Sunday, October 20, 2019

न्यायालय व न्यायाधीश - आठवणी आणि अनुभव - १

न्यायालय व न्यायाधीश - आठवणी आणि अनुभव - १
गोष्ट तशी बरीच जुनी ! आपल्याकडे रामजन्मभूमी आंदोलन सुरू होतं त्यावेळची !
साधारणपणे काही वेळा आपल्या पोलीस यंत्रणेचे कुणाला पकडायचे, कोणाला नाही व कोणाला सहकार्य करायचे आणि कोणाला ‘अडकवायचे’ याचे धोरण ‘वरूनच’ ठरले असावं, याची शंका यावी, असं त्यांचे वागणं असतं, इतर वेळी त्यांचे काम व्यवस्थित सुरू असते. यांत कसलेही गुपीत काही नाही, याचा अनुभव कित्येकांना आला असेल.
असे जर काही ‘वरून’ ठरले असेल, त्यानुसार विविध मंडळींच्या मागे काहीतरी शुक्लकाष्ठ लावण्यासाठी योजना आखल्या जातात. मग त्यामधे काही वेळा ‘क्रिमीनल प्रोसीजर कोड’ मधील पण विविध कलमांचा उपयोग केला जातो. त्यातील विशेष असे कलम १०७ ते ११० याखालील केसेस केल्या जातात. याला आपण सर्वसामान्य चॅप्टर केस म्हणून ओळखतो. यानुसार त्यांतील व्यक्तींना, सार्वजनिक शांततेसाठी म्हणून त्यांनी चांगल्या वर्तनाची हमी द्यावी, यासाठी संबंधीत पोलीस हे त्या माणसाची, तहशीलदार यांचेकडे केस करतात. त्यावरील निर्णय संबंधीत तालुक्याचे तहसीलदार घेतात. ते देखील पोलिसांप्रमाणेच प्रशासनाचे भाग असल्याने त्यांची या बाबतीत ‘सरकारी धोरणानुसार’ एकवाक्यता असते आणि बहुतांश आदेश त्यानुसार केले जातात. प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे वेगवेगळ्या विभागांखाली येते. न्यायसंस्था ही स्वायत्त व स्वतंत्र आहे, प्रशासनाचा भाग नाही. रामजन्मभूमी आंदोलनाबद्दलच्या सूचना आणि त्यांत काय करायचे, हे अर्थात ‘वरूनच’ ठरले होते.
मग या चॅप्टर केसमधे अशा पार्श्वभूमीवरील होणारा आदेश, हा प्रत्येकवेळी मग कायद्याला धरूनच असेल, असे नाही; किंबहुना तो नसायचाच ! पण तांत्रिक बाबींमधे वेळ जायला नको, आणि आपली व्यक्ती लवकर मोकळी व्हावी, म्हणून त्यांच्या आदेशाप्रमाणे जामीन देवून वा त्यांच्या आदेशाशी पूर्तता करत आणि तो विषय आम्ही लवकर आटोपता घेत.
घटना, अर्थातच आमच्या गांवची ! त्यावेळी भारतभर सर्वदूर रामजन्मभूमी आंदोलन सुरू होते. यासाठी विविध गांवांतून यासंबंधाने जनजागृती म्हणून, अधिकाऱ्यांच्या परवानगीने मिरवणुका काढल्या जात, कार्यक्रम होत, विशेष सभा घेतल्या जात. याचा परिणाम, मग या मिरवणुकांवर दगडफेक, सभांमधून गोंधळ वगैरे, हे पण ओघाओघाने होई. त्यांतील गोंधळात सहभागी व संबंधीत असलेल्या माणसांवर केसेस केल्या जात.
अशा लक्षात आलेल्या, उपद्रवी व्यक्तीची तक्रार आपण पोलीस स्टेशनला केली, की मग त्यांचा पहिला प्रश्न असे, ‘यांच्या इतक्या लोकांवर केसेस करायच्या, तर मग तुमच्यावर पण केसेस कराव्या लागतील’ या त्यांच्या विधानाशी वस्तुस्थितीचा अपवादानेच संबंध असे. मग यांतून ‘शांतता व सुव्यवस्था’ रहावी म्हणून, कित्येकांवर निष्कारण अशा ‘चॅप्टर केसेस’ भरल्या जात. त्यावेळी पण भरल्या जात होत्या.
त्यावेळी अशीच काही घटना घडली असावी. त्याचा परिणाम बऱ्याच जणांवर ‘चॅप्टर केस’ होण्यात झाला आणि मग हाच विषय घेऊन, सर्वांना सोडवावे म्हणून, माझ्याकडे बरीच मंडळी आली.
‘साहेब, देणे नाही आणि घेणं नाही, एऱ्हीच या इतल्या लोकांवर चॅप्टर केसेस झाल्या. त्याहीले सोडून देतात, अन् आपल्याले पकडतात.’ एक जण संतापाने !
‘यांत नवीन काय आहे ?’ मी.
या विषयासाठी एकासोबत गंमत पहाण्यासाठी गांवातील दोन जण, सोबतीला दोन जण आणि या विषयी जामीन व्हायला तयार असलेले, निदान दोन जण ! थोडक्यात एका केससोबत सहा जण, अशी बरीच गर्दी कोर्ट आवारात झाली. तो दिवस बहुतेक शुक्रवार होता. शुक्रवार हा दिवस आमच्या गांवी बाजारचा दिवस ! मग या दिवशी, खेड्यापाड्यावरील बरीच मंडळी तालुक्याच्या गांवी ‘बाजार पण करू आणि तहशीलदारकडचे काम पण करू’ या हेतूने तिथं आली असत. त्यांनी ही गर्दी बघीतल्यावर आणि त्यात बरीच ओळखीची मंडळी दिसल्याने साहजिकच चौकशी होई.
‘काय झालं भाऊ ? इतली गर्दी कशापायी ? माणसं तर चांगली दिसताय !’ खेड्यावरून तहशीलदार आॅफिसला आलेला एक जण !
‘काही नाही, रामजन्मभूमी अयोध्येला आहे, म्हणून मिरवणूक काढली, तर या चॅप्टर केसेस झाल्या !’ ज्याला जेवढे समजले, त्यानुसार परस्पर कोणाकडून तरी सांगीतलं जाई.
‘च्या बायली, दगडफेक आपल्या मिरवणूकीवर होते, हे तर नेहमीचे; पण रामाचा जन्म अयोध्येला झाला याची मिरवणूक काढली, तर याले चॅप्टरमधे अटकवलं ! हे काहीच्या बाहीच झालं ! डोक्यात फ्यूज उडून, काहीच्याबाही अंधार झालाय !’ त्याला हे काय असावं, हे अजिबात उमजेना.
विषय हा असा, त्यामुळे बेभान चर्चा, सोबत चहापाणी आणि समाजातील पुढारी मंडळी यांचे अंदाज सुरू होते. त्यात तहसीलदार यांनी आदेश केला, ‘प्रत्येकाने चॅप्टर केसमधे दोन जामीन द्यायचे. त्यातील एक जामीन कोणताही चालेल. दुसरा जामीन मात्र वेगळ्या धर्माचा द्यायचा. हिंदूने मुसलमान आणि मुसलमानाने हिंदू ! त्या अशा वातावरणांत, माझ्या पक्षकारांना मुस्लीम जामीन मिळणेच शक्य नव्हते. याचा सरळ अर्थ त्यांना तोपर्यंत बेकायदेशीरपणे डांबून ठेवले जाणार होते.
मी सोडतील म्हणून दुपारपर्यंत वाट बघीतली. सर्व पुढारी मंडळींची धावपळ सुरू होती, पण उपयोग काही होत नव्हता. माझी मंडळी तर रडकुंडीला आली होती. त्यांना काहीच अंदाज येईना !
‘वकीलसाहेब, आम्ही किती वेळ बसणार ? त्यांची लक्षणं आपल्या माणसांना सोडण्याची नाहीत.’ त्यांच्यातील एक जबाबदार व अनुभवी व्यक्ती ! गर्दी वाढतच होती.
तेवढ्यात नायब तहशीलदार मला दिसले, कै. लालचंद यांच्या हाॅटेलकडे चहाला निघाले होते. त्यांना मी थांबवले, व म्हटले -
‘साहेब, मी तुमच्या आॅफिसला या कामात जवळजवळ येत नाही. गावशिवचा प्रश्न आहे. आम्ही गरज नसली, तरी एक जामीन देवू. सर्वांना सोडून द्या. निष्कारण वातावरण खराब होतं.’
‘मी पहातो.’ म्हणत ते निघून गेले. तीन वाजत आले आणि मला संताप यायला लागला.
‘पोस्टातून तार करायला, तीन-चार फाॅर्म घेऊन या.’ मी एकाला सांगीतले. त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. जामीनचे काम सोडून आपले वकील पोस्टाचे तारेचे फाॅर्म मागताय !
‘लवकर आणा ! वेळ कमी आहे.’ मी सांगतल्यावर, ‘आपले वकील बरोबर करतील’ या विश्वासाने, एकाने फटफटी मारली आणि पोस्टातून तारेचे फाॅर्म आणले. मी त्यांवर इंग्रजीत काही मजकूर लिहीला आणि तो नायब तहशीलदार यांना दाखवायला सांगीतले.
‘पोस्टात तार करायला जातोय, जायच्या अगोदर तुम्हाला दाखवायला सांगीतले, आमच्या वकीलसाहेबांनी.’ हे मी एकाला सांगत, 'यापेक्षा जास्त बोलायचे नाही', हे पण सांगीतले. त्याप्रमाणे ते त्याने, जरा जास्तच प्रभावीपणे केले असावे.
त्यानंतर तारेचे कागद पाहून, नायब तहशीलदार हे तहशीलदार यांच्या कॅबीनमधे गेले. थोड्यावेळाने बाहेर आले आणि लगेच जोरात धावपळ सुरू झाली. आमचा माणूस तिथून लगेच पळत माझ्याकडे आला.
‘साहेबाने बोलावले.’ त्यानं सांगीतलं.
‘कोणी ?’ मी.
‘आर एन् टी साहेबांनी !’ तो.
‘एकदम काय झालं ?’ मी.
‘तुम्ही लिहीलेली तार वाचली, अन् ते केबीनमधे गेले. बाहेर आले, तर आपले केसचे सर्व कागद बोलावलेय समोर !’ तो. मी गेलो. थोडी चर्चा झाली.
‘ठीक आहे. आम्ही एक जामीन आता देतो. दुसऱ्या जामीनला मुदत द्या.’ मी
‘चालेल.’ आर एन् टी !
मी माझा कारकून, श्री. पंढरीला त्याप्रमाणे अर्ज लिहायला सांगीतले. वातावरण बदललं होते. कै. लालचंद पाटील यांनी पुन्हा दूध बोलावले आणि चहा ठेवला. गर्दी वाढत होती.
‘दुसऱ्या क्राॅस जामीनची आपल्याला गरज नाही आता, बहुतेक एकाच जामीनवर सुटताय सर्व !’ एकाने अंदाज वर्तवला.
‘त्येच म्हंतोय ! राम अयोध्येत जन्मला, ही मिरवणूक काढली तर आपल्यावर चॅप्टर केस ! अन् पुन्हा क्राॅस जामीन ? फारच झालं ! काय मोगलाई हाय की काय ?’ ज्याला जसं वाटेल ते बोलत होते आणि अंदाज ते लढवीत होते.
शेवटी सर्वांचे दुसऱ्या जामीनसाठी मुदत मिळावी म्हणून अर्ज दिले. ते मंजूर झाले. सर्व एकाच जामीनवर सुटले. त्यावेळी यांवर जिल्हा कोर्टात अपील करावे लागेल, याची सर्वांना कल्पना दिली. सर्वांनी होकार दिला. यांत जेवण नाही खाण नाही, पण संध्याकाळ झाली. नंतर यथावकाश त्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात रिव्हिजन केले. नंतर केव्हातरी, ते सर्व रिव्हिजन चौकशीला लागले. मग सलग तीन दिवस दुपारी फक्त माझेच काम होते. ते सर्व रिव्हिजन पण मंजूर झाले, हा ‘क्राॅस जामीन’ आदेश रद्द केला गेला.
नंतर एकदा केव्हातरी असेच संबंधीत भेटले असता, हा विषय आपोआपच निघाला.
‘काय वकीलसाहेब, तुम्ही त्यावेळी काय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात ‘बेकायदेशीरपणे डांबलेले आहे आणि स्वातंत्र्याचा भंग झाला आहे. शासनाविरूद्ध न्यायालयाने याची नोंद घ्यावी’, म्हणून तार करायला निघाले होते. तो कुठल्याकुठे विषय गेला असता.’ ते संबंधीत !
‘साहेब, आम्हाला सर्व शस्त्रास्त्रे ठेवावी लागतात पक्षकारांसाठी, न्याय मिळण्यासाठी ! —- आणि विशेष वेळेसाठी हे असे ‘ब्रह्मास्त्र’ ! ते कधीच व्यर्थ जात नाही.’ मी म्हणालो अन् मग हसण्यात तो विषय संपला.

18.7.2019

No comments:

Post a Comment