Sunday, October 20, 2019

शाळेत असतांना उन्हाळ्याची सुटी लागली

शाळेत असतांना उन्हाळ्याची सुटी लागली, की अंगणात रात्री झोपण्याचा एक आनंद असायचा. त्यासाठी पहिली तयारी, म्हणजे जरा उन्हं कलली, की आडाचे पाणी ओढून अंगणात शिंपावे लागायचे, म्हणजे दुपारी तापलेली जमीन जरा थंड व्हायची. त्यावेळी आजच्या इतके उन्ह जरी, तापत नसले, तरी तो शेवटी ‘उन्हाळाच’ काही असलं तरी !
मात्र अंगणात पाणी टाकतांना, नीट प्रमाणात टाकावे लागे, सर्वत्र हलक्या हाताने शिंपडावे लागे, अन्यथा रात्रीपर्यंत अंगण वाळले नाही, जरा जास्त ओल राहिली, तर रात्री त्यांवर अंथरूण टाकल्याने, ते दमट व्हायचे, व बोलणी बसायची. अहो, उन्हाळयात आमची अंथरूणे म्हणजे काय असणार ? फक्त सतरंज्या, आणि अंगणातील खडे पाठीला टोचू नये, म्हणून त्यांवर मऊसर अशा गोधड्या ! पांघरूण नाहीच ! लहान मुलांना उशा पण नाहीत, तरी गाढ झोप लागायची.
अंगणात आपण जेवणापूर्वी अंथरूण टाकले, की आपले जेवण आटोपून झोपायची वेळ येईपर्यत, ते मस्त गार झाले असायचे. त्या अंथरूणावरचा अस्पर्श गारवा, शरीरातील सर्व उष्णता व थकवा नाहीसा करायचा. आपल्या शरीराला जास्तीत जास्त गारवा मिळावा, म्हणून या कुशीवरून, त्या कुशीवर निष्कारणच लवंडायचे ! मग निवांत होत, आकाशाकडे नजर लावत पडले, की आपली टक्क नजर, आपोआपच जायची, तिथं रेंगाळायची आणि नंतर रमायची. मग ते दूरवर दिसणारे, आकाशातील काजव्यासारख्या चमचमणारे तारे, असंख्य टिमटिमत व लुकलुकत तेवणाऱ्या चांदण्या ! मला ओळखता येणाऱे म्हणजे धृवतारा आणि सप्तऋषी ! धृवताऱ्याचे ठिकाण कसे काढायचे, ते अनुभवाने समजायला लागले होते. गुरू आणि शुक्राची चांदणी मला ओळखता यायची. अजून आम्हा सर्व मुलांची बघण्याची धडपड चालायची, ती ‘अरुंधतीची चांदणी’ बघण्याची ! कोणत्याही डाॅक्टरकडे न जाता, आपली दृष्टी चांगली आहे, किंवा नाही हे समजण्याचा सोपा उपाय आहे. नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला ती चांदणी दिसत असेल, तर तुमची दृष्टी चांगली आहे, हा पारंपरिक चालत आलेला, ठोकताळा आम्हाला पण माहीती झाला होता. ‘सप्तऋषींमधे सती बैसलीसे अरूंधती’ हे आजी, आई म्हणत असलेल्या गीतातील एवढीच आठवणारी ओळ म्हणत आम्ही अरूंधतीची चांदणी शोधायचो.
उन्हाळयात पडल्यापडल्या आता गमतीदार वाटणाऱ्या, पण त्यावेळी उत्सुकता असणाऱ्या गोष्टी ऐकू यायच्या. गांवाच्या मध्यभागी घर असल्याने, लग्नाच्या मिरवणुका आमच्या घराजवळूनच जाणार ! बॅंडवाल्याची गाणे ऐकू येत. त्या बॅंडच्यामध्ये उभा राहून ‘काळी पिंगाणी’ तथा ‘क्लॅरिओनेट’ वाजविणारा त्यांचा मुखिया, मिरवणुकीत कसा जात असेल, हे आम्ही पडल्यापडल्या अंदाज करत असू. दारावरून वरात गेली, आणि जर लग्न जवळपास असेल, तर मग नंतर लाउडस्पिकरवरून मंगलाष्टका ऐकू यायच्या, आणि शुभ लग्न सावधान ऐकू यायचे. लग्न लागल्याबरोबर, सर्वात पहिले, लाउडस्पिकरवरून जर कोणती सूचना ऐकायला येत असेल, तर ‘मंडळींनी जेवल्याशिवाय जाऊ नये. ही विनंती.’ नंतर नवरानवरींना आहेर देण्याची झुंबड ! अमूकअमूक याच्याकडून पन्नास पैसे ! अमूक यांचेकडून ‘दोन रूपये’ ! ***यांचेकडून बारा आणे ! यांच्याकडून साडीचोळी ! त्यांना आहेर मिळत असायचा, आणि आम्ही हिशोब करत असायचो. आहेर देणाऱ्यांत काही नांवे ओळखीची निघताय का, याची पण काळजी असायची. याचा विचार व हिशोबाचे विचार करताकरता केव्हातरी झोप लागून जायची.
अजून दुसरी गंमत, म्हणजे उन्हाळयात दिवस मोठा असतो. अंधार उशीरा पडतो. आमच्याकडे ‘लक्ष्मी टुरिंग टाॅकीज’ आठवडे बाजाराकडे होती. संध्याकाळी जरा अंधार पडल्यावर, सिनेमाचे सर्व संभाषण गांवभर ऐकू यायचे. पडल्यापडल्या, आता ‘हा असं बोलेल. हे गाणं होईल.’ ही पण भविष्यवाणी सांगता यायची. ‘जय संतोषी माॅं’ हा चित्रपट तर मला वाटते, संपूर्ण गांवाचा पाठ झाला असावा. बरेच दिवस टिकला होता.
संध्याकाळी लग्न समारंभात, हमखास लोकगीते लागायची. लोकगीतांचे, लावण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, यांत क्लॅरिओनेटचा वापर बऱ्यापैकी असतो. क्लॅरिओनेटवर शास्त्रीय संगीतातील विविध राग वाजविणारी, पण आहेत, मात्र कमी ! काही असो, पण क्लॅरिओनेटचा स्वर मला जवळचा वाटतो, तो मला थेट घरी गांवी घेऊन जातो. त्यांमुळे तो आठवणीची वेदना देतो, पण आनंदाच्या काळाची पण आठवण करून देतो, म्हणून तो हवासा पण वाटतो. त्यामुळे क्लॅरिओनेटचा कुठे आवाज ऐकू आला, की मला आठवते, ती गांवची अंगणात पडल्यापडल्या ऐकू येणारी, ही बरीच गाणी ! त्यांत अगदी - ‘नेहमीच राया तुमची घाई’, हे रोशन सातारकर यांनी गायलेले गीत, ते ‘कावळा पिपाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो’ इथपर्यंत !
आता आकाशवाणीवर अशाच लावणी व लोकगीते लागली होती, —- आणि हे आठवलं !

20.10.2019

No comments:

Post a Comment