Sunday, October 20, 2019

‘निर्णय लकवाग्रस्त काॅंग्रेस’

आताच Praveen Bardapurkar यांचा ‘निर्णय लकवाग्रस्त काॅंग्रेस’ हा लेख वाचला. त्यांना काॅंग्रेसची काळजी वाटतेय, असं मला वाटते. त्यांनी हे काॅंग्रेसी म्हणून लिहीले नसून, पत्रकार म्हणून तटस्थपणे लिहीले आहे, असे समजू ! खंबीर, अभ्यासू, निर्भीड व प्रामाणिक विरोधी पक्षाची लोकशाहीत नेहमीच आवश्यकता असते, हे निर्विवाद ! पण हे कोणा काॅंग्रेसप्रेमींना वाटून उपयोग नाही, तर काॅंग्रेस पक्ष जे हाकताय, त्यांना वाटायला हवे. आपल्याला परिक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल, तर आपणच अभ्यास करायला हवा, शेजारच्या विद्याथ्याने करून उपयोग नाही. परिक्षा केंद्रावर प्रत्येक वेळी योग्य सुपरवायझर येईल, परिक्षेच्या अगोदर पेपर फुटतील, परिक्षा झाल्यावर पेपर तपासणाऱ्याला मॅनेज करू वगैरे गोष्टींवर ज्याचा विश्वास असेल, त्याने परिक्षेत आपल्याला यश मिळेल, याची आशाच सोडलेली बरी ! परिक्षेत पास होण्यासाठी, त्यापूर्वीच संपूर्ण व तंतोतंत अभ्यास हा योग्य व खात्रीचा मार्ग आहे. श्री. प्रवीण बर्दापूरकर यांचे अनुभवी, पत्रकारी निरीक्षण अचूक आहे.
मी अजून नुकतेच झालेले मा. नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील भाषण ऐकले नाही, आज ऐकेन. मात्र मी जे समजायला लागल्यापासून, म्हणजे माझ्या विद्यार्थी दशेपासून समजू या, तिथून ते आजपावेतो अनुभवले, ते समाजाच्या भावनेचा निष्कर्ष व परिणाम समजायला हरकत नाही.
राजकारण करतांना जनमानसांतील लोकप्रियता, अलिकडे त्याला (कोणत्याही मार्गाने व पद्धतीने)निवडून येण्याची क्षमता असे म्हणतात, हा जसा एक महत्वाचा निकष आहे; त्याच प्रमाणे निवडून आल्यानंतर राज्यकारभाराच्या नियमांनुसार व संसदीय परंपरा पाळून, खंबीरपणे, नोकरशाहीवर योग्य नियंत्रण ठेवत राज्य चालविणे, हे पण आवश्यक आहे.
पक्षाबद्दल बोलायचे, तर पक्षबांधणी, पक्षीय विचारसरणी, समाजाची परिस्थिती व गरजेप्रमाणे पक्षाचे ध्येयधोरण व त्यातील लवचिकताही सांभाळणे आवश्यक आहे.
या दोन्हींसोबत, कोणावर आपल्याकडून खरोखरच अन्याय होता कामा नये, ही पण काळजी घ्यायला हवी; कारण ‘आमच्यावर अन्याय होत आहे’ या आवाजाची सत्यासत्यता पण तपासून घ्यायला हवी. एकाला खूष करण्याच्या नादात दुसऱ्यावर अन्याय होत असेल, तर त्याचे परिणाम पक्षाला, सरकारला वेळोव्ळी भोगावे लागतात. हा पक्ष काही कामाचा राहीलेला नाही, ही जनतेची भावना, जसे जनता तो पक्ष संपविणार याची नांदी असते, तसेच ‘आयाराम-गयाराम संस्कृतीची प्रात्यक्षिके’ ही त्या नांदीची चाहूल असते.
सर्वसामान्य जनतेचा काॅंग्रेसवरून म्हणजे सद्य काॅंग्रेसी नेत्यांवरून उडालेला विश्वास, ही काॅंग्रेसची मृत्यूघंटा आहे. निदान पूर्वी गावोगावी काम करणारे काॅंग्रेसचे नेते काही प्रमाणात तरी दिसायचे, ते आता निजधामाला तरी गेले आहे किंवा अलिकडच्या काॅंग्रेसी संस्कृतींत त्यांना कसलिही किंमत राहीलेली नाही, इतकी काॅंग्रेस प्रत्यक्षात बदललेली आहे, पोपटपंची करतांना ते भले काही सांगो ! याचा विचार करायला कोणीही तयार नाही.
‘आपला स्वार्थ साधणे’ या ध्येयापेक्षा वेगळी वेगळी, अशी काॅंग्रेसी संस्कृती व विचारधारा उरलीय कुठे ?

30.6.2019

No comments:

Post a Comment