Sunday, October 20, 2019

राग - दुर्गा

राग - दुर्गा
आपल्याकडील काही सणवार असे असतात, की ते एकटे येत नाही, तर येतांना, हा भलामोठा आपल्या आठवणींचा गोतावळा, आपल्यासोबत घेऊन येतात. या आठवणी आपली पाठ सोडत नाही. वास्तविक आपण कुठेही परगावी गेलो, कोणत्याही वेळी गेलो, तरी ज्या दिवशी जो सण यायचा, तो येणारच ! त्यांत कसला बदल होणार ? खरंय ! त्यांत कसला बदल होणार ? पण असे असले तरी, झालेला बदल, आपणा सर्वांना नक्कीच जाणवतो. हा बदल होतो, तो सण साजरा करणाऱ्या माणसांत, त्याच्या वेगळ्या पद्धतीत, आणि म्हणून पद्धत बदलली, की त्यांच्या होणाऱ्या आठवणींत, त्यातून मिळणाऱ्या आनंदात किंवा वेदनेत, दुःखात आणि उणीव जाणवते, ती याचीच !
आमच्या गांवात गोतावळा जमायचा, तो दोन कारणांमुळे ! तो म्हणजे पुरूषांसाठी तीर्थप्रसाद पानसुपारी आणि स्त्रियांसाठी हळदीकुंकू ! स्त्रियांना एकत्र जमायला, आपल्याकडे हळदीकुंकवाचे कार्यक्रम, इतक्या काही विविध कारणांमुळे होतात, आणि त्याचे इतके काही विविध प्रकार असतात, की विचारू नका. या शिवाय इतर पण खूप सण-उत्सव-समारंभ असत. यांत कोणाचे बारसे, कोणाचे डोहाळजेवण, मंगळागौर, हरतालिकेचे जागरण, कोजागिरी पौर्णिमेच्या भुलाबाई, तसेच रामनवमी उत्सवात होणारे सीतादेवीचे डोहाळजेवण, नवरात्रोत्सव ! या निमीताने, महिलावर्ग घराबाहेर पडतो, बाहेर मोकळ्या वातावरणांत, मोकळेपणी गप्पागोष्टी होतात, मनांतील काही घुसमट असेल, तर कोणाजवळ बोलता येते. मन हलके होते, उत्साहाने भरून जाते. त्यांच्यातील कलागुणांना जर काही क्वचित वाव मिळत असेल, तर तो इथं या घरगुती कार्यक्रमांत.
मी असे काही कार्यक्रम असले, की लहानपणी आईबरोबर जायचो, तशी प्रत्येकी बरोबरच तिच्या हाताशी माझ्या वयाचे, त्यावेळी कोणीतरी असायचेच. मग तेव्हा काहीबाही गप्पा कानावर पडायच्या. त्यावेळी त्याचा अर्थ समजत नसे, आणि मुख्य म्हणजे त्याकडे लक्षपण नसे. एक मात्र ठळकपणे लक्षात आहे, की आईला प्रत्येक ठिकाणी गाणे म्हणायचा, हमखास आग्रह व्हायचा. तिथे उपस्थित असलेले सर्व महिलामंडळ असल्याने, तिला तसा संकोच नसायचा. दोन-चार गाणी मात्र वेळप्रसंग पाहून, ती नेहमी म्हणायची. हरितालिकेचे रात्रीचे जागरण असले, की ‘शंकर बोले पार्वतीशी सारीपाट मांडू या’ हे गाणं असायचं. कुठं डोहाळजेवण असलं तर, ‘काल पाहिले मी स्वप्न गडे’ हे गौडसारंग रागातील गीत, रामनवमीच्या उत्सवात दर्शनाला गेल्यावर मंडपात, पहाडी रागातील ‘रामनाम जप’ ही चीज, तर महालक्ष्मी किंवा नवरात्रीच्या वेळी हळदीकुंकवाचे वेळी, शंकरा रागातील, ‘जय देवी अंबिका’ ही चीज असायची. तिचा शास्त्रीय संगीताचा व्यासंग होताच. ती कला अशा काही प्रमाणांत, त्या आमच्या छोट्या गावांत सादर करायची.
केव्हातरी मी विचारायचो तिला, की ‘या तुझ्याकडे गाणं शिकायला येणाऱ्या मुलींना, तुझ्या सारखेच का म्हणता येत नाही ? तू त्यांना असे सोपे सोपे राग का शिकवते ? जरा चांगले राग शिकवायचे ?’ ती फक्त हसायची, ते माझ्या प्रश्नावर, का माझ्या अज्ञानाला, का मला, कोणास ठाऊक ? पण मुलाला हसणारी नसेल ती ! आपल्या विद्यर्थिदशेत कमालीचे कष्ट सहन करत, विद्या मिळविणारी, कोणी अज्ञानी राहू नये म्हणून झटणारी, माझ्या अज्ञानाला कशी हसणार ?
‘अरे, सर्व राग चांगले असतात. कोणता राग भारी नाही, आणि कोणता हलका नाही. आपण तो राग, गातो कसा, सर्व यांवर अवलंबून आहे. तू विद्यार्थ्याला सर्वप्रथम शिकवला जाणारा ‘भूप’ ऐक ! त्या नंतर शिकवला जाणारा ‘दुर्गा’ ऐक, सारंग एक ! खमाज, काफी, देस, भीमपलास किती सांगू रे ? बघ, चांगला गाणारा असेल, तर भूप ऐक, ऐकतांना बैठक मोडणार नाही तू, एकदा बसला की !’ ती सांगायची.
खरं आहे. परमेश्वराने निर्माण केलेले, हे सप्तसूर वाईट कसे असतील ? आपल्याला गाता येणार नाही, म्हणून त्यांना कसे नांव ठेवणार ?
सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे ! माता दुर्गेचे उत्सवाचे हे दिवस, सर्व वातावरण भागवतीमय झालेले. मराठी, हिंदी भाषेतील विविध गाणी आपल्या कानावर पडत असतात. तालस्वरात म्हणनारे गुरुजी असतील तर, आपली पूजासुद्धा छान तालात म्हणतात, ऐकायला छान वाटते, आपल्या मनांत मुळातच स्वरताल भिनलेला असतो, आपल्याला त्याची कल्पना नसते. आता नवरात्रात दुर्गापूजा, सप्तशतीचे पाठ सुरू असतात. आता मुद्दाम सांगायचे तर, आपल्या देवीच्या अनेक नांवांपैकी, एका नांवाचा राग आहे - दुर्गा ! नवरात्र सुरु झाल्यापासून हा राग आपोआप डोक्यात येत आहे, स्वर गुणगुणले जात आहेत. सध्याचे नवरात्रीचे दिवस पाहून वाटते, आपल्याला पण या स्वरसाधनेतील दुर्गा देवीच्या पूजेत सामील करून घ्यावे.
या रागाची आपल्याला तांत्रिक माहीती असावी, यासाठी सांगतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग, ‘बिलावल’ थाटातून निघतो. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत !
रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलनवेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झालेला हा राग आहे. ओढव जातीचा हा राग, म्हणजे या रागात पाच स्वर उपयोगात आणतात. सर्व स्वर शुद्ध लागतात. याच्या गायनाची वेळ सायंकाळीउशीरा ते रात्रीचा पहिला प्रहर ! पूर्वांगप्रधान असलेला हा राग आहे.
आरोह - सा रे म प ध सा
अवरोह - सा ध प म रे सा
पकड - रे म प घ, म रे
वादी - धैवत आणि संवादी - रिषभ
वर्ज्य - गंधार आणि निषाद
हा खूप वर्षांपूर्वी विदुषी गंगूबाई हंगल, यांचा ऐकायला मिळाला होता मुंबईला ! नंतर पुण्याला पं. जसराज यांचा ऐकला होता. अत्यंत सोप्या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात, ही कलाकार मंडळी ! हा राग गायल्याने, ऐकल्याने आपली आत्मविश्वासवृद्धी करणारा आहे, ही भावना आहे. स्वाभाविक आहे, माता दुर्गेच्या नांवाने असलेला हा राग, आत्मविश्वास देणाराच असणार, यांत शंका नाही. भगवतीची कृपा झाल्यावर, या जगतात अशक्य काय आहे ? भगवतीची आपण निसर्गात असंख्य रूपे पाहतो. खळखळ वाहणारी नदी, हे देवीचेच रूप आहे. आपल्या पाडसाला दुग्धपान करणारी कामधेनू, आणि आपल्या कृपेची आयुष्यभर आपल्याला छाया देणारी ही शैलपुत्री, यांत काय फरक आहे ? जगताचे मातृत्व स्विकारणारी, जगातील सर्व प्रजा पुत्रवत मानणारी, ही जगदंबा, या स्वरसाधनेने अवश्य प्रसन्न होईल. संगीताचे स्वर निर्माण करणारी, देवी सरस्वतीच्या रूपात आपल्याला साक्षात्कार देणारी, ही स्वरदायिनी माता दुर्गेचेच रूप आहे.
आज आपल्या समोर शास्त्रीय संगीतातील गायकांनी गायलेला, तसेच वाद्यावर वाजविलेला 'दुर्गा' राग आणि या रागावर आधारलेली काही गीते आपल्यासमोर ठेवत आहे.
(आपल्याला पोस्ट आवडली असल्यास शेअर करायला हरकत नाही. )

















1.10.2019

No comments:

Post a Comment