्रिक पत्रकारांना, विशेषतः अन्याकारक आणि परकीय राज्यकर्त्याच्या काळात,पत्रकारांनी कसे वागावे, हे या पत्रकार म्हणून 'केसरी'सारखे काम केलेल्या पत्रकाराकडे पाहून त्यांचे आदर्श घेण्यासारखे आहेत. या 'नरशार्दूलने' केलेल्या तत्कालीन सरकारविरुद्धच्या 'केसरी'गर्जनेची कथा ऐकू यायची ती - 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' या नांवाने आणि तसेच सरकारला शाब्दीक चाबकाच्या फटक्याने फटकावून काढत 'राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे' ही पण गोष्ट असायची !
त्यांनी आपल्याला राजद्रोह आरोपाखाली सरकारने पकडल्यावर, कैद्याने कसे वागावे हे पण दाखवून दिले. कैद्याचेच वर्तन हे न्यायमूर्तीपेक्षा लक्षांत रहाते. तत्कालीन न्यायमूर्ती डावर यांनी राजद्रोह या गुन्ह्याखाली दिलेल्या सहा वर्षाच्या तुरुंगवासाची आणि १,०००/- रुपये दंडाच्या शिक्षेवर आपल्याला काही सांगायचे आहे का हे 'या आरोपीला' विचारल्यावर -
All that I wish to say is that, in spite of the verdict of the jury, I still maintain that I am innocent. There are higher powers that rule the destinies of men and nations; and I think, it may be the will of Providence that the cause I represent may be benefited more by my suffering than by my pen and tongue.
न्यायमूर्ती पण सुन्न झाले असतील नाही ? ही अशी माणसे कशाने बनली असतील हो ? कुठे बनतात ही अशी माणसे ? कुठल्या मातीने बनली असतील हो ही माणसं ? आपल्या भारतातल्याच मातीची आहेत, हे आपले भाग्य ! आता अलीकडे, अगदी दूरदूर नजर लावली तरी दिसतच नाही, ही अशी माणसं.
काय बदललं आहे आणि कोण बदललं आहे, कोणास ठावूक ? आपणच आपल्यामध्ये डोकावून पहाण्याची गरज आहे आता. आता तर नवनवीन धोरण बनविले जात आहे ते पूर्वींच्या आपल्या आणि आपल्यासारख्यांच्या 'संबोधनांवर' ! त्यामुळे अलीकडे आम्ही तुम्हाला 'लोकमान्य' या नांवाने संबोधण्याऐवजी वेगळ्याच कुचेष्टादर्शक नांवाने संबोधतो आहे, हे अर्थांत सध्या बऱ्याच प्रमाणांत चोरूनलपून आहे, पण आहे; पुढचे काही सांगता येत नाही. तुमच्या गाजलेल्या पगडीचे आम्हाला आता फारसे अप्रूप वाटेनासे झालेलं आहे, ती पण आता आमच्यासाठी टाकावू झालेली आहे. आपले तन-मन-धन आणि सर्वस्व फक्त केवळ आपल्याच ज्ञातीबांधवांसाठी अथवा नातेवाईकांसाठी नाही, तर समाजातील सर्व लहानथोर, अठरापगड जातीतील लोकांसाठी अर्पण करून कष्टांत, हालअपेष्टांत, तुरुंगवासांत दिवस काढावे लागणारे तुम्ही कसले हो नेते ? असे कष्टांत जगावे लागल्यावर पण न डगमगता, तेच कार्य सदोदीत पुढे नेणारे तुम्ही कसले हो 'तेल्यातांबोळ्याचे पुढारी' ? जरा आमच्याकडे आणि आमच्या भावकीकडे पहा, आमच्या अलीकडच्या पुढाऱ्यांकडे पहा ! कसे भराभर प्रगती करतात. त्यासाठीचे नियम आता बदललेले आहेत, आता 'समाजरूपी थंड असलेल्या गोळ्याला आपल्या समाजहितकारक ऊर्जेची उब द्यावी लागत नाही, तर इतरांच्या द्वेषाचे चटके द्यावे लागतात. समाजांत जाळपोळ करावी लागते. समाजांत आपली आणि आपल्या कृत्याची दहशत पसरवावी लागते. क्षणांत एक भूमिका घेतली तर दुसऱ्या क्षणाला त्याच्या विरुद्ध भूमिका घ्यावी लागते, आणि त्याचे समर्थन देखील करावे लागते, त्याला तुम्ही भलेही निर्लज्जपणा म्हणा, पण तुम्हाला विचारतो कोण ? हे सर्व केले, तर आणि तेंव्हाच पुढारी होता येते, कोणाचे पुढारी होता येते, ते विचारू नका, पण पुढारी होता येते.
आज पण १ ऑगस्ट आहे. तुम्ही आम्हाला कायमचे सोडून गेले तो दिवस, १ आॅगस्ट १९२० ! ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक', आज पण मला तुमची आठवण येते ती माझ्या लहानपणाचीच ! काय करू हो, तुमची आणि तुमच्या सारख्यांची चरित्रे आम्हाला आमच्या लहानपणी, जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेंत आणि नंतर पण आमच्या 'गुरव गुरुजींनी, बोरोले गुरुजींनी, पठाण गुरुजींनी, डेरेकर बाईंनी, तिवारी सरांनी वानखेडे सरांनी, कुलकर्णी सरांनी, पाटील सरांनी आणि असंख्य शिक्षकांनी अशी काही शिकविली आहेत, की आजच्या या 'नवीन पुढाऱ्यांचे' हे शिकवणे आमच्या कानातच जात नाही, मनापर्यंत जायची तर गोष्टच सोडा. मला माहीत आहे, माझ्यासारखे तुमच्यासारख्याच शिक्षकांनी शिकविलेले असंख्य विद्यार्थी अजून या समाजांत आहेत, या भारतभूमीत आहेत. ही भूमी अजून उजाड, वैराण, नि:सत्व झालेली नाही आणि तुम्ही शिकविलेले पण इतके तकलादू नव्हते की यांच्यासारख्यांच्या हवेने उडून जाईल. तरी पण माझ्या सारख्याला उगाचच वाटते की आमच्यासारख्यांना अजून पक्के करायला आणि या भडकलेल्या, भटकलेल्या आमच्या भावांना नीट वाटेवर आणण्यासाठी 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक', पुन्हा एकदा आमच्यांत या, या भरतभूमीत, जन्म घ्या ! आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दाखवा, योग्य दिशा दाखवा. माझासारखा, तुमच्या कार्याच्या मानाने अति क्षुद्र असलेला, यापेक्षा परमेश्वराजवळ या समाजासाठी मागणार ते काय ? आणि नाही म्हटले तरी तुमचेच 'गीतारहस्य' भगवान श्रीकृष्णाचे अर्जुनाला भगवंताने दिलेले वचन सांगते ना -
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
मला कल्पना आहे, तुम्ही मला सांगणार, 'अर्धवट आणि एखादा श्लोक घेऊ नको, त्यावरून काहीतरी भलतासलता निष्कर्ष काढू नको, सर्व श्लोकांचे साकल्याने वाचन आणि मनन कर. कारण नंतर हे पण आहे -
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् | आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ||
भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेल्या भगवद्गीतेतील, अंध धृतराष्ट्राला सांगीतलेल्या डोळस संजयच्या तोंडच्या श्लोक तर सर्वांना ज्ञात आहे. आपल्यालाच श्रीकृष्ण व्हावे लागेल आणि अर्जुन देखील व्हावे लागेल, तेंव्हा म्हणता येईल -
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।

१. ८. २०१८

No comments:

Post a Comment