Sunday, October 20, 2019

नांव माहित नसलेला सिनेमा !

नांव माहित नसलेला सिनेमा !
मी आणि बहुतेक माझे मित्र काही निमित्ताने बुरहानपुरला गेलो होतो. त्या दिवशी मुक्काम करावा लागणार होता. त्याला सिनेमाची बऱ्यापैकी आवड ! तिथं कुठली तरी सिनेमा टाॅकीज होती, त्या मोठ्या मशिदीजवळ ! संध्याकाळी सहा वाजले होते. बाहेर पाटी बघीतली तर ‘चोरी चोरी’ ! विचार केला, हा बघायला हवा. राजकपूर, नर्गिस ! शंकर-जयकिशन ! लता मंगेशकर, मन्ना डे ! आजा सनम, रसिक बलमा वगैरे डोळ्यांसमोर यायला लागले. घाईघाईने तिकीटे काढलीत आणि आंतमधे गेलो. तसा थोडा उशीरच झाल्याने, सर्वत्र अंधार ! गर्दी ‘चोरी चोरी’ असल्यावर पण कमी होती. तरी आम्हाला काही शंका आली नाही. ‘अलिकडे चांगल्या सिनेमांची लोकांना किंमत नाही’, हा सोयीस्कर निष्कर्ष काढून आम्ही, पडद्याकडे बघू लागलो.
पहिले ट्रेलर सुरू झाले. ते संपले, अन् दुसरे सुरू झाले. दुसरे संपले, अन् तिसरे सुरू झाले. मग डाक्युमेंटरी ! हा सिनेमा केव्हा सुरू होतोय ? आमची चळवळ सुरू झाली. मग एकदाचे ते सर्टिफिकेट दिसले. म्हटलं, चला सुरू झाला ‘चोरी चोरी’ एकदाचा ! मात्र त्या सर्टिफिकेटवरील नांव घाईगडबडीत वाचले नाही.
सुरू झाल्यानंतर काही वेळ गाफीलपणांत गेला, मग डोक्यात गोंधळ झाला. हा सिनेमा रंगीत कसा काय ? का पुन्हा हे पण नवीन काही ट्रेलर आहे, हे समजेना ! पण तिकीटे काढली होती, त्यामुळे पहाणे भाग होते. मधेच एक भयंकर सीन आला. धोबीघाटावर धोबी जसे दोन तिवणींना दोरी बांधून त्यांवर कपडे वाळत टाकतो, किंवा डोंबारी ज्या दोन बाजूला बांधलेल्या दोरींच्या टोकावरून चालतो, तशा दोन तिवणीला दोन बोकड उलटे टांगलेले ! हे काही तरीच भयानक ! शेवटी मनाची तयारी केली, संत महात्म्यांचे वचन आठवले - तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे । आता सिनेमा अर्धवट सोडून जाण्याव्यतिरिक्त आमच्याजवळ दुसरे करण्यासारखे काहीही नव्हते. बराच वेळ असे विविध सीन येत राहिले आणि अलिप्त मनाने आम्ही पहात राहीलो. सिनेमा संपला. चडफडाट करत आम्ही बाहेर आलो.
आम्ही बघीतलेला सिनेमा ‘चोरी चोरी’ नव्हता, हे नक्की झालं होतं, पण असा कोणता सिनेमा होता, की त्याचे नांव पण समजले नाही, हे तरी बाहेरची पाटी पाहून समजेल या भावनेने, बाहेर बघीतले, तर तो शेवटचा शो असल्याने, त्या सिनेमाची पाटी पण काढलेली होती. तिथल्या माणसाला सिनेमाचे नांव विचारले, तर त्याने ‘चोरी चोरी’ है कलसे’ हे सांगतले. आजचा कोणता होता, हे विचारले तर त्याला पण सांगता आले नाही. अशा तऱ्हेने ‘चोरी चोरी’ या नांवाने भलताच कोणता तरी सिनेमा बघीतला.
कोणाचं काही लिहीलेले वाचले, की त्यामुळे काय परिणाम होतील आणि काय चमत्कारिक आठवेल, काही सांगता येत नाही. आताच आमचे मित्र श्री. जयंत विद्वांस (Jayant Vidwans) यांची पोस्ट वाचली. ‘शोले’चे तिकीट काढावे आणि ‘रामगढ के शोले’ निघावं तसं झालं ! आमची तर त्यापेक्षा पण अवघड अवस्था झाली होती.

3.9.2019

No comments:

Post a Comment