Sunday, October 20, 2019

हेमंत सपकाळे

नूतन मराठा काॅलेजमधले दिवस ! त्यात काॅलेजच्या स्नेहसंमेलनाचे दिवस ! गाणाऱ्या प्रत्येकालाच आपण मोहंमद रफी, मुकेश, किशोरकुमार असल्याची भावना असायची; तर गाणारीला लता, आशा आहोत, ही भावना असायची. या भावी महंमद रफी किंवा आशा, लता वगैरेंना साथ करणाऱ्यांना पण, आपण कोणी भलतेच वाटू लागायचे.
त्यावेळी काॅलेजला गाणी, नृत्य बसवायची तर आमच्या इथं, पेटी वाजवायला, एक नेवे म्हणून होता, कोंगो-बोंगोला जोशी आणि बाऊस्कर म्हणून होते. विशेष म्हणून समुह कथ्थक नृत्य बसविले होते, त्याला या कोंगो-बोंगो सोबतच, मी पण तबला वाजवायचे, असे ठरले. त्यांच्या कोंगो-बोंगोच्या ढणढणामधे माझ्या तबल्याचा आवाज विशेष असा ऐकू येत नसावा, पण मी तबला वाजवत बसलेला आहे, हे दिसायचे. या कार्यक्रमाची प्रॅक्टीस आटोपल्यावर, एक आमच्याच वयाचा विद्यार्थी आला. त्यावेळी प्रॅक्टीस चालायची, ती प्राचार्यांच्या शेजारच्याच खोलीमधे, कडुलिंबाजवळच्या वर्गामधे !
या नवीन आलेल्याचा व माझा परिचय नव्हता. इतर सर्वांचा होता. त्याला आग्रह करायला लागले, पेटी वाजवण्याचा, झालं ! त्याने पेटी हातात घेतली, आणि त्यावेळची तसेच, जुनी देखील गाजलेली हिंदी-मराठी गाणी त्याच्या बोटांवरून त्या हार्मोनिअममधे उमटू लागली ! ‘सांज ढले, खिडकी तले, तुम शिटी बजाना छोड दो’ पासून ते थेट ‘खयके पान बनारसवाला’ पर्यंत ! संगीतातील हात असल्याची खूण, मला पटली ! नंतर मात्र कधी विसर पडणे शक्य नव्हते.
पुन्हा सर्वजण सोबत होतो, ते पुणे विद्यापीठाचा ‘युवकमहोत्सव’ हा संगमनेरला होता. भुसावळहून आमच्याच एका मित्राने कै. सुरेंद्र तळोकार याने भुसावळ नाशिक पॅसेंजरचा डबा जळगांवपर्यंत त्यात कोणी बसू नये, म्हणून आतून बंद करून आणला होता. त्यावेळी ही पॅसेंजर मुंबईपर्यंत होती, ते लक्षात नाही. नाशिकपर्यंत पॅसेंजरने ही सर्व काॅलेजमधील टोळधाड बसली होती. आमच्यासोबत आमच्यातीलच वाटावे, पण वर्तनाला अत्यंत कडक, असे आमचे चिरतरुण प्राध्यापक रमेश लाहोटी सर होते. संगमनेरला पोहोचलो. तिथं पण हा सोबत होता. तिथं ‘स्वल्पविराम’ नांवाच्या हाॅटेलमधे दुसऱ्या दिवशी गेलो होतो.
महाविद्यालयीन जीवन संपले. कोण कुठे, कोण कुठे पोटापाण्यासाठी पांगले. पोटासाठी मनासारखे काम मिळाले असेल याला, असे नेहमी मला वाटायचे ! बरेच दिवसांनी त्याची जळगांवी भेट झाली. तशा बातम्या समजायच्या, पण त्या बातम्याच ! त्यांत भेटीची मजा नाही. मग जळगांव आकाशवाणीला आल्यावर मुद्दाम कामाच्या दिवशी भेटायला गेलो. ‘स्वल्पविराम’ या हाॅटेल त्याला आठवत होते. ही आठवण पण, त्यानेच मध्यंतरी जळगांवला आल्यावर, आकाशवाणीत आवर्जून सांगीतली. जरा त्यावेळच्या वातावरणातील गप्पा झाल्या. सोबत बैठकीत दुसरे त्यावेळचे आमचे दोघांचे मित्र श्री. विजय सपकाळे पण होते. मी वकीली व्यवसायातील कटकटी सांगीतल्या, त्याने त्याच्याकडच्या कटकटी सांगीतल्या. एकंदरीत ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण सनर्पक आहे, याची खात्री पटली. आपले काॅलेज जीवन चांगले होते, हा निष्कर्ष काढून मी निघालो. नंतर त्याची बदली होऊन मुंबई आकाशवाणीवर गेल्याचे समजले. इथं फेसबुकवर जे दर्शन होई तेवढेच ! व्यवसाय भिन्न झाले, की वारंवार भेटीगाठी होणे कठीण होऊन जाते.
आणि अचानकच —- मध्यंतरी गेल्या आठवड्यात, सौ. संगीता म्हसकर यांची पोस्ट बघीतली. माझे महाविदयालयीन मित्र, सध्या आकाशवाणी अधिकारी असिस्टंट डायरेक्टर, म्हणून मुंबई आकाशवाणी येथे असलेले, हेमंत सपकाळे आपल्यात नाहीत, आपल्याला कायमचे सोडून गेले. अतिशय धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी ! विश्वास बसेना, पुन्हा दुसरे मित्र, श्री. विजय सपकाळे यांना विचारले. वाईट बातम्या या खोट्या ठरत नाही, हे पुन्हा खरं ठरलं ! परमेश्वर पण कोणत्याही कामाची घाई करतो, अन् रंगलेल्या मैफिलीचा बेरंग करतो !

12.10.2019

Image may contain: Hemant Sapkale, smiling, sitting

No comments:

Post a Comment