Sunday, October 20, 2019

‘नारळी पौर्णिमा’ आणि ‘राखी पौर्णिमा’ !

‘नारळी पौर्णिमा’ आणि ‘राखी पौर्णिमा’ !
आज योगायोगाने १५ आॅगस्ट आणि नारळी पौर्णिमा तथा राखी पौर्णिमा एकाच दिवशी आली.
तसं बघीतलं तर, राखी पौर्णिमेची चाहूल आम्हाला, आदल्या दिवशी, श्रावण शुद्ध चतुर्दशीलाच लागायची ! चतुर्दशीला आमच्याकडे श्रावणातील पौर्णिमेचा देवीचा कुळाचार ! देवीची कोणतीही पूजा असो, मला ती नेहमीच आवडायची ! मातृह्रदयी भगवतीची, कुलस्वामिनीची आपल्यावर निरंतर कृपा असावी, ही भावना तर त्यामागची असायचीच ! मात्र देवीचा कोणताही कुळाचार असो, नवरात्र असो की अजून कोणतीही पूजा असो, एक नक्की असायचे - की त्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि पुरणाची आरती नक्की व्हायची ! सोबत तळण असायचेच ! पुरणाची आमटी, कोशिंबीर ! आता जास्त लिहीत नाही. हे पदार्थ मुकाट्याने, मन लावून, मनापासून खाण्याचे, लिहीण्याचे नाही !
चतुर्दशीच्या पूजेची तयारी आदल्या दिवशी पासून असायची, त्या दिवशी सकाळपासून तर लगबग ! आम्हा मुलांकडे असलेली कामे म्हणजे केळीची पाने, विड्याची पाने आणणे. बऱ्याच वेळा शेतातून पण केळीची भलीमोठी, लांबरूंद पाने येत ! दुसरं म्हणजे थोडंसं नाखुशीनेच करावे, लागणारे काम, ते म्हणजे त्या दिवशी राख्या आणाव्या लागत.
‘सीतारामभाऊंच्या ओट्याजवळ बसलेला असेल बघ तो राख्या विकणारा ! किंवा बाई पण असेल, तिच्याजवळून घ्यायचा. आणि बघ ‘देव राख्याच’ आणायच्या. मोठ्या राख्या आणायच्या नाहीत.’ हे घरून निक्षून सांगीतले जाई.
‘बरं. पण त्या नसल्या तर ?’ माझा विनाकारण प्रश्न !
‘काही नाही, मग जरा पुढे बघ ! तिथं मिळतील !’ घरून ‘देव राख्यांचा’ हट्ट सोडायची सुतराम शक्यता नसायची. वास्तविक सर्व दुकानात राखीपौर्णिमेच्या निमित्ताने इतक्या रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या राख्या आल्या असत, की त्या सर्व घ्याव्यात ही मनातून इच्छा असली, तरी तसे करता येत नसे. जरा तसा काही प्रयत्न केला, तर दुकानदार आमचा प्रयत्न हाणून पाडत.
एकदा असाच ‘अवधूत शेटच्या’ दुकानात गेलो. तिथं राख्या मागीतल्या. समोरच्या कपाटात आणि बाहेरच जरा आकर्षक राख्या टांगल्या होत्या. त्याकडे मी बोट दाखवले. दुकानातला माणूस त्या राख्या काढायला लागला, पण शेटनी मला बघीतले आणि तिथं घात झाला.
‘काय रे, आज चतुर्दशीची पूजा आहे ना ?’ त्यांनी विचारले. मी भोळेपणाने होकार दिला. आणि मग त्यांनी जवळच्या पत्री डब्यातून ‘देव राख्या’ मूठभर काढून दिल्या. त्यावेळेस दुकानदारसुद्धा त्यांना होणाऱ्या नफ्याकडे दुर्लक्ष करत, आम्हाला अनावश्यक व जास्त पैसे खर्च करू देत नसत.
जास्तीत जास्त खर्च करा, हे धोरण नसायचे, तर उलट कमीत कमी पैसे खर्च करावे, शक्यतोवर करून नये, ही भूमिका असायची. अर्थात त्यावेळेस कोणाकडे ‘खुळखुळ करणारे पैसे’ अभावानेच असत. महिन्यात असलेली आवक आणि त्यांत होणारा खर्च, याची तोंडमिळवणी करताकरता घरातील कर्ता पुरूष मेटाकुटीला येई. स्त्रियांना काही हौसमौज असते, हा विचार पण कोणाच्या मनांला शिवत नसे. घरातील मुलं, ही समस्त ओळखीपाळखीच्यांची कामे करायला, या जगांत अवतरली आहेत, ही भावना असायची. आपल्याच मुलांना काम सांगायचे, दुसऱ्यांच्या मुलांना नाही, ही भावना मोठ्या माणसांमधे अजिबात नसायची. त्याचप्रमाणे घरातीलच कोणी काम सांगीतले, तर ऐकायचे; इतरांनी सांगीतलेले ऐकायचे नाही, असे धोरण ठेवणाऱ्याला घरातूनच मार बसायचा आणि पुन्हा घरातलेच, ‘ते काम कर’ म्हणून सांगायचे. सर्व अपमान दूर ठेवून, किंवा मनांत ठेवून, ते काम करावे लागे.
‘देव राखी’ म्हणजे एक रंगीत रेशमी धाग्याला, एक छोटा रेशमी पुंजका बांधला असतो. काहीही कलाकुसर नाही. आज पण मिळत असावी. आपली दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली, की तो देव राखीला, कसाबसा असलेला चिमूटभर रेशमी पुंजका पाण्याबरोबर किंवा टाॅवेलने आपले अंग पुसतांना केव्हा निघून जाई, ते लक्षात पण येत नसे. नंतर लक्ष गेले, अन् बघीतले, तर आपल्या मनगटावर फक्त रेशमी धागा उरलेला दिसत असे. ही एक पैशाला एक, याप्रमाणे मिळत असलेली राखी, नंतर थोडी महाग झाली. मात्र एवढ्या स्वस्तात असलेली, दुसरी कोणतीही राखी मिळत नसे. सर्वजण हीच राखी देवाला पण बांधण्यासाठी, देवघरात देवांवर वाहत. जेवायला बसायच्या अगोदर, ही राखी आपल्या उजव्या मनगटावर बांधून घ्यावी लागे. ही ‘देव राखी’ राखी बांधल्याचे दु:ख, जेवतांना पुरणपोळी भरपेट खाल्ली, की जरा कमी होत असावे. मात्र आपले व घरातील वडीलधाऱ्यांचे हे समाधान त्याच दिवशी टिके.
दुसऱ्या दिवशी ‘नारळी पौर्णिमा’ आणि ‘राखी पौर्णिमा’ असे. नारळी पौर्णिमेला जेवणांत ‘नारळी भात’ करणे आवश्यक ! आमच्या घरी किंवा भागातच, भात खाण्याचे प्रमाण हे भाकरी-पोळीपेक्षा कमीच असे; पण ‘गोड’ असलेला नारळी भात खायला माझी अजिबात ना नसे. भातांत खवलेले नारळ, काजू, बेदाणे वगैरे टाकले जाई. एरवी नेहमी साधा वरण-भात किंवा लग्न समारंभात मसाले भात खायला मिळायचा. त्या मानाने कधीतरी वर्षांत एकदा, हा नारळी भात आवडायचा !
त्या दिवशी सकाळी स्नान झाले की मग ‘राखी बांधणे’ हा कार्यक्रम बहीण पार पाडायची ! तिचा डोळा राखी बांधल्यावर आपल्याला काय मिळणार यांवर; तर आमचा डोळा हा, तिने आमच्यासाठी राखी किती मोठी आणली आहे यांवर ! राखी बांधल्यावर तिला मिळणारी ओवाळणी, किंवा आम्हाला आणली जाणारी राखी, ही एकाच ठिकाणहून झालेल्या खर्चातून येत असे. पण, इतकं समजण्याएवढं वय कोणाचं होतं ? — आणि खरं तर, त्यावेळी कोणाचं असतं ? त्यानंतर आईने केलेला ‘नारळी भात’ खायला मिळायचा जेवणांत !
आता खूप वर्ष झालीत, ‘देव राखी’ स्वत: दुकानात जाऊन आणलेली नाही. ‘नारळी भात’ तसा खाण्यात येतो, अगदी हवा तेव्हा करायला सांगता पण येतो. त्याचे काही अप्रूप राहीलेले नाही. — पण आता, ना त्या वेळच्या ‘देव राखीचे’ आणि त्या नंतरच्या पुरणपोळीची चव लागत; ना त्यावेळच्या ‘नारळी भाताची’ ! पदार्थांची वर्षानुवर्षे करण्याची पद्धत तीच आहे, मग वास्तविक चव तीच येत असणार ! जाऊ द्या, सण येत रहाणार, पदार्थ होत रहाणार ! माणसं बदलली तर, पदार्थांची चव बदलणार नाही तर काय ?

15.8.2019

No comments:

Post a Comment