Sunday, October 20, 2019

कोर्टातील साक्ष आणि विंचवाची टेकडी !

कोर्टातील साक्ष आणि विंचवाची टेकडी !
रावेर हे तालुक्याचे गांव, इथं पूर्वी न्यायालय नव्हते, नंतर बहुतेक १९६२-६३ च्या दरम्यान केव्हातरी आले. मात्र न्यायलय जरी आले, तरी सर्व सोयीसुविधा नव्हत्या. स्वतंत्र इमारत नव्हती, तर तहसीलदार यांच्या इमारतीत न्यायालय आणि तालुक्यांतील जवळपास सर्व खात्यांची कार्यालये होती. अर्थात ही परिस्थिती सर्वदूर असल्याने, कोणाला त्यात काही विशेष वाटत नसे; किंबहुना ते जनतेच्या दृष्टीने सोयीचे असे.
अलिकडे प्रत्येक न्यायाधिशासाठी एक किंवा दोन, स्वतंत्र लघुलिपीक असतो आणि इतरही बऱ्यापैकी कर्मचारीवृंद असतो. मात्र तिथं न्यायालय सुरू झाले, तेव्हा काही काळ, तर तेथील न्यायाधीश, पुरावा व युक्तीवाद संपल्यानंतर देण्यात येणारे, न्यायनिर्णय हे आपल्या हाताने लिहीत असत. अशा विपरीत परिस्थितीत न्यायव्यवस्था त्यावेळच्या न्यायाधीशांनी सांभाळली आहे, तिची विश्वासार्हता जपली आहे.
मी ज्यावेळी, म्हणजे सन १९८५ साली वकिली सुरू केली, त्यावेळी तिथं एकच न्यायाधीश होते. काम प्रचंड प्रलंबित होते. दिवाणी दावे तर जवळपास दहा वर्षांचे प्रलंबित, तर फौजदारी काम जवळपास पाच-सात वर्षांचे पडून होते. एकटा माणूस काम किती करणार, हे जसे कारण होते; तसेच न्यायालयात तक्रार घेऊन गेले, तर आपल्याला न्याय मिळेल, ही भावना होती. त्यामुळे न्यायनिर्णयास वेळ लागला, तरी लोक थांबत असत. चांगूलपणावर आजपेक्षा जास्त विश्वास होता.
वकिलसंघ म्हणजे ‘बार रूम’ ही एका खोलीची, दोन चौक्याची ! दोन वकिलांनी काम चालविण्यास सुरूवात केली, की बाकीच्यांना आराम असे. कोणा वकिलांचा शिपायाने पुकारा केला, की लक्षात येई, सध्या सुरू असलेले काम संपले. मग ज्याचे पुढील काम असे, ती वकिलांची जोडी जाई. कोणी पक्षकार आला, की ते काम संपल्याशिवाय त्याला भेटता येत नसे. एखाद्या पुढचे काम असलेल्या वकिलांना, काम चालविण्याचा कंटाळा आला, की तो हमखास म्हणे, ‘आता मधल्या सुटीपर्यंत बाहेर येऊ नका.’ दुपारून दुसरी कामे लागायची. आमची जेष्ठ मंडळी तर नेहमी म्हणायची, ‘आपल्याला जी फी मिळते, त्यातील निम्यापेक्षा जास्त फी, ही कोर्टात पक्षकारांसाठी बसून रहाण्याबद्दल असते. मात्र ते काही असले, तरी एकदा का साक्षीदाराची साक्ष सुरू झाली, की कसलेल्या वकीलाला चेव येतो. स्वत: अत्यंत शांत राहून, मात्र साक्षीदाराला संताप आणून, बावचळून टाकत, उलटतपासणीत उलटापालटा करत, वेडीवाकडी उत्तरे मिळवली, की आपल्याला यश मिळण्याची खात्री वाढायची. हे बोलायला किंवा लिहायला, जरी सोपे वाटत असले, तरी त्यासाठी आपल्या केसचा व अनुषंगिक कायद्याचा सखोल अभ्यास, सत्य घटना काय आहे याची माहिती, साक्षीदाराची मानसिकता व तो कितपत सत्य जाणून आहे, आणि सर्वात महत्वाचे आपले तारतम्य !
एकदा अशीच न्यायालयात साक्षीदाराची साक्ष सुरू होती. साक्षीदार हा पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ मधील साक्षीदारासारखा होता. त्याला त्या दाव्याबद्दल प्रश्न विचारला, की ‘दाव्यांत केलेल्या विविध विधानांबद्दल तुमचे काय म्हणणं आहे ?’ त्याने तीन-चार प्रश्नांची सरळ उत्तरे दिली, नंतर मात्र त्याचा संयम सुटला असावा. पुन्हा पुढचा प्रश्न विचारल्यावर मात्र, त्यांवर त्याने मोठे मासलेवाईक उत्तर दिले.
‘साहेब, आम्ही गरीब माणसं ! आम्हाला ही कायद्याची भाषा काही समजत नाही, पण याच्या दाव्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय, तर हा दावा म्हणजे, आमच्या गांवच्या विंचवाच्या टेकडीसारखा आहे.’
‘विंचवाची टेकडी ?’ माझ्या तोंडून आपोआप विचारले गेले. त्याला ते अपेक्षितच होते.
‘काय आहे साहेब, आमच्या गांवाला नदीकाठी एक टेकडी आहे. तिथं तुम्हाला असे बघीतले, तर विंचू दिसणार नाही. मात्र तुम्ही एखादा दगड उचला, त्याखाली विंचू दिसेल. दुसरा उचला, तिथं विंचू ! अजून तिसरा उचला, पुन्हा विंचू ! कोणताही दगड उचला, बहुतेक विंचू दिसतोच ! आता नदीकाठी आहे, जनजनावर, विंचूकाटा असायचाच ! मग गांवातले लोक, त्या टेकडीला विंचवाची टेकडीच म्हणायला लागले.’ त्याने स्पष्टीकरण दिले.
‘पण त्याचा इथं काय संबंध ?’ मी विचारले. हे पण त्याला अपेक्षितच होते.
‘काय साहेब, तुम्ही मला इतकं विचारताय, या सामनेवाल्याने केलेल्या दाव्याबद्दल, की मला ती ‘विंचवाचीच टेकडी’ आठवली. तुम्ही त्या दाव्यातले काहीही विचारा, दावाच इतका खोटा लिहीलाय, की आता काय सांगू, कायकाय खोटं आहे म्हणून ? जे वाक्य विचारताय ते खोटं आहे. दोन-चार उत्तरे दिली. पण किती सांगणार ?’ त्याने निर्विकार चेहरा करत उत्तर दिले.
न्यायालयांत हसण्याचा खकाणा उडाला.
काल इथं कोर्टात बसलो होते. एक दुसरे काम सुरू होते, त्यांना जामीन हवा होता. बरीच अफरातफर होती, आणि बरीच मंडळी अडकलेली दिसत होती. ते काम संपल्यावर माझे काम निघणार होते. त्यामुळे ते काम संपेपर्यंत थांबणे भाग होते. त्या कामातील विविध घटना, तपशील बराच होता. आरोपींनी बऱ्यापैकी, वेगवेगळ्या पद्धतींनी फसवले होते. आरोपींच्या वकीलांनी त्यांच्यादृष्टीनी सोयीचा युक्तीवाद केला. सरकारी वकील उठले. त्यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीशांस काही शंका आली, की ते विचारायचे, तर त्या उत्तरातून आरोपीने कशा पद्धतीने फसवले ते पुढे यायचे. दुसरी शंका आली, तर दुसऱ्या पद्धतीने फसविल्याचे समोर यायचे. असे तीनचार वेळा झाल्यावर, मात्र न्यायाधीशांना पण हसू आले, आणि तिथं बसलेल्या वकीलांना पण ! तिथं बसलेल्या वकिलांना मी बोलून गेलो, ‘विंचवांच्या टेकडीची कथा दिसतेय !’ त्यांनी आश्चर्याने विचारल्यावर ही आठवण सांगीतली.
(पोस्ट आवडली असेल, तर ‘शेअर’ करण्यास हरकत नाही)

20.9.2019

No comments:

Post a Comment